अपेडा संस्थेकडून काजू उद्योजकांना मार्गदर्शन

महाराष्ट्र कॅश्‍यू मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर, सेक्रेटरी बिपिन वरसकर, संचालक दयानंद काणेकर यांनी राज्यातील काजू कारखानदारांचा सुमारे अडीच वर्षे प्रलंबित असलेला एसजीएसटी परतावा परत मिळविण्यासाठी 10 ऑक्टोबर रोजी राज्याचे विक्रीकर आयुक्त यांची भेट घेऊन स्पष्टपणे बाजू मांडली होती. त्यामुळे परतावा योजना पूर्ववत चालू झाली. याबद्दल असोसिएशनचे सर्व संचालक, सभासद तसेच आमदारांचा सत्कार महाराष्ट्र कॅश्‍यू मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे करण्यात आला.

      असोसिएशनची 34 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी झारापतिठा येथील हॉटेल आराध्य येथे असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर यांच्या अध्यक्षतेखाली व चंदगडचे आमदार राजेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योजक उपस्थित होते. काजूगर निर्यातीला प्रोत्साहन देणाऱ्या अपेडा या संस्थेच्या प्रतिनिधींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कर्नाटक राज्यातून आलेल्या काजू उद्योग क्षेत्रातील अनुभवी सीए यांचे उपस्थितांना मार्गदर्शन लाभले.

      यावेळी आमदार पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्यातर्फे मुंबई-वाशी मार्केट येथे पाच काजू उद्योजकांनी काजूगर विक्रीसाठी पेढी स्थापन केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. श्री अमृता कॅश्‍यू इंडस्ट्रीजचे मालक सिद्धार्थ झांटये यांचा कोकण विभागातून सर्वात मोठे निर्यातदार म्हणून शासनाकडून मिळालेल्या पुरस्काराबद्दल सत्कार करण्यात आला. सायंकाळच्या सत्रात वार्षिक कामाचा आढावा, वार्षिक अहवालाचे वाटप करून सर्व उद्योजकांना स्मृतिचिन्ह देण्यात आले. वेंगुर्ला फळ संशोधन केंद्र येथील डॉ. विजय देसाई यांनी चालू हंगामाच्या काजू पिकाबद्दल मतप्रदर्शन केले. त्यानंतर परदेशातून काजू बी उपलब्धता याबद्दल चार मोठ्या जागतिक ट्रेडर्सकडून सर्व उद्योजकांना माहिती आणि काजू बी खरेदी करताना फसवणूक होऊ नये यासाठीचे तंत्र सांगण्यात आले.

      यावेळी महाराष्ट्रातील काजू प्रक्रिया घटकांनी संघटीत होण्यासाठी असोसिएशनची मेंबर्सशिप घेऊन शासनाकडून मिळणारे फायदे मिळविण्याचे आवाहन असोसिएशनतर्फे करण्यात आले.

Leave a Reply

Close Menu