12 वे अखिल भारतीय मराठे संमेलन 2024 कणकवलीत संपन्न

12 वे अखिल भारतीय मराठे संमेलन 2024 कणकवली येथील वाळकेश्वर मंगल कार्यालयात दि. 6 व 7 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय मराठे (पुणे), शैलेंद्र मराठे (पुरळ), उपाध्यक्ष – विश्वस्त – डी.के.मराठे, सेक्रेटरी हेमंत मराठे (मुंबई), सीमा शशांक मराठे (वेंगुर्ला), मेघ:श्‍याम मराठे (वेंगुर्ला), ममता बाळकृष्ण मराठे (साखरपा) यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. सुहिता मराठे (संभाजीनगर) यांनी ईशस्तवन व स्वागतगीत तर स्थानिक मराठे कुटुंबियांच्या बाल कलाकारांनी एकापेक्षा एक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. स्वराली मराठे (कणकवली) हिने गणेशवंदना सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मनश्री मराठे व श्रावणी मराठे यांनी नृत्य तर समिधा मराठे (पुरळ) हिने सारेगमप हे नृत्य सादर केले. संमेलनाच्या निमित्ताने काढलेल्या ‘स्मृतिगंध : हितगुज अंतरीचे’ या स्मरणिकेचा प्रकाशन विजय मराठे, शैलेंद्र मराठे, सीमा मराठे, डी.के.मराठे, नंदकुमार मराठे व हेमंत मराठे यांच्या हस्ते झाले. साप्ताहिक ‘किरात’च्या संपादिका सीमा मराठे यांनी शतकोत्तर ‘किरात’ची वाटचाल व ‘स्मृतिगंध’ स्मरणिकेचा आढावा घेतला. डी. के. मराठे यांनी प्रतिष्ठानच्या सुरूवातीच्या काळातले आपले अनुभव सांगितले. नंदकुमार मराठे यांनी आपल्या सात्विक आणि तेजस्वी वाणीतून मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात विजय मराठे यांनी मराठे प्रतिष्ठानच्या आत्ता चाललेल्या कामांचा आढावा घेतला. तसेच होतकरु विद्यार्थ्यानी आर्थिक मदतीसाठी प्रस्ताव दिल्यास त्याचा मराठे प्रतिष्ठानच्या माध्यमातून सहकार्य राहील असे सांगितले.  डॉ. प्रमोद मराठे यांनी परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्र्थ्यांसाठी आर्थिक मदतीचा काही भाग घेण्याची जबाबदारी स्विकारली. स्थानिक कलाकारांनी आदिवासींच्या वर होणाऱ्या अन्यायाचे नाटक ‘उलगुलान’ सादर केले.

      शुभदा मराठे (गोवा) यांनी ‘मोबाईलचे दुष्परिणाम’ यावर आपले विचार मांडले. श्रीनिवास मराठे (दादर) यांनी आपण करीत असलेल्या ‘कुलवृत्तांताचे संगणकीकरण’ यावर सखोल माहिती दिली. स्नेहभोजनावेळी नागाभूषण मराठे (कर्नाटक) यांनी आणलेल्या साजूक तुपातील पुरणपोळ्या तसेच प्रकाश सोहळ्यावेळी दिलेल्या नारळाच्या वड्यांनी सोहळ्याला लज्जत आणली.

Leave a Reply

Close Menu