जैतिराश्रीत संस्थेकडून तुळसकर कुटुंबियांना प्रोत्साहन निधी

बिकट आर्थिक परिस्थितीमुळे तुळस गावातील विजय तुळसकर या छोट्या विद्यार्थ्यास चांगल्या दर्जाचे शिक्षण त्याचे पालक देऊ शकत नसल्याची बाब लक्षात आल्यानंतर तुळस गावच्या सर्वांगीण विकासासाठी झटणा-या मुंबईतील जैतिराश्रीत संस्थेने तब्बल १ लाख ८ हजार रुपये स्वनिधी काढून ही मदत तुळसकर कुटुंबियांकडे सुपूर्द केली. केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर या मुलाच्या व त्याच्या भावंडांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी ही संस्था कायमस्वरुपी त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहील, असे आश्वासनही या संस्थेतर्फे देण्यात आले. हा कार्यक्रम तुळस येथे संस्थेच्या बहुउद्देशीय सभागृहात पार पडाल. यावेळी अध्यक्ष अॅड. प्रभानंद सावंत, उपाध्यक्ष विष्णू परब, कार्यवाह नारायण उर्फ बन्सी चव्हाण, पत्रकार शेखर सामंत, संस्थेचे संयुक्त कार्यवाह वासुदेव नाईक, स्थानिक प्रतिनिधी प्रकाश परब, वाचनालय अध्यक्ष सगुण माळकर, सुधीर झांटये व संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.  

  तुळस या गावातील विजय तुळसकर या असामान्य बुद्धिमत्ता असलेल्या छोट्या विद्यार्थ्याच्या पुढील शिक्षणाकरिता तुळस जैतिराश्रीत मंडळाने तात्काळ निधी उभारून त्याच्या पाठिशी उभे केलेले आर्थिक बळ अतिशय कौतुकास्पद व प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन तरुण भारतचे आवृत्ती प्रमुख शेखर सामंत यांनी केले. अॅड. प्रभानंद सावंत यांनी विजय तुळसकर या मुलामध्ये व त्याच्या भावंडांमध्ये असलेल्या गुणवत्तेला पैलू पाडण्यासाठी त्यांना मोठ्या शहरांमध्ये पाठवणे आवश्यक असल्याचे सांगितले.

  कार्यवाह नारायण चव्हाण यांनी निधी संकलनाची माहिती दिली. उपाध्यक्ष विष्णू परब यांनी संस्थेकडून मिळणा-या मदतीतून शिक्षण पूर्ण करून करिअर घडवणा-या विद्यार्थ्यांनी गावच्या विकास प्रक्रियेत सहभाग घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. सूत्रसंचालन प्रा. सचिन परुळेकर यांनी केले.

Leave a Reply

Close Menu