१४ मे १८ वर्षाखालील बाल कामगारांना प्राथमिक शालेय शिक्षण हे अत्याश्यक असल्याने त्यांना शिक्षणापासून कुणीही वंचित ठेवू नये. यासाठी शासनाने कायद्याने तसा अधिकार बाल कामगारांसाठी केलेला आहे. त्यामुळे कोणतेही व्यावसायिक अशा मुलांना या कायद्याचे उल्लंघन करून स्वःतचा स्वार्थ साधून शकत नाहीत. तसे झाल्यास संबंधित व्यावसायिकांस कायद्याने शिक्षा होऊ शकते. त्यामुळे व्यावसायिकांनी त्याची दक्षता घ्यावी. असे प्रतिपादन कृषिभूषण पुरस्कार प्राप्त प्रज्ञा परब यांनी केले.
महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्था वेंगुर्ला व वेंगुर्ले दिवाणी न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने बालकामगार या सामाजिक अनिष्ट प्रथेचे समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने समाजामध्ये जागृती निर्माण व्हावी. याकरीता शासनाच्या विविध विभागामार्फत व विविधस्तरावर प्रयत्न केले जात आहेत. १२ जून जागतिक बालकामगार विरोधी दिनाचे औचित्य साधून कॅम्प येथील काथ्या प्रकपाच्या सभागृहात बाल कामगार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
१४ वर्षाखालील बालकास सर्वच व्यवसाय व प्रक्रियांमध्ये काम करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. १४ ते १८ वयोगटातील किशोरवयीन बालकास धोकादायक व्यवसाय व प्रक्रियामध्ये कामगार ठेवणे हा फौजदारी गुन्हा आहे. फौजदारी गुन्ह्यासाठी ६ महिने ते २ वर्षापर्यंत वाढविता येईल इतक्या तुरुगवासाची शिक्षा किंवा किमान रु. २०,००० व कमाल रु. ५०,००० इतका दंड किवा दोन्हीही शिक्षा मालकास होऊ शकतात. गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास, किमान १ वर्ष ते ३ वर्षापर्यंत वाढविता येईल इतकी तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, असे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन अॅड. श्रध्दा बाबीस्कर यांनी केले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन कृषिभूषण पुरस्कार प्राप्त प्रज्ञा परब यांच्या हस्ते झाले. यावेळी सावित्रीबाई फुले पतसंस्थेच्या चेअरमन प्रवीणा खानोलकर, वैभवी सोकटे व न्यायालयाचे कर्मचारी तसेच सुप्रिया परब, संचिता परब, स्नेहल परब, मनाली परब, समृध्दी परब, माधुरी परब, राजश्री परब, प्रियांका कोयंडे, ऋतुजा शेटकर, कल्पना कांबळे, अंजली गावडे यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सर्व औद्योगिक संघटना, असोसिएशन, व्यापारी असोसिएशन, हॉटेल असोसिएशन, क्रिडा-बांधकाम व्यवसायातील मालक असोसिएशन व वीटभट्टी असोसिएशन, सर्व शासकीय, निमशासकीय संस्था, नागरीक यांनीही या अनिष्ट प्रथेचे उच्चाटन करण्याकरीता जनजागृती करुन या मोहिमेत सहभाग नोंदवावा व आपला जिल्हा बालकामगार मुक्त करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन तालुका वकील संघटनेच्या सदस्या अॅड.श्रद्धा बावीस्कर यांनी केले आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी न्यायालयीन कर्मचारी व महिला काथ्या कामगार संस्थेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.