न्यायालयाच्या आदेशाने शाश्वत जीवनशैलीला पाठबळ

सिंधुदुर्गातील सह्याद्रीच्या रांगांमधील २५ गावे इको-सेन्सिटिव्ह एरियाम्हणून घोषित करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रक्रियेसाठी निश्चित अशी मुदतही ठरवून दिली आहे. हा निर्णय वाघ व अन्य वन्यप्राण्यांना डोळ्यासमोर ठेवून घेतला असला, तरी त्याचा प्रभाव निसर्गाशी एकरूप होऊन जीवनशैली विकसित केलेल्या या देखण्या, सुंदर २५ गावांशी जोडलेला आहे. वनशक्ती या संस्थेचे स्टॅलिन दयानंद, त्यांना साथ देणारे स्थानिक ग्रामस्थ व त्यांच्या सहका­यांच्या तब्बल १४ वर्षांच्या अथक प्रयत्नातून हा विजय मिळविला आहे. हा लढा ग्लोबल वॉर्मिंगच्या चटक्यांनी भाजत असलेल्या कोकणसह पूर्ण पश्चिम घाटासाठी दिशादर्शकठरणारा आहे.

       सन २००९ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात खनिज प्रकल्पाला विरोध व पर्यायाने पर्यावरण संवर्धनासाठी दोडामार्ग तालुका ढवळून निघाला होता. कळणेमध्ये येऊ घातलेल्या खनिज प्रकल्पाला स्थानिकांचा प्रचंड विरोध होता; मात्र प्रशासनाच्या साथीने मायनिंग लॉबी सगळी ताकद लावत लोकांचा विरोध चिरडत होती. यामुळे सह्याद्रीच्या या भागात प्रचंड अस्वस्थता होती. या लढ्यातील एक पर्यावरणवादी संदीप सावंत यांनी मुंबईतील वनशक्ती संस्थेचे स्टॅलिन दयानंद यांना कळणेसह या भागात आणले. येथील पर्यावरण, लोकांची निसर्गाशी एकरूप झालेली जीवनशैली आणि या पर्यावरणावर नांगर फिरवण्यासाठी प्रशासन आणि काही राजकारण्यांच्या मदतीने वापरले जात असलेले पाशवी बळ पाहून दयानंद व्यथित झाले. पूर्ण विचारांती हा लढा न्यायालयाच्या पातळीवर लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

        ही लढाई नक्कीच सोपी नव्हती. सुरुवातीच्या टप्प्यात मायनिंग समर्थकांनी फारशी दखल घेतली नव्हती; मात्र न्यायालयाने इको-सेन्सिटीव्हबाबत आदेश काढत राज्याला सूचना केल्यानंतर वातावरण बदलले. स्टॅलिन आणि त्यांच्या याचिकेबाबत अपप्रचार सुरू झाला. इको-सेन्सिटिव्ह झाल्यास घराची दुरुस्तीही करता येणार नाही, जगणे कठीण होईल, अशा अफवा पसरवल्या गेल्या. स्टॅलिन यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या. सिंधुदुर्गातील निसर्ग समृद्ध जीवनशैली जपली जावे यासाठी पदरमोड करून संघर्ष करणा­या स्टॅलिन यांच्यासाठी हा क्षण नाउमेद करणारा होता. न्यायालयाच्या आदेशावरही राज्य सरकारने काहीच हालचाल केली नव्हती. पश्चिम घाट अभ्यासासाठी नेमलेल्या माधव गाडगीळ अभ्यास समितीचा अहवाल आला. यात स्टॅलिन यांच्या संघर्षातील २५ पैकी ब­याच गावांचा इको-सेन्सिटिव्ह म्हणून विचार व्हावा, यासाठीचा उल्लेख होता. यावर नेमलेल्या कस्तुरीरंगन उच्चस्तरीय समितीने आपला नवा अहवाल दिला. यात सर्वाधिक पर्यावरण समृध्दी असलेल्या अख्ख्या दोडामार्ग तालुक्याला वगळण्यात आले होते. पर्यावरण जपण्याच्या या लढ्याला काही स्वार्थी राजकारणी, प्रशासनातील अधिकारी यांची साथ असल्याचे दिसून आले. स्टॅलिन आणि सहका­यांनी माहितीच्या अधिकारात हजारो कागदपत्रे मिळविली. त्याचा अभ्यास केला. यावेळी वाघांच्या संवर्धनासाठी कॉरिडॉर समृध्द राखण्यासंदर्भातील एक अहवाल त्यांच्या हाती लागला. तो लालफितीत गुंडाळून ठेवला होता. त्याचाच आधार घेत मांगेली ते आंबोली हा वाघाचा कॉरिडॉर संरक्षित करा, अशी याचिका वनशक्तीमार्फत उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. तारीख पे तारीखचा प्रवास करत प्रचंड संघर्षातून काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने या संदर्भात निर्णय दिला. न्यायमूर्ती नितीन जामदार व न्यायमूर्ती एम.एम.साठे यांच्या खंडपीठाने संबंधित २५ गावे इको-सेन्सिटिव्ह एरिया म्हणून घोषित करणे आवश्यक असल्याने राज्याने तसा प्रस्ताव केंद्राला सादर करावा. पुढच्या चार महिन्यांत या आदेशाची अमंलबजावणी करावी, असे आदेश दिले. यामुळे ठरलेल्या मुदतीत राज्याला पावले उचलणे भाग पडणार आहे.

