कोरोनाला रोखण्यासाठी हॉटस्पॉट ठिकाणी टेस्ट कराव्यात

वेंगुर्ला तलुक्यामध्ये कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे ग्रामीण व शहरी भागामध्ये जे हॉटस्पॉट आहेत त्यामध्ये प्रामुख्याने टेस्ट कराव्यात असे निर्देश तालुका टास्क फोर्स समितीच्या बैठकीमध्ये प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी दिले.

      कोरोना विषाणूने बाधित रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना व नियोजन करणेसाठी प्रांताधिकारी खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली वेंगुर्ला तालुका टास्क फोर्स समितीची बैठक आज शुक्रवारी तहसिल कार्यालय वेंगुर्ला येथे पार पडली. यावेळी तहसिलदार प्रविण लोकरे, नगरपरिषद मुख्याधिकारी अमितकुमार सोंडगे, प्रभारी गटविकास अधिकारी विद्याधर सुतार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर, वैद्यकिय अधिक्षक डॉ.अतुल मुळेपोलिस उपनिरिक्षक विनायक केसरकर, निवती सहाय्यक पोलिस निरिक्षक राजेंद्र हुलावले, वेंगुर्ला पोलीस पी.जी.सावंत, डॉ. राजेश्वर उबाळे, एकात्मिक बाल विकास कार्यालयाचे जयेश राऊळ, गटविकास अधिकारी गोसावी, रोटरी वेंगुर्ला यांचे प्रतिनिधी सचिन वालावलकर, आरोग्य सेविका व्ही.व्ही.तांडेल, आरोग्य सहाय्यक डी.बी.मोरजकर, आरोग्य विस्तार अधिकारी एस.बी.गोसावी, शिक्षण विस्तार अधिकारी शोभराज शेर्लेकर आदी उपस्थित होते.

      खाजगी डॉक्टर यांचेकडे उपचारासाठी येणा-या नागरिकांना कोरोना सदृश्य लक्षणे असल्यास, सदर नागरिकांनी कोरोना टेस्ट करुन घेणेसाठी तालुका वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिक्षक वेंगुर्ला यांनी समन्वय साधून टेस्ट होतील असे पाहावे. तसेच नागरिकांनीही कोरोना सदृश्य लक्षणे असतील तर कोरोना टेस्ट करुनच उपचार घ्यावेत. त्यामुळे योग्य उपचार होतील तसेच संभाव्य कोरोना संक्रमण रोखता येईल, असे श्री. खांडेकर यांनी सांगितले. त्याचप्रमाणे सध्या ग्रामपंचायत निहाय ग्रामविलगीकरण कक्ष सुरु केले आहेत. कोरोनाबाधित नागरीकांनी घरी उपचार घेण्यापेक्षा ग्रामविलगीकरण कक्षमध्ये विलगीकरण व्हावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Close Menu