सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन क्षेत्रास चालना देण्यासाठी वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा-वेळागर येथे पंचतारांकित पर्यटन प्रकल्प उभारण्यास ताज ग्रुपच्या इंडियन हॉटेल्स कंपनीला मान्यता देण्याचा निर्णय ९ जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. ५४.४० हेक्टर जमिन भाडेपट्टीवर देण्यात येणार आहे.    

       तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी १९९१मध्ये सिधुदुर्ग जिल्ह्यात तीन पंचतारांकित ग्रुपना १ रुपया भाडेपट्टयाने जमिनी दिल्या होत्या. त्यातील फोमेंतो ग्रुपने आपली आरवली येथे हॉटेल उभे केले. मात्र, ते अद्याप सुरु झाले नाही, तर वेळागर येथील ताज प्रकल्पासाठी प्रस्तावित केलेली जमिन वादात अडकली होती.

     शिरोडा-वेळागर येथील ताज ग्रुपचा पंचतारांकीत प्रकल्प १९९४ पासून प्रस्तावित आहे. त्यावेळी सर्व्हे नं.३९च्या संदर्भात झालेली आंदोलने, आंदोलकांवर पोलिसांनी केलेला अमानुष लाठीहल्ला,न्यायालयात दाखल केलेल्या केसेस, विधीमंडळात झालेल्या चर्चा या सा-याला तब्बल २६ वर्षे उलटली आहेत. तत्कालीन महसुल मंत्री अशोक चव्हाण यांनी सदर प्रकल्पाला भेट देऊन या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रकल्पाला स्थगिती दिली होती. नव्याने ताज प्रकल्पाला महाआघाडी सरकारने ५४.४० हेक्टर जमिन भाडेपट्टयाने देण्याचा निर्णय दिला आहे. या संदर्भात स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा केली असता सर्व्हे नं.३९ च्या बाबतीत ग्रामस्थांचा विरोध कायम असल्याचे समोर आले. गेल्या २५ वर्षात स्थानिकांनी पर्यटन क्षेत्रात बरेच नाविन्यपूर्ण प्रयोग केले आहेत. शासनाचेही पर्यटन प्रकल्पांना पाठबळ मिळत आहे. अशा स्थितीत यापुढे स्थानिक ग्रामस्थ, सर्वपक्षीय नेते यांची भूमिका कशी राहते हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

Close Menu