पत्रकार के. जी. गावडे यांचा सेवानिवृत्तीबद्दल विविध संस्थांतर्फे सन्मान

  एखाद्या पत्रकाराची सेवानिवृत्ती होते आणि हा सोहळा उत्स्फूर्तपणे जनतेकडून साजरा होतो हा सर्वोत्तम सन्मान आहे, असे प्रतिपादन तरुण भारत संवादच्या सिंधुदुर्ग व रत्नागिरी आवृत्तीचे संपादक शेखर सामंत यांनी केले. तरुण भारत संवादच्या वेंगुर्ले कार्यालयाचे प्रतिनिधी के. जी. गावडे यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार सोहळा नगरपालिकेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात विविध संस्था, तरुण भारत परिवार व तालुका पत्रकार संघाच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याचे अध्यक्ष या नात्याने ते बोलत होते.

      यावेळी व्यासपीठावर फुले शाहू आंबेडकर विचारमंचचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर, माझा वेंगुर्ला व कलावलय संस्थेचे  उपाध्यक्ष संजीव पुनाळेकर, एमके कॉयर फाऊंडेशनचे चेअरमन तथा सामाजिक कार्यकर्ते एम. के. गावडे, शिवसेनेचे वेंगुर्ले तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, सत्कारमूर्ती तरुण भारत संवादचे वेंगुर्ले प्रतिनिधी के. जी. गावडे, त्यांच्या पत्नी सौ. कविता गावडे, शिवसेनेचे जिल्हा संघटक तथा माजी नगराध्यक्ष सुनील डुबळे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

      के. जी. गावडेंची पत्रकारिता सकारात्मकतेला प्रोत्साहन देणारी आहे. एवढ्या वर्षात त्यांनी कधीही कोणाला त्रास होईल अशी पत्रकारिता केली नाही की स्वतःच्या चारित्र्याला डाग लागू दिला नाही. ते आपल्या कामाशी कायम प्रामाणिक राहिले. तरुण भारतशी एकनिष्ठ राहून 31 वर्षे ते पत्रकारितेत कार्यरत राहिले. त्यांच्या पत्रकारितेविषयी कधीही कोणाची तक्रार किंवा नाराजी व्यक्त झालेली ऐकिवात नाही. त्यामुळेच त्यांना जनतेतून एवढे प्रेम मिळाले. के. जी. गावडेंना मिळालेले हे प्रेम आम्हा सर्व पत्रकारांसाठी प्रेरणा घेण्यासारखे आहे. हे प्रामाणिक पत्रकारितेचेच फळ आहे. कोणाच्याच वाट्याला असा क्षण येणे कठीण असते. केजींनी जी पत्रकारिता केली त्यात कधीही मग्रुरी नव्हती. पत्रकार असल्याचा अहंभाव त्यांनी कधी बाळगला नाही. त्यामुळे ते निष्कलंक व प्रामाणिक पत्रकार म्हणूनच स्मरणात राहतील. निवृत्ती झाली म्हणून त्यांनी थांबू नये. आपली लेखनी विविध माध्यमातून सुरू ठेवावी. तरुण भारतच्या संस्कृतीचा सन्मान ठेवत केजींच्या मदतीसाठी आम्ही सदैव असू असेही पुढे बोलताना शेखर सामंत म्हणाले.

