कवी मंगेश पाडगांवकर बालोद्यान

वेंगुर्ल्याचा पाऊसया कवितेच्या माध्यमातून वेंगुर्ल्याची ओळख सातासमुद्रापार नेणा-या प्रसिद्ध कवीवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या स्मृती जपण्यासाठी वेंगुर्ला नगरपरिषदेने पुढाकार घेतला असून त्यांनी उभारलेल्या चिल्ड्रन प्ले ग्राऊंडला कवीवर्य मंगेश पांडगावकरयांचे नाव देण्यात आले आहे. यासाठी जिल्हा वार्षिक योजना युडी-६ अंतर्गत प्राप्त झालेल्या सुमारे ५० लाख रुपयांच्या निधीतून या बालोद्यानाचे काम पूर्णत्वास आले आहे. 

      मुलांसाठी आणि ज्येष्ठांसाठी विरंगुळ्याचे ठिकाण म्हणून शहरातील उद्याने महत्त्वाची भूमिका बजावत असतात. यासाठी शहरात अस्तित्वात असलेल्या उद्यानांचा कालानुरुप पुर्नविकास करण्याचे नगरपरिषदेने ठरविले होते. त्यानुसार घोडेबांव उद्यानात अबालवृद्धांसाठी सर्वसमावेशक असा विकास, मानसी उद्यानाचा नाना-नानीपार्क ही संकल्पना समोर ठेऊन तर कॅम्प येथील त्रिकोणीगार्डनचा फुडपार्कया थिमवर विकसन सुरु आहे. या तिन्ही अस्तित्वातील बालोद्यांनासोबतच मल्टिपर्पज हॉल शेजारी मंगेश पाडगांवकर बालोद्यानचे कामकाज पूर्णत्वास आले आहे. लहान मुलांसाठी जंपिग रोप, बंदिस्त फुटबॉल मैदान, विविध आकर्षक खेळ, वाघ, मोर यांचे आकर्षक स्टॅच्यू आदी लहान मुलांबरोबरच पालकांचेही लक्ष वेधून घेणारे आहेत. वाहत्या पाण्यातील मजेसोबत धबधब्यांमध्ये मुले दगडावर चढून त्याचा आनंद लुटू शकणार आहेत. यामध्ये या कठड्यावरुन खाली उडी मारली तरी मुलांच्या अंगास दुखापत होणार नाही असा जंपिग रोपही साकारण्यात आला आहे. या गार्डनमध्ये बोअरवेल मारण्यात आली असून जलक्रिडेसाठी त्याचा वापर केला जाणार आहे. या गार्डन बाहेरील कंपाऊंडला धातूच्या प्लेटमध्ये हत्ती, मांजर, पशुपक्षांचे आकार लहान लहान छिद्रांनी कोरल्यामुळे त्या बागेच्या सुशोभिकरणात भर पडली आहे.

      मंगेश पाडगांवकर यांची बालकाव्ये लहान मुलांसोबत मोठ्यांनाही भूरळ पाडणारी अशीच आहेत. वेंगुर्ल्याचा पाऊस‘, ‘जगणं सुंदर आहे‘, ‘वेडं कोकरु‘, ‘खाली डोकं वर पाय‘, ‘नसलेल्या आजोबांचं असलेलं गाणं‘, ‘गाणं जगण्याचं‘, ‘खरं की काय‘, ‘सांगा कसं जगायचं‘, ‘भातुकलीच्या खेळामधली‘, ‘प्राजक्ताची फुलेअशी जवळजवळ १८ कवितांनी बाग सजली आहे. बालमन जपताना त्याच्या कलागुणांनाही वाव मिळावा यासाठी या बालोद्यानात खुले व्यासपिठ व नाट्यगृहासारखी बैठक योजना साकारली आहे.

      ‘स्वच्छतेकडून समृद्धीकडेअसे ब्रिदवाक्य घेऊन स्वच्छतेमध्ये कार्यरत असलेल्या वेंगुर्ला नगरपरिषदेने या बालोद्यानातही स्वच्छतागृह बांधले आहे. असे हे सर्व सोयींनीयुक्त असलेले बालोद्यान लवकरच बालचमुच्या व पालकांच्या मनोरंजनासाठी खुले होणार आहे. याचबरोबरच आपल्या साहित्यातून वाचकांच्या मनावर अधिराज्य निर्माण केलेल्या वेंगुर्ल्याच्या सुपुत्राच्या स्मृती वेंगुर्ला नगरपरिषदेने या बालोद्यानाच्या निमित्ताने जपल्या आहेत.

Leave a Reply

Close Menu