भाजी मंडई विक्रेत्यांनी बहरली : आठवडा बाजारही भरणार

गेले अनेक दिवस बहुचर्चेत असलेले वेंगुर्ला शहरातील ‘पवनपुत्र भाजी मंडई‘ मार्केट खऱ्या अर्थाने जनतेच्या सेवेसाठी सुरू झाले. व्यापाऱ्यांबरोबर नागरिकांनीही हे देखणे दृश्‍य पाहून समाधान व्यक्त केले. नव्याने विकसित करण्यात आलेल्या या मार्केटचे नुकतेच लोकार्पण झाले आहे. दरम्यान येत्या रविवारपासून शहरातील जुन्या बाजाराच्या ठिकाणीच आठवडा बाजार भरविण्यात येणार आहे, तरी व्यापारी व ग्राहकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे यांच्या सूचनेनुसार कार्यालयीन अधिक्षक संगीता कुबल यांनी केले आहे.

      सुमारे एक वर्ष कालावधीनंतर या ठिकाणी हे भाजी मार्केट पूर्ववत सुरू झाले आहे. या पवनपुत्र भाजी मंडईचे नव्याने काम करण्यात आले आहे. येथून स्थलांतरित झालेले भाजी व्यापारी, विक्रेते व छोटे किरकोळ विक्रेते रस्त्यावरील विक्रेत्यांना या नव्या जागेत अंगारकी संकष्टी दिवशी पुन्हा बसविण्यात आले आहे. नगरपरिषद प्रशासनाने या मंडईमध्ये 100 जागा आखल्या असून त्या ठिकाणी या व्यापाऱ्यांनी बसून व्यापार करायचा आहे. 19 एप्रिल पहिल्या दिवशी शिस्तबद्धरित्या बाजार भरल्याने बाजाराला एक वेगळे रूप आले होते. दररोज सकाळी 6 ते रात्रौ 8 या मुदतीत ही भाजी मंडई सुरु राहणार आहे. न.प.च्या वतीने स्वच्छता राखण्याच्या दृष्टीने हे मार्केट रोज साफ करून पाण्याने धुऊन स्वच्छ करण्यात येणार आहे. एप्रिल, मे महिना हा आंबा, काजू, कोकम, फणस व अन्य फळांचा मौसम असल्याने किरकोळ व्यापाऱ्यांना भाजी मार्केट बंद असल्याने उन्हात रस्त्याच्या कडेला बसावे लागत होते. तसेच विक्रेते रस्त्याच्या कडेला बसत असल्याने वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे पवनपुत्र भाजी मार्केट त्याच ठिकाणी सुरू झाल्याने वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे. भाजी मंडई प्रमाणेच वहातुक व्यवस्थेची समस्या लवकर निकाली लागण्यासाठी वाहनतळही लवकर खुले करावे तसेच मच्छीमार्केट समोरील दुर्र्गंधीबाबत योग्य ती उपाययोजना व्हावी अशी मागणी नागरिक, व्यापाऱ्यांमधून होत आहे.

Leave a Reply

Close Menu