      प्रास्ताविक प्रदीप सावंत यांनी केले. केजी निष्कलंक पत्रकार म्हणून वेंगुर्लेवासीयांच्या मनात घर करून आहेत. त्यांना लोकांकडून मिळालेले प्रेम प्रत्येक पत्रकाराला प्रेरणा देत राहिल. त्यांनी लेखणी थांबवू नये. सतत लिहिते रहावे, असे यावेळी बोलताना ते म्हणाले.   के. जी. गावडे हे असे पत्रकार आहेत ज्यांनी हयातभर आपल्या पत्रकारितेचा स्तर उंचावत ठेवला. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याची तळमळ त्यांच्या पत्रकारितेत आहे. वेळागरचा सर्व्हे नं. 39 चा लढा असो की, रेडीतील खाण कामगारांचे आंदोलन असो. आंबा बागायतदारांच्या समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्‍न, येथील मच्छीमारांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी त्यांची लेखणी तळपत राहिली. यापुढेही त्यांनी लिहिते रहावे, असे यावेळी बोलताना जयप्रकाश चमणकर म्हणाले. फुले शाहू आंबेडकर विचारमंचचे उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते एन. पी. मठकर, जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे पदाधिकारी डॉ. संजीव लिंगवत, खर्डेकर महाविद्यालयाचे प्रा. व्ही. पी. नंदगिरीकर, किरात साप्ताहिकच्या संपादक सौ. सीमा मराठे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, वेंगुर्ले शहरप्रमुख उमेश येरम, भाजपचे उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दाजी नाईक, पत्रकार दीपेश परब, सुरेश कौलगेकर, माझा वेंगुर्लाचे प्रतिनिधी अमृत काणेकर, वेंगुर्ले पत्रकार संघाचे अध्यक्ष मॅक्सी कार्डोज, उपाध्यक्ष योगेश तांडेल, महिला औद्योगिक काथ्या कामगार संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक सौ. प्रज्ञा परब, एम. के. गावडे, सुनील डुबळे आदी मान्यवरांनी के. जी. गावडे यांच्या पत्रकारितेचा गौरव करणारे मनोगत व्यक्त केले.

      लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे वेंगुर्लेचे शाखा व्यवस्थापक पुरुषोत्तम उर्फ दिलीप राऊळ, छत्रपती शिवाजी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्‍यामसुंदर राय, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर तांडेल, अशोक कोलगावकर, वेळागर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू आंदुर्लेकर, सचिव हनुमंत गवंडी, सदस्य गजा गवंडी, शरद आरोसकर, विश्‍वनाथ आरोसकर, शेखर नाईक, मनोहर नाईक, पत्रकार अजित राऊळ, एस. एस. धुरी, संदेश राऊळ, पत्रकार भरत सातोसकर, नगर वाचनालयाचे कोषाध्यक्ष कैवल्य पवार, किरातचे व्यवस्थापक सुनील मराठे आदींनी उपस्थित राहून के. जी. गावडेंना शुभेच्छा दिल्या.

      जनसेवा प्रतिष्ठान, अंधश्रद्धा निर्मुलन समिती, फुले शाहू आंबेडकर विचारमंच, आंबा बागायतदार संघ, वेळागर सर्व्हे 39 संघर्ष समिती, वेळागर शेतकरी संघ, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघ, कलावलय वेंगुर्ले, माझा वेंगुर्ला, किरात ट्रस्ट, वेंगुर्ले तालुका पत्रकार संघ आदी संस्थाच्यावतीने के. जी. गावडे यांचा सन्मान करण्यात आला. तरुण भारत संवाद परिवारातर्फे संपादक शेखर सामंत यांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

      मी एक सामान्य पत्रकार आहे. साधेपणा हीच माझी ओळख. माझ्या लेखणीमुळे कोणाचे मन दुखावले जावू नये याची काळजी मी सातत्याने घेत आलो आहे. तरुण भारत परिवाराने मला ओळख दिली, नाव दिले, प्रतिष्ठा दिली. त्यामुळेच मी सकारात्मक पत्रकारिता करू शकलो. ज्यांच्यामुळे मला ओळख मिळाली त्यांच्याप्रती निष्ठा राखणे हे माझे कर्तव्य होते. ते मी प्रामाणिकपणे पूर्ण केले. लोकांकडून मिळालेले प्रेम पुढील आयुष्य जगायला बळ देईल, पत्रकार म्हणून नियत वयोमानानुसार माझी सेवानिवृत्ती झाली असली तरी माझ्यातील पत्रकार कधीच सेवानिवृत्त होणार नाही. विविध माध्यमातून माझी लेखणी कार्यरत राहील असे यावेळी बोलताना सत्कारमूर्ती के. जी. गावडे म्हणाले.

      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तरुण भारत संवादचे पत्रकार महेंद्र मातोंडकर यांनी केले, तर आभार फुले शाहू आंबेडकर विचारमंचचे पदाधिकारी लाडू जाधव यांनी मानले.

Leave a Reply

Close Menu