आरोग्य शिबिरात ८० जणांची तपासणी

वेंगुर्ला न.प., तालुका पत्रकार संघ, लोकनेते अॅड. दत्ता पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच गर्दे नेत्र रुग्णालय व कोकण कला व शिक्षण संस्था सिंधुदुर्ग, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या सहकार्याने ११ सप्टेंबर रोजी वेंगुर्ला न.प.च्या स्वामी विवेकानंद सभागृहात घेतलेल्या आरोग्य तपासणी शिबिराचा ८० जणांनी लाभ घेतला.यात मोफत अद्ययावत नेत्रतपासणीसह ईसीजी, थायरॉईड, कॅल्शियमची, शुगर आदी तर कोकण कला व शिक्षण विकास संस्था अंतर्गत हिद लॅबकडून रक्त तपासणी करण्यात आली.     

     यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक मुख्याधिकारी परितोष कांकाळ, सामाजिक कार्यकर्ते संजय पुनाळेकर, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वप्नाली पवार, त्वचारोग तज्ज्ञ डॉ. रुची शेता व इसीजी तज्ज्ञ डॉ. विशाल रेडी, होमिओपॅथीच्या डॉ.प्रणाली नाईक-सावंत, डॉ. रूपाली माळी, डॉ. श्रीराम हिर्लेकर, नेत्रतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध तेली, गद्रे नेत्र रुग्णालयाचे उदय दाभोलकर, कोकण कला व शिक्षण विकास संस्था प्रकल्प व्यवस्थापक अजिंक्य शिंदे, प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल, होमगार्डचे संतोष मातोंडकर आदी उपस्थित होते. 

   स्वच्छता कर्मचारी यांच्यासाठी न.प.तर्फे तीन वर्षाकरिता स्टार हेल्थ इन्शुरन्स काढण्यात येणार असून त्या अंतर्गत मोफत उपचारही होणार असल्याचे मुख्याधिकारी कंकाळ सांगितले. या शिबिरासाठी भाजपाचे उपाध्यक्ष बाळू देसाई यांचीही मोलाची मदत लाभली. पत्रकार बंधूनी आपल्या आरोग्य तपासणी सोबत स्वच्छता कर्मचारी व होमगार्ड यांच्या आरोग्य तपासणीचे आयोजन करून पिव्हेन्शन ईज बेटर दॅन क्युअरनुसार हा स्तुत्य उपक्रम असल्याचे संजय पुनाळेकर यांनी सांगितले.

     उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नाली पवार यांनी आयुष्यमान भारत हेल्थ अकाऊंट प्रत्येकाचे असले पाहिजे जेणेकरून आपल्या आरोग्याची माहिती ऑनलाईन अपडेट राहू शकेल. सर्व शहरी विभागासाठी आपल्या ग्रामीण रुग्णालयात मोफत आरोग्य अकाउंट उघडले जाते. या आभाअकाऊंटमुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्या व्यक्तीच्या आरोग्याचा इतिहास त्या त्या डॉक्टरला ऑनलाइनही मिळू शकेल. आभा अकाऊंट काढताना आधार कार्ड सोबत ओटीपीसाठी आधारशी लिंक असलेला  मोबाईल ठेवावा असे आवाहनही केले. कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या वतीने प्रकल्प व्यवस्थापक अजिंक्य शिंदे यांनी आपल्या एक रुपयात निदान व मार्गदर्शन असणा­या उपक्रमाबाबत माहिती दिली. डॉ.श्रीराम हिर्लेकर यांनी जुनाट व केस गळतीसारख्या अनेक रोगांवर होमिओपॅथी उपचारांसंबंधी माहिती दिली. प्रास्ताविक पत्रकार संघाचे उपाध्यक्ष महेंद्र मातोंडकर, निवेदन सहसचिव सीमा मराठे तर आभार सल्लागार के.जी गावडे यांनी मानले.

 

Leave a Reply

Close Menu