हिदी प्रचार सभेतर्फे आदर्श हिदी अध्यापक पुरस्कार वितरण
हिदी भाषेला मोठी ज्ञानपरंपरा व साहित्यिक पार्श्वभूमी लाभली असून, विचारांचे आदान प्रदान करण्याची संपूर्ण भारतीय उपखंडातील ही एक महत्त्वाची भाषा आहे. देशातील आजच्या व्यापार जगताची मुख्य भाषा सुद्धा हिदीच आहे. त्यामुळे मातृभाषा मराठी व ज्ञानभाषा इंग्रजी सोबतच तितक्याच आत्मियतेने आपण हिदी भाषा आत्मसात केली असे उद्गार रा.कृ.पाटकर व ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक व ज्येष्ठ सामाजिक, सांस्कृतिक कार्यकर्ते आत्माराम सोकटे यांनी पुरस्कार वितरण प्रसंगी काढले.
वेंगुर्ला येथील हिदी प्रचार सभेचा वर्धापनदिन सोहळा व आदर्श हिदी अध्यापक पुरस्कार वितरण सोहळा नगरवाचनालयाच्या सभागृहा संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपिठावर संस्थेचे अध्यक्ष का.हु.शेख, राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार पुरस्कार विजेते शिक्षक सत्यवान पेडणेकर, आसोली हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका विशाखा वेंगुर्लेकर, कार्यवाह महेश बोवलेकर, आदर्श शिक्षक विद्याधर कडुलकर, चित्रा प्रभूखानोलकर आदी उपस्थित होते.
यावेळी कै.सौ.सुशिला श्रीकृष्ण सौदागर स्मृती आदर्श हिदी अध्यापिका पुरस्कार उभादांडा क्र. १च्या पदवीधर शिक्षिका मनाली मंगेश कांबळी यांना, कै.श्रीपाद कृष्ण पुराणिक स्मृती आदर्श हिदी अध्यापिका पुरस्कार सरस्वती विद्यालय आरवलीच्या श्रद्धा सोनू नाईक-तांडेल यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महेश बोवलेकर यांना वेगवेगळ्या पाच संस्थांनी आदर्श शिक्षक म्हणून गौरविल्याबाबत त्यांचाही संस्थेतर्फे शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तर संस्थेतर्फे घेतलेल्य हिदी विषयाच्या विविध परिक्षांमधून सुयश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व रोख रक्कमेची पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
आज आपण दक्षिण भारतात गेलो तर तिथे केवळ इंग्रजी आणि हिदी या दोनच भाषांमधून आपण संवाद साधू शकतो. त्यामुळे इंग्रजी भाषेइतकाच आग्रह ज्ञानभाषा म्हणून हिदी भाषेसाठी धरला पाहिजे आणि भाषांच्या व्याकरणिक बाबींकडे काटेकोरपणे लक्ष दिला पाहिजे असेही श्री.सोकटे यांनी सांगितले.
शिक्षक व इतर शाकसकीय कर्मचा-यांना, दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षांना हिदी विषय घेऊन उत्तीर्ण होण्याची अट शासनाने अनिवार्य केली आहे. ज्या कर्मचा-यांना बोर्ड परीक्षेला हिदी विषय घेता आला नव्हता अशा शासकीय कर्मचारी, शिक्षक यांना आपल्या संस्थेद्वारा हिदी विषयाच्या पंडित पर्यंतची परीक्षा देता येतात अशी माहिती का.हु.शेख यांनी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश बोवलेकर, सूत्रसंचालन जि.प.आदर्श शिक्षिका चित्रा प्रभूखानोलकर यांनी तर आभार विद्याधर कडुलकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गुरुदास मळीक, दिपाली परब व पूजा धावडे यांनी परिश्रम घेतले.