वेंगुर्ला नगरपरिषदेची प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहीर

वेंगुर्ला येथील नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी १० प्रभागातील २० जागांसाठी आज नगरपरिषदेच्य छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आरक्षण प्रक्रिया पार पडली. यावेळी प्रभाग क्रमांक ९ मधील अ जागेसाठी अनुसूचित जाती जमाती सर्वसाधारण असे आरक्षण पडले असून ब जागेसाठी सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाले आहे. तर उर्वरित ९ प्रभागांमध्ये प्रत्येकी अ जागा सर्वसाधारण महिला राखीव आणि ब जागेसाठी सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाले आहे. म्हणजेच निवडणूक प्रक्रियेत दहा जागा महिलांसाठी, तर दहा जागा पुरूष, त्यातील एक जागा ही अनूसुचित जाती-जमातीसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कोणीही पुरुष किंवा स्त्री आपले नशिब आजमावू शकणार आहेत.

      आगामी काळात होणा-या नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही आरक्षण प्रक्रिया निवडणुक निर्णय अधिकारी तथा रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी अविषकुमार सोनोने व मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे आदींच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी कार्यालयीन अधिक्षक संगीता कुबल, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, तसेच माजी नगरसेवक सुहास गवंडळकर, तुषार सापळे, प्रशांत आपटे, विधाता सावंत, प्रकाश डिचोलकर यांच्यासह प्रितम सावंत, हनीफ म्हाळुंगकर, सोमनाथ टोमके आणि नगर परिषद अधिकारी आदी उपस्थित होते.

      दरम्यान, या आरक्षणावर हरकती घेण्यासाठी १५ जून ते २१ जून पर्यंत मुदत ठेवण्यात आली आहे. तर हरकती आल्यास किंवा न आल्यास त्यावर चर्चा होऊन अंतिम आरक्षण २९ जून रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सोनोने यांनी सांगितले.

      बदललेल्या प्रभाग रचनेनुसार प्रत्येत प्रभागमध्ये एक पुरूष आणि एक महिला, असे आरक्षण असल्यामुळे तुर्तास तरी विद्यमान कोणत्याही उमेदवाराला फटका बसला किंवा फायदा झाला, असे म्हणता येवू शकत नाही. मात्र वेंगुर्ला शहरातील विद्यमान ९० टक्के नगरसेवक पुन्हा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.

Leave a Reply

Close Menu