सत्ता असो किंवा नसो, देशासाठी काही कार्यकर्ते तळमळीनं काम करत राहतात. पन्नास वर्षांपूर्वी सत्ता कुठेही दृष्टीक्षेपात नसताना, राजकीय सहकार्य मिळत नसतानाही अनेक वर्ष विरोधी बाजूला राहून, संघ विचाराचे अनेक नेते निष्ठेनं समाजकार्य करत होते. त्यापैकीच एक ’रामभाऊ म्हाळगी’.
रामभाऊ म्हाळगी यांचा जन्म 9 जुलै 1921ला पुण्यात झाला. साठ वर्षांच्या अल्पायुष्यामध्ये त्यांनी अनेक रेकॉर्ड केले असं म्हणायला हरकत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते प्रचारक होते, केरळला जाऊन त्यांनी संघ कार्य केलं होतं. जनसंघ या पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले सरचिटणीस आणि जनसंघाचे विधानसभेतले ते पहिले आमदार होते. लोकप्रतिनिधींनी आपल्या कामाचा अहवाल मतदारांना दिला पाहिजे यासाठी रामभाऊंनी आपला वार्षिक कार्य अहवाल त्याकाळात जनतेसमोर ठेवायला प्रारंभ केला होता. रामभाऊ म्हाळगी दोन वेळा आमदार राहिले, दोन वेळा खासदार राहिले. रामभाऊ उच्चशिक्षित होते. वकिली करायचे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचेही त्यांनी कार्य केलं होतं. खासदार म्हणून 1977 आणि 80 साली ते ठाण्यातून निवडून गेले होते. आणीबाणीच्या काळात त्यांना मिसा खाली अटकही झाली होती. अशा नेत्याला आज तरुण वर्ग कदाचित ओळखत नसेल परंतु त्यांच्या नावानं “रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी“ ही प्रशिक्षण संस्था, कात्रज, कडूसला माध्यमिक शाळा, त्यांच्या नावाने अनेक व्याख्यानमाला, ठाणे, पुणे इथल्या रस्त्याना त्यांचं नाव देऊन त्यांच्या स्मृती जोपासल्या गेल्या आहेत यातच त्यांचं मोठेपण सिद्ध होतं.
1980 ला ठाण्याहून खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर ते म्हणत असत की मी निवृत्त होईन किंवा राजकीय संन्यास घेईन, परंतु तरीही राजकीय कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम मी सुरू ठेवीन. राजकीय क्षेत्रात सुद्धा प्रशिक्षित कार्यकर्त्यांची गरज आहे हे त्यांनी तेव्हाच ओळखलं होतं. समाजजीवनावर मोठा प्रभाव टाकणाऱ्या नेत्यांना प्रशिक्षण मिळाले पाहिजे असं त्यांना वाटत असे.
रामभाऊ म्हाळगी हे दोनदा पुण्यातून आमदार झाले होते तर ठाण्यातून दोन वेळा खासदार झाले होते.आमदार खासदार अशी पदे मिळूनसुद्धा अतिशय साधं असं हे व्यक्तिमत्त्व होतं. एक साधं धोतर, झब्बा असा त्यांचा पोशाख असे. त्यांची स्वतःची गाडीसुद्धा नव्हती. ठाण्यातल्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना रेल्वे, एसटीने प्रवास करताना पाहिलं आहे. असेच त्यांच्याबरोबर काम करायला मिळालेल्या ठाण्याचे माजी उपमहापौर सुभाष काळे याने काही आठवणी सांगितल्या. ते म्हणाले की 1977 साली जनता पार्टी स्थापन झाल्यानंतर ठाण्यातून म्हाळगींना तिकीट मिळालं. ते मूळचे पुण्याचे, त्यांच्याशी माझी भेट पहिली भेट निवडणुकीच्या कामांनीच झाली. त्या वेळी ठाणे हा संपूर्ण देशातला सर्वाधिक मोठा मतदारसंघ होता. ठाण्यापासून ईगतपुरी पर्यंत या मतदारसंघाचा पसारा होता. त्यातही शहरी-ग्रामीण, आदिवासी भाग अशा विविध प्रकारचे गट या मतदारसंघात होते. 