मालवण येथे पंतप्रधानांच्या उपस्थितीत नौदल दिन 2023 संपन्न

      नौसेना दिनाचा ऐतिहासिक सोहळा सोमवार दिनांक 4 डिसेंबर रोजी हजारो नागरिकांनी याची देही याची डोळा अनुभवला. दुपारी 3.45 वाजता पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग वायुसेनेच्या हेलिकॉप्टर मधून बोर्डिंग मैदानावर उतरल्यानंतर उपस्थित भाजप कार्यकर्त्यांनी मोदींच्या विजयाच्या घोषणा देत एकच जल्लोष केला. यावेळी केंद्रीय लघु व सूक्ष्म उद्योग मंत्री नारायणराव राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, विधानसभा सभापती राहुल नार्वेकर, उपसभापती निलम गोऱ्हे, शिक्षणमंत्री दीपकभाई केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, माजी खासदार निलेश राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आदी मान्यवरांनी पंतप्रधानांचे स्वागत केले.

      मान्यवरांकडून स्वागत झाल्यानंतर पंतप्रधान आपल्या कारमधून थेट उपस्थित यांचे आभार मानण्यासाठी त्यांच्या दिशेने रवाना झाले. त्यांनी नौसेनेने आयोजित केलेल्या प्रदर्शनालाही भेट दिली. दरम्यान राजकोट किल्ला येथे भारतीय नौसेना व राज्य शासनातर्फे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शानदार अनावरण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते संपन्न झाले.

      ज्या नौदलाचा आपण सर्व अभिमान बाळगतो त्या नौदलाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. जिथे नौदलाचा जन्म झाला त्या पवित्र भूमित यंदाचा नौसेना दिन साजरा होत आहे, याचा आपल्याला सार्थ अभिमान वाटतो. नौदल दिनाला मिळालेला लोकांचा प्रतिसाद पाहता, देशभरात ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्या प्रति एक तीर्थक्षेत्राचा भाव त्यांच्या मनात निर्माण होईल असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तारकर्ली नौसेना दिन कार्यक्रमात व्यक्त केला.

      आज देशात स्वदेशीकरण वेगाने होत आहे. त्यामुळे भारताने जगात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सागराचे सामर्थ्य ओळखून देशाची वाटचाल सशक्त भारत म्हणून करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा पुढे नेण्याचे काम केले आहे असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले.

      अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. जगाच्या दृष्टीने महासत्ता व आत्मनिर्भर होण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. त्यासाठी पंतप्रधानांचे हात मजबूत करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे असे केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांनी स्पष्ट केले.

      शिवपराक्रमाने पावन झालेल्या या सिंधुभूमीत देशातील राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड या राज्यांचे निवडणूक निकाल पाहिल्यावर आपल्याला मोदी मॅजिक ची कल्पना येईल. भारतात गॅरंटीचे दुसरे नाव नरेंद्र मोदी आहे. देशातील जनतेच्या हृदयाला जोडणारे पंतप्रधान मोदी हे आज महाराष्ट्राच्या भूमीत आले आहेत. आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज हे मुत्सद्दी व धोरणी होते. गनिमी कावा हे तंत्र त्यांनी अवलंबिले होते. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने सर्जिकल स्ट्राइक चे जनक ठरतात. छत्रपती शिवरायांनी आपल्याला आत्मनिर्भरतेचा वारसा दिला. हाच वारसा पंतप्रधान मोदी पुढे चालवत आहेत असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

      नौसेना प्रमुख आर. हरी कुमार प्रास्ताविकात म्हणाले, भारतीय नौसेनेचा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेने प्रेरित आहे. राष्ट्राची सुरक्षितता, राष्ट्रातील नागरिकांची आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नौसेना पूर्णपणे समर्पित भावनेने काम करीत आहे.

      नौसेना दिनासाठी दांडी समुद्रकिनारी एसटी बसेस घेऊन आलेले चालक आणि वाहक यांना दांडी येथील मच्छीमारांनी दुपारी निवासस्थानी जेवणाची मोफत सोय उपलब्ध करून दिली होती. दांडीवासीयांनी दाखवलेल्या या सामाजिक बांधिलकीमुळे वाहक चालक भारावून गेले. तारकर्ली येथे नौदलाचे प्रात्यक्षिक पूर्ण झाल्यावर किल्ले सिंधुदुर्ग येथे लेझर शोचे आयोजन केले होते. त्यानंतर किल्ले सिंधुदुर्ग येथे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

Leave a Reply

Close Menu