टोपीवाला हायस्कूल माजीविद्यार्थी मेळावा

3 डिसेंबर 2023 रोजी, टोपीवाला हायस्कूल मालवणच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे त्रिदल हॉल, कोथरूड, पुणे येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. 1965 सालच्या एस.एस.सी  बॅचपासून  2012 पर्यंतच्या एस.एस.सी. बॅचचे माजीविद्यार्थी उपस्थित होते. जवळजवळ तीन पिढ्यातील माजीविद्यार्थ्यांचा हा स्नेहमेळावा अगदी वाखाणण्याजोगा होता. सर्वांच्या चेहऱ्यावर आपण टोपीवाला हायस्कूलचे माजी विद्यार्थी असण्याचा सार्थ अभिमान होता. एकमेकांना भेटण्याचा आनंद होता व सर्वांनी मिळून शाळेसाठी काहीतरी भरीव कामगिरी करण्याची तळमळ, माजीविद्यार्थी संघटना मजबूत करण्याची इच्छा होती. आदरणीय माजीमुख्याध्यापक तोरगलकर सर व प्राथमिकशाळेच्या करंदीकर बाईंची उपस्थिती कार्यक्रमाची शान वाढवणारी ठरली. शाळेचे आणि शिक्षकांचे ऋण याची पुन्हा एकदा तीव्र आठवण झाली आणि मन भारावून गेलं. मालवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. शरद परूळेकर, सदस्य अरविंद परुळेकर, माजीविद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्री.उमेश धारगळकर ही या मेळाव्यासाठी उपस्थित होते.
         माजीविद्यार्थी संघटना, पुणे शाखेच्या वतीने श्री. दिगंबर परुळेकर, सौ. स्मिता करंदीकर-संकोळी व सौ. रेखा डोंगरे-बर्वे यांनी प्रेझेंटेशन देऊन संघटनेची वाटचाल, आढावा व भविष्यातील उपक्रमांची माहिती दिली. सर्व उपस्थितांनी आपली ओळख, मनोगत व आठवणी सांगितल्या. माजीविद्यार्थी संघटनेचे आजीवन सदस्यत्व घेण्याची व सर्वतोपरी सहाय्य करण्याची तयारी दाखवली. कार्यक्रमाची सांगता स्वादिष्ट भोजन आणि मनसोक्त गप्पांनी झाली. माजीविद्यार्थी म्हणून सर्वांना बांधून ठेवणा-या भावनिक धाग्याची प्रचितीही आली आणि टोपीवाला हायस्कूलचे विद्यार्थी/विद्यार्थिनी असण्याचा अभिमान परत एकदा द्विगुणित झाला.

Leave a Reply

Close Menu