1977 ला आणीबाणीनंतर खूप विरोधी मोठी लाट आली होती आणि त्यामुळे खूप मोठ्या मताधिक्क्याने म्हाळगी ठाण्यातून निवडून आले. त्यांच्या खासदारकीच्या कारकिर्दीत त्याने अख्खा ठाणे जिल्हा पिंजून काढला. त्यांचा संपूर्ण महिन्याचा कार्यक्रम ठरलेला असे. जिल्ह्यातील प्रत्येक भागात ते फिरायचे आणि एखादा दिवस ते पुण्याला जायचे. त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना आलेल्या प्रत्येक निवेदनावर प्रत्येक पत्रावर त्यांच्या सहीचं उत्तर आणि पोच जात असे. त्यांची स्मरणशक्ती अफाट होती. एखादा कार्यकर्ता भेटला की त्याचं नाव, तो राहतो कुठे, त्याच्या कुटुंबाची सर्व माहिती ते विचारत असत. त्यांना तो पुन्हा भेटला की त्याला त्याच्या नावाने हाक मारायचे, चौकशी करायचे. त्यामुळे प्रत्येकाला ते आपलेसे वाटत. 1980 ला खरं तर इंदिरा गांधी लाट आली होती.अनेक ठिकाणी जनता पार्टीचा पराभव झाला होता. परंतु रामभाऊ म्हाळगी मात्र ठाणे मतदारसंघातून दहा हजार मतांनी निवडून आले होते. त्यांच्या कार्यकाळात ठाणे हा मुख्यतः रेल्वेने मुंबईशी जोडला गेलेला होता. मुख्य वाहतुकीचं साधन रेल्वे होतं. ठाणे, मुंबई उपनगरी रेल्वेच्या अनेक समस्या होत्या. या समस्यांसाठी त्यांनी खूपच लढा दिला. रेल्वेशी भरपूर पत्रव्यवहार केला. अनेक आंदोलनं केली आणि ठाणे रेल्वेच्या अनेक समस्यांना त्यांनी वाचा फोडली.
आणखी एक दुसरा विषय म्हणजे कुपोषण, ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी पाड्यांमध्ये आरोग्य केंद्रच नाहीत तर आदिवासींच आरोग्य कसं राखले जाणार? हे पाहिल्यावर ग्रामीण भागातल्या आरोग्य सुविधांवर त्यांनी लक्ष केंद्रित केलं होतं. खरं तर मी कॉलेज विद्यार्थी होतो. 1970 लाच निवडणुकीच्या कामामुळे म्हाळगी यांच्याबरोबर काम सुरू केलं होतं. त्यांना पाहून, त्यांचा आदर्श ठेवूनच मी राजकारणात प्रवेश केला. कारण ते खरोखरच एक आदर्श राजकीय नेतृत्व होते. ते नेहमी म्हणायचे की कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करण्याची गरज आहे. कार्यकर्ता डोक्यावर बर्फ, तोंडात साखर आणि पायाला भिंगरी लावणारा असला पाहिजे. माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते म्हाळगी मुळे ठाणे जिल्ह्याला मिळालेले आहेत. त्यांना अल्पायुष्य लाभलं. ते अजून दहा वर्षे राजकारणात असले असते तर ठाण्यातील राजकारण खूपच वेगळं घडलं असतं असं मला वाटतं. असं सुभाष काळे सांगतात.
ठाण्याचे भाजपा आमदार संजय केळकर यांना तरुणपणात त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली होती. केळकर म्हणाले की माझ्या जीवनातलं प्रेरणास्थान रामभाऊ म्हाळगी आहेत. 3 रामानी आमच्या पक्षात आदर्श निर्माण केला. रामभाऊ म्हाळगी, राम कापसे, आणि राम नाईक. त्यातील या रामाचा सहवास आम्हाला लाभला हे आमचे भाग्यच म्हणावे लागेल. मी महाविद्यालयात शिकत असताना प्रचाराच्या निमित्ताने त्यांच्याशी भेट झाली. मी आलो की ते मला “संजय उवाच“ असं म्हणायचे. खासदार झाल्यावर ठाण्यातल्या जांभळी नाक्यावरच्या कार्यालयामध्ये ते कामाला येत असत. पुण्याला जायचं असलं की रात्री उशिराची पॅसेंजर ट्रेन पकडून पुण्याला जायचे व सकाळपासून पुण्यातील काम करायचे. दिवस वाया घालवत नसत. मला आठवतं, त्यांचा साधेपणा आणि सरळपणा इतका होता की एकदा ठाणे स्टेशनवर आम्ही त्यांना पोचवायला गेलो असता, टीसीच त्यांच्याकडे लक्ष नव्हतं. टीसीसमोर प्रवाशांचा गराडा पडला होता. बराच वेळ टीसीनी दाद दिली नाही, हे पाहून मीच पुढे जाऊन टीसीला पकडलं आणि एक खासदार तुमच्याकडे केव्हापासून आपली जागा विचारत आहेत, ही गोष्ट जरा खडसावूनच निदर्शनाला आणून दिली. त्यानंतर टीसीनी त्यांची जागा दिली. परंतु खासदार असलेला एक माणूस या प्रसंगी एरवी कसा वागला असता? आणि रामभाऊंनी तो प्रसंग किती साधेपणानं घेतला, हे बघून, लोकप्रतिनिधी असला तरी जमिनीवर राहा हे त्यांनी त्यांच्या वागण्यातून प्रत्यक्ष आम्हाला दाखवून दिलं होतं. छोट्या छोट्या गोष्टींचाही ते विलक्षण