वेंगुर्ल्यात रोटरीच्या भव्य क्रीडा स्पर्धा

रोटरी डिस्टिक्ट ३१७०चे डिस्ट्रिक्ट स्पोर्टस् इव्हेंट्स यावर्षी रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनमार्फत वेंगुर्ल्यात आयोजित केले आहेत. या स्पर्धा दि.२ व ३ डिसेंबर रोजी कॅम्प मैदानावर पार पडणार आहेत अशी माहिती रोटरी क्लब वेंगुर्ल्याचे अध्यक्ष राजू वजराटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेच्या सुरूवातीस सर्वप्रथम स्पर्धेच्या चषकांचे अनावरण क्लबचे हॉनररी मेंबर तथा वेंगुर्ला तहसिलदार ओंकार ओतारी यांच्या हस्ते झाले. यावेळी क्लब अध्यक्ष राजू वजराटकर, सेक्रेटरी योगेश नाईक, ट्रेजरर पंकज शिरसाट, इव्हेंट चेअरमन राजेश घाटवळ, इव्हेंटसेक्रेटरी अॅड. प्रथमेश नाईक, इव्हेंटचेअरमन मुकूल सातार्डेकर, स्पोर्टस हेड दिलीप गिरप, असिस्टंट गव्हर्नर संजय पुनाळेकर, सचिन वालावलकर, गणेश अंधारी, दिपक ठाकूर, मृणाल परब, नागेश गावडे, डॉ.राजेश्वर उबाळे आदी उपस्थित होते.

   रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० मध्ये महाराष्ट्रातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, पूर्ण गोवा राज्य,  कर्नाटक राज्यातील बेळगांव, हुबळी, धारवाड आदी भागांचा समावेश होत असून झोनल स्पोर्टसमधील विजेते आणि उपविजेते संघ डिस्ट्रिक्ट स्पोर्टसमध्ये खेळू शकतात. क्रीडा प्रकारात क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम, बुध्दिबळ, अॅथलेटिक्समध्ये १०० मीटर रनिंग, १०० बाय ४ मीटर रिले आणि गोळाफेक आदी खेळांचा समावेश आहे.

         या स्पोर्टस् इव्हेंटचे उद्घाटन डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नासीरभाई बोरसादवाला यांच्या हस्ते, राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर, दोन वर्षानंतरचे भावी प्रांतपाल लेनी डिकोस्टा, शरद पै, विक्रांतसिंग कदम, वासुकी सानजी, अजय सेनन, प्रसन्न देशींगकर, संजय साळुंखे, क्लबचे असिस्टंट गव्हर्नर सचिन गावडे यांसह रोटरीतील मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

 

Leave a Reply

Close Menu