‘माझा वेंगुर्ला’च्या आरोग्यधामचा शुभारंभ

योजना कितीही चांगली असली, तरी जोपर्यंत ती योग्य पध्दतीने लागू केली जात नाही, तोपर्यंत त्या योजनेचा सामान्य जनतेसाठी काहीही उपयोग होत नाही. आयुष्मान भारत ही केंद्राची योजना अतिशय चांगली आहे. त्याच्या अंमलबजावणीमध्ये त्रुटी जरुर असतील. त्या दूर करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याचे आयुष्मान भारतचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी सांगितले.

      माझा वेंगुर्ला या संस्थेच्या सक्षम आरोग्य सेवा या उपक्रमांतर्गत ‘आरोग्यधाम’ या सेवा तत्वावरील आरोग्य केंद्राचा शुभारंभ शनिवारी उभादांडा वरचे माडवाडी येथे झाला. या निमित्ताने कॅन्सर पेशन्ट एडस्‌ असोसिएशन (सी.पी.ए.ए.) या चार दशके कर्करोग रुग्णांसाठी सेवाभावी तत्वावर काम करणारा मुंबईस्थित संस्थेच्या सहयोगाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या केंद्राच्या उद्घाटनासाठी आयुष्मान भारतचे महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. माझा वेंगुर्ला या संस्थेतर्फे वेंगुर्ले येथे आयोजित आरोग्यधाम केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी पुढील काळात या महाराष्ट्रात उपचार वा पैशा अभावी कोणी सामान्य माणूस दगावणार नाही अशी ग्वाही दिली. या संस्थेच्या आरोग्यधाम केंद्रासाठी आपली इमारत कायमस्वरुपी वापराकरिता देणाऱ्या श्रीमान संदिप नाईक यांचे कौतुक करून त्यांनी आभार मानले. मी देखील ‘माझा वेंगुर्ला’ या संस्थेचा एक कार्यकर्ता असल्याचे स्वतःला समजतो. याच नात्याने या वेंगुर्लातील आरोग्य उपक्रमांसाठी जे-जे काही करता येण्यासारखे आहे ते ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन, अशी ग्वाही त्यांनी दिली. डॉ. शेटे यांच्या हस्ते आरोग्यधाम फलकाचे अनावरणही यावेळी करण्यात आले.

      यावेळी सी.पी.ए.ए. च्या कार्यकारी संचालक डॉ. निता मोरे, तहसीलदार ओेंकार ओतारी, वेंगुर्ले न.प.चे मुख्याधिकारी परितोष कंकाळ, डॉ. अमित आजगावकर, डॉ. महेश धारगळकर, डॉ. विवेक गावस्कर, तरुण भारत संवादचे संपादक शेखर सामंत, उद्योजक रघुवीर मंत्री, संदिप नाईक, सरपंच उभादांडा निलेश चमणकर, माजी नगराध्यक्ष राजन गिरप, नियोजन मंडळ सदस्य सचिन वालावलकर, माझा वेंगुर्ला अध्यक्ष जनार्दन शेटये, संजय पुनाळेकर, प्रसन्ना उर्फ बाळू देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. तर जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री. मनिष दळवी यांनीही या कार्यक्रमाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

      तत्पूर्वी बोलताना रघुवीर मंत्री, शेखर सामंत, सचिन वालावलकर, तहसीलदार ओतारी, मुख्याधिकारी कंकाळ यांनी आरोग्यधाम केंद्रास शुभेच्छा दिल्या व आवश्‍यक ते सहकार्य देण्याची ग्वाही दिली. डॉ. आजगावकर आणि श्री. संदिप नाईक यांनी वेंगुर्ल्याच्या आरोग्यासाठी आपण काय-काय योगदान देऊ शकतो याबाबत सुंदर विवेचन केले. डॉ. नीता मोरे यांनी कॅन्सर उपचारासंदर्भात माहिती दिली. यावेळी आरोग्यधाम केंद्रासाठी योगदान देणाऱ्या श्री. संदिप नाईक यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच फॉरेन्सिक सायन्स या अभ्यासात कर्नाटक विद्यापीठात अव्वल क्रमांक पटकावणाऱ्या सेंड्रा शैलेस्तिन फर्नाडिस हिला डॉ. शेटे यांच्या हस्ते गौरविण्यात आलं. तसेच नियोजन समितीवर निवड झाल्याबद्दल संस्थेचे पदाधिकारी श्री. राजन गिरप, श्री. सचिन वालावलकर यांचा तर डॉ. आजगावकर व डॉ. महेश धारगळकर, सरपंच निलेश चमणकर, निलेश चेंदवणकर, प्रा. आनंद बांदेकर आदी मान्यवरांचा त्यांच्या सामाजिक योगदाना बद्दल जाहिर सत्कार करण्यात आला.

      यावेळी आयोजित आरोग्य तपासणी शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यासाठी सी.पी.ए.ए. या संस्थेचे मोलाचे योगदान लाभले. सूत्रसंचालन श्री. प्रशांत आपटे यांनी, तर प्रास्ताविक मोहन होडावडेकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माझा वेंगुर्ला संस्थेच्या सर्व सदस्यांनी मोठ्या उत्साहाने मेहनत घेतली. तसेच स्थानिक ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Close Menu