पाठपुरावा करत असत. आज ठाणे ग्रामीण भागात मी जेव्हा जातो तेव्हा अनेक जण त्यांच्या स्वतःच्या सहीने आलेलं पत्र आम्हाला दाखवतात आणि म्हणतात त्या काळी आमच्या तक्रारीची नोंद खासदार म्हाळगी यांनी अशाप्रकारे घेतली होती. त्यांच्या स्वतःच्या सहीच उत्तर आम्हाला आले होते. असा हा सर्वसामान्य नागरिकांशी जोडून घेतलेला लोकप्रतिनिधी होता. त्यांच्या निधनानंतर पुतळा उभारून त्यांचे स्मारक बांधण्यापेक्षा त्यांच्या वैचारिक स्मृति जपल्या जाव्यात म्हणून 1987 सालापासून ठाण्यामध्ये आम्ही रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला सुरू केली आहे. त्याची सुरुवातही अशीच झाली. आम्ही सर्व तरुण कार्यकर्ते मंडळी एकदा ग्रामीण भागात एकत्र जमलो होतो. त्यावेळी रामभाऊंचं स्मारक या विषयावर चर्चा झाली. पुतळा उभारण्यापेक्षा त्यांच्या नावाने वैचारिक व्यासपीठ सुरू करून त्यांना अमर करूया, असं सर्वानुमते ठरलं. आज ठाण्यातली रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला महाराष्ट्रभर लोकप्रिय असून अत्यंत दर्जेदार व्याख्यानमाला म्हणून गणली जाते. दर वर्षी सात दिवस सात उत्कृष्ट व्याख्यान आयोजित केली जातात. इतरत्र व्याख्यानमालेला श्रोतावर्ग कमी होऊ लागला आहे पण या व्याख्यानमालेला मात्र ठाणेकर तुडुंब गर्दी करतात. उत्तन इथल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक रवींद्र साठे यांनी सांगितलं की पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी 1968 मध्ये राजकारणामध्ये येणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षणाची गरज अधोरेखित केली होती. तीच पुढे रामभाऊ म्हाळगी यांच्याही लक्षात आली होती. राजकारणातल्यांसाठी सुद्धा प्रशिक्षण केंद्र असावे अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे 1982 ला त्यांचा मृत्यू झाल्यावर त्याच वर्षी त्यांच्या नावाने रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीची स्थापना झाली. या योजनेत आज लाखो कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्यपासून खासदारांपर्यंत अनेकांना प्रशिक्षण दिलं गेलं आहे. रामभाऊंच्या साधेपणाचं आणखी एक उदाहरण म्हणजे त्या काळी प्रेशर कुकर नुकताच बाजारात आला होता. त्यांच्या पत्नी विजयातार्ईंनी त्यांच्याकडे प्रेशरकुकर अशी मागणी केली त्यावर रामभाऊ म्हणाले, प्रेशर कुकर घ्यायला हरकत नाही पण त्यामुळे वाचणाऱ्या वेळेच तू काही नियोजन केलं आहेस का?“ म्हणजे प्रत्येक गोष्टीचा उपयोग आणि वेळेचे नियोजन याकडे त्यांचा कटाक्ष असे हे दिसून येतं. विधिमंडळतलं त्यांचे कार्यालय इतक टापटीप असे की विरोधी पक्षातल्या एखाद्याला जरी काही कागदपत्र हवी असतील तर तो म्हणायचा की रामभाऊंच्या कार्यालयात जा, तिथे तुला कोणताही कागद नक्कीच मिळेल. रामभाऊ यांना संगीत, कलेची सुद्धा खूप आवड होती. कार्यालयीन काम करतानासुद्धा ते टेपरेकॉर्डरवर चांगलं संगीत ऐकत असत, असं पाहणारे सांगतात. निवडणुकीच्या वेळी निवडून आलो तर काय करू? आणि निवडून आलो नाही तर काय करू? या दोन्ही गोष्टींची योजना त्यांनी केलेली असे, अशा प्रकारचे खासदार खरोखरच आज दुर्मिळ झाले आहेत.
आणि म्हणूनच 9 जुलै 1919 ला जन्म झालेल्या रामभाऊ म्हाळगी यांच्या विचारांचा जागर शंभर वर्षांनी ही करण्याची आपल्याला गरज आहे. शताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्यांचे आदर्श विचार आणि मूल्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचायची गरज आहे. रामभाऊ म्हाळगी यांना विनम्र अभिवादन.
– शिबानी जोशी, 9820317562