ओडिसा, म्हैसूरच्या धर्तीवरील महाराष्ट्रातील पहिले “वाळूशिल्प संग्रहालय” शिरोडा येथे

ओडिसा, म्हैसूरमध्ये असणाऱ्या वाळूशिल्प संग्रहालया प्रमाणे सिंधुदुर्गातील वेंगुर्ला तालुक्यातील  शिरोडा येथे समुद्रकिनाऱ्याजवळ महाराष्ट्रातील पहिले “वाळूशिल्प संग्रहालय“ उभे राहिले आहे. हे संग्रहालय पाहण्यासाठी स्थानिकांसह पर्यटकांची गर्दी होत आहे. कोकणातील पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने याची निर्मिती झाली आहे. आरवली सोन्सुरे येथील कलाकार आंतरराष्ट्रीय वाळूशिल्पकार रविराज चिपकर या कलाकाराची ही निर्मिती असून त्यांच्या कलागुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

      पर्यटकांना वाळूशिल्प ही कला पाहता यावी या उद्देशाने “विजयश्री वाळूशिल्प कला संग्रहालय“ सुरू करण्यात आले आहे. गतवर्षी हे संग्रहालय सोन्सुरे येथे उभारण्यात आले होते. मात्र यावर्षी शिरोडा रेडी मार्गावर मिठागर येथे हे संग्रहालय उभारण्यात आले आहे. वाळूशिल्प संग्रहालयात शिव, गणपती, येशू, शिवाजी महाराज आणि इतर अजून मूर्तींसह अनेक कलाकृती प्रदर्शनात मांडल्या आहेत.

      संग्रहालयाचे कलाकार, रविराज चिपकर यांनी आपले मनोगत मांडताना सांगितले की, कोकण पट्ट्यातील पर्यटन वाढत आहे, पर्यटकांसाठी काहीतरी वेगळे आकर्षण करायचे होते. येथील लोक, रहिवासी आणि पाहुणे सर्वच श्रद्धाळू आहेत. म्हणून, मी विविध आदरणीय व्यक्तींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या  मूर्ती तयार करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राच्या या भागातील एक लाडके लेखक विष्णू सखाराम खांडेकर यांची मूर्तीही मी साकारली आहे.

      यावर्षीच्या मे महिन्यापर्यंत हे संग्रहालय खुले राहणार आहे. पावसाळ्यात तात्पुरते बंद करण्याची गरज असल्याचे सांगत नोव्हेंबरमध्ये नवीन मूर्ती तयार करण्याची आणि संग्रहालय पुन्हा सुरू करण्याची चिपकर यांची योजना आहे.

      वाळू संग्रहालयाला भेट देणारे प्रामुख्याने पुणे, मुंबई आणि परदेशातील, वाळूच्या मूर्तीं पाहून आश्‍चर्यचकित होतात. समुद्रकिनाऱ्यापासून केवळ एक किलोमीटर अंतरावर राहणारे चिपकर हे वाळू कलेचा व्यवसाय करणाऱ्या मोजक्या कलाकारांपैकी एक आहेत. चिपकरांचा वाळू कलाकार म्हणून प्रवास 2011 मध्ये सुरू झाला, जेव्हा ते वयाच्या 23 व्या वर्षी कोकणातील समुद्रकिनारी महोत्सवात सहभागी झाले होते. कलाकार सुदर्शन पटनायक यांच्या प्रेरणेने, त्यांनी व्यावसायिक वाळू कलात्मकतेमध्ये प्रवेश केला आणि तेव्हापासून त्यांना विविध ठिकाणी आमंत्रणे मिळत आहेत. त्यांच्या या कलेचा सर्वत्र कौतुकाने गौरव होत आहे.

Leave a Reply

Close Menu