नवांकूर बालकुमार साहित्य संमेलन २२ व २३ डिसेंबर

आनंदयात्री वाङ्मय मंडळ, वेंगुर्ला तर्फे २२ व २३ डिसेंबर या कालावधीत श्री शिवाजी हायस्कूल, तुळस येथे नवांकूर बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. या संमेलनाची सुरूवात २२ रोजी स. ९ वा.जैतिर मंदिर ते तुळस हायस्कूल अशा ग्रंथदिडीने होणार आहे. दि. २३ रोजी संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी लेखक, संपादक, प्रकाशक मदन हजेरी, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, बालनाट्य लेखक प्रकाश पारखी, सरपंच रश्मी परब, सामाजिक कार्यकर्ते सचिन वालावलकर, उपसरपंच सचिन नाईक, मुख्याध्यापक अँथोनी डिसोझा, कवी विठ्ठल कदम, वीरधवल परब, महाराष्ट्र मराठी अध्यापक मासिकाचे संपादक भरत गावडे, जैतिराश्रित संस्थेचे अध्यक्ष अॅड.प्रभानंद सावंत, पार्वतीदेवी वाचनालयाचे अध्यक्ष सगुण माळकर आदी उपस्थित राहणार आहेत. दुपारी १२.३० वा.चला जाऊ कवितेच्या गावा, दु. २.४५ वा.वृंदा कांबळी हे कथाकथनाची दशसूत्री यावर मार्गदर्शन, ३ वा. लेखक आपल्या भेटीला, ४ वा. पारितोषिक वितरण, सत्कार व समारोप असे कार्यक्रम होणार आहेत. मदन हजेरी यांनी यापूर्वी अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. त्यांच्या पुस्तकांना राज्यशासनाचे पुरस्कारही मिळाले आहेत. बालवाङ्मयातील अनेक पुस्तकांचे त्यांनी मराठीत अनुवाद केले आहेत. मुलांसाठी साहित्य विश्वात झोकून देऊन कार्य करणारे हजेरी हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. तर प्रकाश पारखी हे अनेक वर्षे मुलांसाठी नाट्यशिबिरे भरवित आहेत. राज्यशासनाने त्यांच्या सेवेचा पुरस्काराने सन्मान केला आहे. या संमेलनाला उपस्थित रहावे असे आवाहन आनंदयात्री वाङ्मय मंडळाने केले आहे.

Leave a Reply

Close Menu