एकपात्री अभिनय स्पर्धेत सीमा मराठे अंतिम फेरीत

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सहकार्याने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेमार्फत बोरिवली येथे घेण्यात आलेल्या उपांत्य फेरीच्या एकपात्री अभिनय स्पर्धेमधून वेंगुर्ला येथील साप्ताहिक किरातच्या संपादक सीमा शशांक मराठे यांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.

    १०० व्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने नाट्य परिषदेमार्फत महाराष्ट्रभर जागर महोत्सवाचे नियोजन केले आहे. यामध्ये एकांकिका, बालनाट्य, एकपात्री अभिनय, नाट्यसंगीत गायन, नाट्यछटा आणि नाट्य अभिवाचन अशा स्पर्धाचा सामावेश आहे. एकपात्री अभिनय स्पर्धेची प्राथमिक फेरी महाराष्ट्रातील विविध ११ केंद्रांवर घेण्यात आली. सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी रत्नागिरी केंद्रावर झालेल्या झालेल्या प्राथमिक फेरीत दोन स्पर्धकांची निवड झाली होती. त्यामध्ये सीमा मराठे यांनी कुडाळचे ज्येष्ठ नाट्यकर्मी केदार देसाई लिखित नाट्यसंहिता सादर केली होती. या फेरीत मराठे यांच्यासह रत्नागिरीच्या स्वानंद मयेकर यांची उपांत्य फेरीसाठी निवड झाली होती.

      उपांत्य स्पर्धा नागपूर, पुणे, अहमदनगर व मुंबई-बोरीवली अशा चार केंद्रांवर घेण्यात आली. प्रबोधनकार ठाकरे मिनी हॉल येथे मुंबई, ठाणे आणि रत्नागिरी विभागातून उपांत्य फेरीसाठी निवडल्या गेलेल्या १८ स्पर्धकांनी सादरीकरण केले. या स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून क्षितिज झारापकर आणि दिलीप हल्याळ केंद्रीय कार्यकारिणीकडून नियुक्त केले गेले होते. बोरिवली केंद्रातून सीमा मराठे, स्वानंद मयेकर, स्मितल चव्हाण, निकिता झेपले, ऐश्वर्या पाटील, पराग नाईक, साहिल दळवी यांची अंतिम फेरीकरिता निवड झाली आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी मुंबई येथे होणार आहे. यातील काही लक्षवेधी स्पर्धकांना १०० व्या नाट्य संमेलनाच्या दरम्यान विविध मंचावरती सादरीकरण करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. ही स्पर्धा बोरिवली येथे यशस्वी होण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बोरिवली शाखा, तसेच कार्यकारी समिती सदस्य संजय देसाई, शिवाजी शिंदे आणि गणेश तळेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

      अंतिम फेरीसाठी निवडलेले केंद्रनिहाय स्पर्धक पुढीलपमाणे. पुणे केंद्र स्नेह दडबई, अपर्णा जोशी, पल्लवी परब-भालेकर, मृदूला मोघे, ज्ञानेश्वरी कांबळे, विनायक जगताप, वेदिका बाबळे, महामाया ढाबरे. अहमदनगर केंद्र- पूजा बोडके, विशाल रणदिवे, सिद्धेश्वर थोरात, मिताली सातोंडकर, शशिकांत नगरे, श्वेता पारखे, किशोर पुराणिक, माधुरी लोकरे. नागपूर केंद्र- विष्णू निंबाळकर, सौरभ काळपांडे, प्राजक्ता राऊत, विनय मोडक, सीमा मुळे, दिपाली घोंगे, हेमंत चौधरी, मुंबई केंद्र सीमा मराठे, स्मितल चव्हाण, स्वानंद मयेकर, निकिता झेपले, ऐश्वर्या पाटील, पराग नाईक, साहिल दळवी. परिषदेचे नाट्य जागर प्रमुख अनिल बांदिवडेकर यांनी ही माहिती जाहीर केली.

Leave a Reply

Close Menu