सुरेश ठाकूर यांना ‘अष्टपैलू समाजसेवक पुरस्कार‘ प्रदान

  वैभवशाली श्री देव रामेश्वर ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. श्रीकांत सांबारी यांच्या नावाने यावर्षीपासून प्रथमच सुरू करण्यात आलेला कै. श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक पुरस्कार साने गुरुजी कथामाला मालवण शाखेचे तालुकाध्यक्ष सुरेश ठाकूर यांना संस्थेचे चेअरमन मंदार सांबारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रोख रक्कम ५००० रूपये, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन सुरेश वाडकर, संचालक राजन पांगे, लक्ष्मण आचरेकर, वामन आचरेकर, प्रमोद कोळंबकर, चंद्रकांत कुबल, मनोहर वाडेकर, दिलीप कावले, पांडुरंग वांगणकर, प्रकाश मेस्त्री, संतोष गावकर, हेमांगी खोत, रागिनी ढेकणे, मालवण तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजन गावकर, विनायक परब, अशोक कांबळी, जयप्रकाश परुळेकर यांसह पतसंस्था मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत राणे आदी उपस्थित होते.

      साने गुरुजी कथामालेचे काम करत असल्यामुळे सामाजिक क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने काम करण्याची संधी मिळते. त्यामुळेच हा पुरस्कार मिळू शकला. श्रीकांत सांबारी यांनी आखून दिलेल्या मापदंडानुसार संस्थेचा कारभार चालल्यास संस्थेचा उत्कर्ष महाराष्ट्रात व्हायला वेळ लागणार नाही असे सुरेश ठाकूर यांनी सांगून पुरस्कार प्राप्त रकमेत स्वतः एक हजार एकशे अकरा रुपये मिळवून खरेदी केलेली ग्रंथसंपदा श्रीकांत सांबारी स्मृतिग्रंथ म्हणून रामेश्वर वाचनालयास सुपूर्द करणार असल्याचे जाहीर केले. सुरेश ठाकूर यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे साने गुरुजी कथामाला, मालवणच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Close Menu