गुरुवर्य केळुसकर ग्रंथसंपदा पुनर्प्रकाशन-वितरण सोहळा

वेंगुर्ला-केळुसचे सुपुत्र कै. कृष्णराव अर्जुन केळुसकर गुरुजी हे बहुजन समाजाचे नसून महाराष्ट्राचे आहेत. बहुजन समाजाला संघटीत, जागृत करण्याचे काम गुरुवर्यांनी केले. केळुसकर गुरुजींनी 48 ग्रंथांचे लिखाण केले आहे. त्यातील फक्त 21 ग्रंथ मिळाले आहेत. त्यांचा इतिहास पुढील पिढीसमोर येण्यासाठी संघटीतपणे प्रयत्न करा असे आवाहन ग्रंथसंपदाचे प्रा. राजन गवस यांनी केले. नाईक मराठा मंडळ (मुंबई) आयोजित गुरुवर्य कै. कृष्णराव अर्जुन केळुसकर ग्रंथसंपदा पुनर्प्रकाशन आणि वितरण सोहळा कुडाळ येथील महालक्ष्मी सभागृहात झाला.

      प्रारंभी गुरुवर्य केळुसकर यांच्या प्रतिमेला प्रा. गवस यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. दिनेश पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. सुनील सांगेलकर यांच्या हस्ते गवस यांचा सत्कार करण्यात आला.

      दिनेश पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील सांगेलकर, उपकार्याध्यक्ष नयन सोनुर्लीकर, संयुक्त कार्यवाह किरण नाईक, मराठी विभागप्रमुख डॉ. प्रा. बाळकृष्ण लळीत, सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. परिमल नाईक, उपाध्यक्ष ॲड. विवेक मांडकुलकर, डॉ. पांडुरंग वजराटकर, किरातच्या संपादक सीमा मराठे, साहित्यीक वृंदा कांबळी, आघाडीचे संपादक नंदकिशोर महाजन, देवळी उत्कर्ष समाजाचे अध्यक्ष सावळाराम अणावकर, केळुसचे लक्ष्मण केळुसकर, सुरक्षा घोंगडे, विकास कुडाळकर, शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, ग्रंथालय प्रतिनिधी, वाचक उपस्थित होते.

      यावेळी गुरुजींच्या अकरा ग्रंथ संपदांचे पुनर्प्रकाशन प्रा. गवस व प्रा. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. विकास कुडाळकर, वसंत केसरकर, सुरक्षा घोंगडे, प्रवीण बांदेकर, सावळाराम अणावकर, सतीश शेणवी, लक्ष्मण केळुसकर, प्रतीक्षा चिपकर, प्रमोद मडकईकर यांना केळुसकर गुरुजींची पुस्तके भेट देण्यात आली. तसेच जिल्ह्यातील वाचनालयांना अकरा ग्रंथसंच भेट देण्यात आले.

      यावेळी प्रा. गवस म्हणाले, गुरुजी सिंधुदुर्गचे आहेत असे सांगायचे आणि त्यांचे एकही साहित्य सिंधुदुर्गात सापडू नये हे योग्य नाही. त्यांची पुस्तके महाराष्ट्रात कोणीही जपून ठेवली नाहीत. आपल्या पुढच्या पिढीसाठी ही पुस्तके जपून ठेवणे ही पुढच्या पिढीला दिलेली देणगी आहे. पहिले शिवचरित्र, बुद्धचरित्र व संत तुकाराम चरित्र गुरुजींनी लिहीले. केळुसकर गुरुजी कोणत्याही जातीचे नव्हे तर तमाम महाराष्ट्र बहुजन समाजाचे होते. त्यांना जातीत बंदिस्त करु नका. सोईचा इतिहास लिहीण्या-वाचणाऱ्यांच्या जमान्यात केळुसकरांचे लिखाण म्हणजे वस्तूपाठ आहे.

      दिनेश पाटील म्हणाले, केळुसकर गुरुजींचा इतिहास आजही जीवंत आहे. इतिहासकारांनी त्यांचा इतिहास लोकांसमोर आणला नाही. पुढचा काळ बदलायचा असेल तर केळुसकर गुरुजींचा आदर्श पुढील पिढीला द्या.

      किरण नाईक म्हणाले, केळुसकरांचे साहित्य क्षेत्रातील काम उल्लेखनीय आहे. सात हजार पानांहून अधिक साहित्य लेखन त्यांनी केले आहे. अजूनही 27 ग्रंथ मिळालेले नाहीत ही शोकांतीका आपल्याला मिळून दूर करायची आहे. केळुसकर समजून घेण्याची गरज आणि जाणीव बाबा भांड यांनी प्रथम करून दिली. एवढ्यावरच न थांबता राजन गवस व स्वतः या ग्रंथशोधनात आमच्या सोबत राहिले. त्यांनी संपादित केलेले हे ग्रंथ आपणा सर्र्वांच्या साक्षीने पुनर्प्रकाशन करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे.

      केळुसकर गुरुजींचा जीवन इतिहास सुनील सांगेलकर यांनी सांगितला. प्रास्ताविक न्हानू नाईक, सूत्रसंचालन मकरंद तोरसकर, तर आभार नयन सोनुर्लीकर यांनी मानले.

Leave a Reply

Close Menu