अल्पभूधारक शेतक-यांसाठी किमान हमीभाव कायदा होणे आवश्यक-राजू शेट्टी

 फूले, शाहू, आंबेडकर विचार मंच वेंगुर्ला तर्फे येथील साई मंगल कार्यालय येथे छत्रपती शिवाजी, महात्मा ज्योतिबा फूले, राजर्षी शाहू महाराज, व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती सोहळा पार पडला. फूले, शाहू, आंबेडकर विचार मंच वेंगुर्ल्याचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, राज्य सरचिटणिस राजेंद्र गड्यानावर, माजी नगराध्यक्ष सुनिल डुबळे, फूले, शाहू, आंबेडकर विचार मंचचे सचिव के.जी.गावडे, उपाध्यक्ष प्रा.सुनिल भिसे, एन. पी. मठकर आदी उपस्थित होते.

      कोकणात ८० टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. असंघटीत मजुरांसाठी ज्याप्रमाणे किमान वेतन कायदा आहे. त्याच धर्तीवर अल्पभूधारक शेतक-यासांठी किमान हमीभाव कायदा होणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात १२ वेळा दुष्काळ झाला. मात्र त्यांनी मदत करुन सर्वांना पुन्हा उभे केले. शाहू महाराज हे संस्थानिक होते. त्यांनी प्रथम राधानगरी धरण बांधले. शेतक-यांच्या उत्पादीत मालासाठी बाजारपेठा निर्माण केल्या. त्यांना गाळे देवून त्यांना व्यापारी बनण्यास उद्युक्त केले. शेतकरी अडाणी राहू नये यासाठी शिक्षणाची दारे खुली केली. शेतक-यांना सवलतीच्या दरात वीज मिळाली पाहिजे ही भूमिका सर्वप्रथम आंबेडकर यांनी घेतली. आज शाहू, फूले, आंबेडकर यांचे नाव घेवून सत्तेवर आलेल्या लोकांनी त्यांचे धोरण न अवलंबिल्याने शेतक-याच्या आत्महत्या वाढल्या आहेत. आज देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. लॉकडाऊनमध्ये जगभरातील अर्थव्यवस्था कोलमडली असताना भारतातील अर्थव्यवस्थेवर मात्र त्याचा मोठा परिणाम झाला नाही. मात्र शासनाने त्याचा परतावा आज दिलेला दिसत नाही, अशी खंत राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. आज शेतीचे होणारे तुकडे थांबविणे गरजेचे आहे. तसेच कूळ कायद्याचा पुर्नविचार करण्याची गरज आहे. हे जोपर्यंत होत नाही. तोपर्यंत संपूर्ण जमिन शेतीखाली येणार नाही. शेतक-यांच्या पीकांना हमी भाव मिळावा यासाठी आपण प्रयत्नशिल असून त्यासाठी दबावगट करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

  यावेळी फूले, शाहू, आंबेडकर विचार मंचचे सचिव के.जी.गावडे यांना कुडाळ पत्रकार समितीचा भैय्यासाहेब वालावलकर स्मृति जिल्हास्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल, मंचच्या महिला कार्यकारीणी प्रमुख विमल शिंगाडे यांना जिल्हा अध्यापक संघाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल व मंचचे सदस्य, शिरोडा वेळागर येथे होणा-या राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेचे आयोजक उदय भगत यांचा राजू शेट्टी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Close Menu