वेंगुर्ला तालुक्यातील धान्य दुकानदार प्रामाणिकपणे करीत असलेल्या कामाचे बाबतीत समाधान व्यक्त करीत प्रशंसा केली. अशाचप्रकारे चांगले काम करून आपल्या वेंगुर्ला तालुक्याचे नाव राखा असे प्रतिपादन नायब तहसिलदार संदिप पानमंद यांनी धान्यदुकानदारांच्या बैठकीत केले.
वेंगुर्ला तहसिलदार कार्यालयाच्या सभागृहात तालुक्यातील सर्व धान्य दुकानदारांची सभा नायब तहसिलदार संदिप पानमंद यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी पुरवठा विभाग प्रमुख प्रितम वाडेकर, नुतन पुरवठा विभाग प्रमुख अशोक पवार, श्री. पाटील, विक्रांत सुर्यवंशी, वेंगुर्ला तालुका धान्यदुकानदार संघटनेचे अध्यक्ष तात्या हाडये, जेष्ठ धान्यदुकानदार अशोक राणे आदी उपस्थित होते.
तालुक्यात उत्कृष्ट धानदुकान सेवा बजावणा-या वेंगुर्ला तालुका धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष तात्या हाडये, रेडी धान्यदुकान नं. ३ चे धान्यदुकानदार अशोक राणे, उभादांडा धान्य दुकानदार कर्मचारी श्री. आरोलकर यांचा तसेच पुरवठा अव्वल कारकून प्रितम वाडेकर, लिपीक सतीश हराळे, विक्रांत सुर्यवंशी यांचा शाल, श्रीफळ देवून नायब तहसिलदार पानमंद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी तात्या हाडये यांनी धान्य वितरण केलेल्या मालाचे कमिशन लवकर मिळावे. यापूढे ज्या महिन्याचे धान्य वितरण करणार त्याच महिन्यात धान्याचे कमिशन धान्यदुकांनांना मिळण्यासाठी तहसिलदारांनी शासनाकडे प्रयत्न करावेत अशी मागणी केली. प्रितम वाडेकर यांनी आपले अनुभव व कामाची पध्दत सांगितली. धान्य दुकानदार हे थेट जनतेशी निगडीत असल्याने वेळेचेवेळी धान्य खरेदीस धान्यदुकानदार येऊन जनतेस ते वितरण करतात. याबद्दल सर्व धान्यदुकानदारांबाबत गौरवोदगार काढले. रेशन दुकानात काम करणे फार कठीण असते. लांबून दिसायला चांगले असले तरी सर्वांसी जुळवून घ्यावे लागते. सर्वच कार्डधारक सारखे नसतात. रेशनदुकानात काम केल्याशिवाय त्याचा अनुभव येणार नसल्याचे अशोक राणे यांनी सांगितले.