►9 फेब्रुवारीला महोदय पर्वणीचा योग

पौष अमावास्या व श्रवण नक्षत्र एकत्र आल्यास महोदय पर्वणीचा योग येतो. यावर्षी असा योग आल्याने 9 फेब्रुवारी रोजी गावोगावच्या ग्रामदैवतांसह भाविक तीर्थस्नान करणार आहेत. महोदय पर्व सकाळी 8 वाजून 2 मिनिटपासून ते सूर्यास्तापर्यंत असल्याने या कालावधीत तीर्थस्नान करता येणार आहे. यापूर्वी 8 फेब्रुवारी 2016 त्यानंतर 4 फेब्रुवारी 2019 साली महोदय पर्वणीचा योग आला होता. वेंगुर्ला तालुक्यातील श्री तीर्थक्षेत्र सागरेश्‍वर व आरवली समुद्रकिनारी पंचक्रोशीतील देवस्थाने तरंगदेवता व पालख्यांसह तीर्थस्नानासाठी येतात.

      तीर्थस्नानाला येण्यापूर्वी त्या त्या गावातील मानकरी, गावकर मंडळी, देवस्थान विश्‍वस्त आपल्या ग्रामदेवतेचा कौलप्रसाद घेतात. जर हा कौलप्रसाद झाला, तरच भक्तमंडळी आपल्या ग्रामदेवतेसह तीर्थस्नानास येतात. यावर्षी मिळालेल्या कौलप्रसादानुसार वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत श्री देव रामेश्‍वर, श्री देवी सातेरी, श्री देव पूर्वस व तरंगदेवता तीर्थस्नानासाठी जाणार आहेत. उर्वरित देवस्थानांचा कौलप्रसाद झाला तर 9 फेब्रुवारी रोजी वेंगुर्ल्यात भक्तांचा महापूर येणार आहे, हे निश्‍चित.

Leave a Reply

Close Menu