     दोडामार्ग तालुक्यातील भेकुर्ली, कुंभवडे, खडपडे, तळकट, झोळंबे, कोलझर, शिरवल, कुंब्रल, घारपी, फुकेरी, पणतुर्ली, उगाडे ही गावे तर सावंतवाडी तालुक्यातील केसरी, फणसवडे, उडेली, दाभील, नेवली, सरमळे, ओटवणे, असनिये, पडवे माजगाव, तांबोळी, डेगवे, कोनशी, भालावल. ही गावे इको-सेन्सिटिव्ह एरिया म्हणून जाहीर करण्याचे आदेश निघाले आहेत. तो योग्यरित्या राबविण्याची गरज आहे. पर्यावरण, निसर्ग आणि येथील भूमिपुत्र हे हातात हात घालून समृध्द जीवन जगण्याची संधी न्यायालयाच्या आदेशामुळे मिळाली आहे. या भागात मायनिंग व अन्य प्रकल्पांची टांगती तलवार कायमची दूर होणार आहे. निसर्गाला जपत पर्यावरण पूरक अनेक उद्योग व्यवसायातील संधी स्थानिक भूमिपुत्रांची वाट पाहत आहेत.

    संवेदनशील स्थानिक ग्रामस्थ, स्टॅलीन दयानंद यांच्यासारखे खंबीर अभ्यासक वनशक्ती संस्थेच्या माध्यमातून न्यायालयीन लढा जिंकले आहेत ही नक्कीच समाधानकारक आणि दिलासा देणारी बाब आहे. दिवसेंदिवस ग्लोबल वॉर्मिंगच्या चटक्यांनी भाजत असलेला कोकण, वाढीला लागलेले पाण्याचे दुर्भिक्षसातत्याने बदलणारे तापमान या सर्व बाबी मानवी हस्तक्षेपाचे आणि माणसाच्या हव्यासाचेच  देणे आहे. निसर्ग या सर्वांमधून सावध करण्याची संधीही देऊ पाहतोय. आपल्या भागात हा लढा कुठे आहे? असे म्हणून हाताची घडी घालून बसण्यापेक्षा किवा पर्यावरणवादी बघतील असा विचार करून ते लेख लिहीतील तेव्हा ते वाचून फक्त हळहळ व्यक्त करित पुन्हा जर आपण निसर्ग ओरबाडण्यात सहभागी होत असू तर आपल्यासारखे कपाळ करंटे आपणच ठरू. पूर्वजांनी जपलेली समृद्ध जीवनशैली राखण्याची आणि ती पुढील पिढीला हस्तांतरित करण्याची मोठी जबाबदारी इथल्या कोकणवासीयांचीच आहे.

 

Leave a Reply

Close Menu