नगरपरिषद हद्दीतील शाळा चतुर्थीपर्यंत विलगिकरणासाठी

वेंगुर्ला नगरपरिषदेची कौन्सिल सभा आज सोमवारी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झाली. यावेळी उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, मुख्याधिकारी वैभव साबळे, नगरसेवक सुहास गवंडळकर, तुषार सापळे, श्रेया मयेकर, साक्षी पेडणेकर, धर्मराज कांबळी, नागेश गावडे, प्रशांत आपटे, आत्माराम सोकटे, विधाता सावंत, प्रकाश डिचोलकर, शितल आंगचेकर, पूनम जाधव, कृतिका कुबल, स्नेहल खोबरेकर आदींसह प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.

     कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला न.प.हद्दीतील शाळा संस्थात्मक विलगिकरणसाठी ताब्यात घेण्यात आल्या होत्या. मात्र आता काही शाळा व्यवस्थापन समित्या मुलांना शाळेत पाठविण्यासाठी शाळा ताब्यात देण्याची विनंती करीत आहेत. मात्र गणेश चतुर्थी कालावधीत मोठ्या प्रमाणात चाकरमान्यांचे लोंढे शहरात येणार आहेत. त्यामुळे अशा येणा-या चाकरमान्यांना विलगिकरण कक्षाची कमतरता भासणार आहे. त्यामुळे गणेश चतुर्थी कालावधीपर्यंत तरी शहरातील शाळा विलगिकरण कक्षासाठी वापरण्याचे ठरले.

      पावसाळा सुरु होऊनही विहिरींचे निर्जंतुकीकरण व डास प्रतिबंधात्मक फवारणी करण्यात आली नाही, याबाबत प्रशासनास वारंवार का सांगावे लागते ? असा सवाल नगरसेवक प्रशांत आपटे यांनी उपस्थित करीत लवकरात लवकर टीसीएल पावडर घरोघरी आपल्या कर्मचा-र्यांमार्फत व्यवस्थित पॅकिंग करून पोहचविण्यात यावी, शौचालय टाक्यांवर जाळी बसविण्यात यावी व फवारणीसाठी छोट्या स्प्रे पंपाऐवजी चांगल्या दर्जाचे स्प्रे पंप वापरण्यात यावेत, अशी सूचना आपटे यांनी मांडली, याबाबत योग्य कार्यवाही करण्याचे प्रशासनामार्फत सांगण्यात आले.

      स्वच्छ महाराष्ट्र डीपीआरमधील मंजूर निधीतून कचरा गोळा करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या ट्रायसिकल या चालविण्यास कठीण व शहरात इतरत्र वापरण्यास योग्य नसल्याचे संबंधित ठेकेदारास कळविण्यात आले होते. त्यानुसार त्याची दुरुस्ती ठेकेदारामार्फत करण्यात आली होती.सध्या प्रक्रिया केंद्रामध्ये कचरा वाहून नेण्याव्यतिरिक्त शहरामध्ये त्याचा वापर होत नाही. याबाबत नगरसेवक तुषार सापळे यांनी आक्षेप घेत ट्रायसिकल खरेदीचे देयक अदा न करता ठेकेदारास परत करण्यात यावीत, असे ठरले.

      वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालय येथील प्रयोगशाळा विभागाला विविध तपासण्यासाठी आवश्यक असलेला सेल काऊंटर नादुरुस्त असल्याने न.प.मार्फत नवीन मशीन मिळावी, याबाबत रुग्णालयाकडून मागणी करण्यात आली होती. याबाबत सद्यस्थितीत मशीनची परिस्थिती लक्षात घेऊन दुरुस्तीबाबत किंवा नवीन मशीन खरेदीबाबत, मशीनसाठी लागणारा इतर खर्च वगळून नवीन मशिनबाबत तज्ज्ञांचे मत घेऊन उपलब्ध करून देण्याचे ठरविण्यात आले.

      मृत्यू दाखले, जन्म दाखले वेळेत मिळत नाहीत. याबाबत दाखले उपलब्ध व्हावेत, अशी सूचना कृतिका कुबल, प्रकाश डिचोलकर यांनी केली.याबाबत ब-याचदा अर्जदाराचे अर्ज परिपूर्ण नसतात. नागरिकांनी अर्जामध्ये दिलेल्या तारखा व न.प.रेकॉर्डमधील तारखांमध्ये तफावत आढळून येते, त्यामुळे संबंधित दाखले देण्यास विलंब होतो. तरीही नागरिकांमध्ये समन्वय साधून वेळेत दाखले देण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे मुख्याधिकारी यांनी सांगितले.

      डॉन्टस कॉलनी भागात गॅस पाईप लाईनसाठी करण्यात आलेल्या खोडाईमुळे गाड्या रुतण्याचे प्रकार होत आहेत, याबाबत योग्य ती कार्यवाही न झाल्यास आपल्या वॉर्डमध्ये खोदाई करण्यास देणार नाही, असे नगरसेविका शितल आंगचेकर यांनी सांगितले. याबाबत त्वरित उपाययोजना करण्यात येतील, असे मुख्याधिकारी साबळे यांनी सांगितले.

      वेंगुर्ला नगरपरिषद क्रिकेट स्टेडियमचे आउटफिल्ड लेव्हल करून त्यावर ग्रास लावणीच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या कामास मान्यता देण्यात आली. यावेळी विद्युत लाईनवरील झाडी तोडणे, आनंदवाडी येथील सांडपाणी, वॉर्डमध्ये आवश्यक इलेक्ट्रिक पोलची यादी आदी विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. यावेळी प्राप्त अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली.

        वेंगुर्ला नगरपरिषदेने कोरोना प्रादुर्भाव कालावधीपासून आतापर्यंत नागरिकांशी समन्वय साधून अहोरात्र मेहनत घेऊन शहरास कोरोनामुक्त ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावणा-या मुख्याधिकारी वैभव साबळे, नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्याबरोबरच कर्मचा-यांचे अभिनंदन करण्यात आले. साबळे व गिरप यांच्यासह कार्यालयीन अधिक्षक संगिता कुबल यांनी विशेष मेहनत घेतल्याबद्दल सभागृहाच्यावतीने या सर्वांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कोरोना कालावधीत सहकार्य करणा-या सर्व घटकांचे नगराध्यक्ष दिलीप गिरप व मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी आभार मानले व यापुढेही सहकार्य करण्याचे आवाहन केले.

Leave a Reply

Close Menu