दत्तक पालक अंतर्गत ४२ मुलांना आधार

     वेंगुर्ला तालुक्यामधील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करावी या उदात्त हेतूने प्रेरित झालेल्या शिक्षक समिती वेंगुर्लाच्या शिलेदारांनी दत्तक पालक हा उपक्रम राबवला. वेंगुर्ला तालुक्यातील १४ केंद्रांमधून प्रत्येकी ३ प्रमाणे एकूण ४२ विद्यार्थी शिक्षक समिती पाईकांनी दत्तक घेतले. साई मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या या सोहळ्यात त्यांना पायातील चप्पल पासून छत्री दप्तर पर्यंत संपूर्ण वर्षासाठी आवश्यक साहित्य देण्यात आले.

      या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर, राज्य सहसचिव नामदेव जांभवडेकर, राज्य महिला सल्लागार सुरेखाताई कदम, प्रभारी जिल्हाध्यक्ष नारायण नाईक, जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा निकिता ठाकूर, शिक्षक नेते भाई चव्हाण, माजी सभापती जयपकाश चमणकर, यशवंत परब, शिक्षक पतपेढीचे माजी संचालक आनंद पेडणेकर, शिक्षक समितीचे बांदवलकर गुरुजी, कुडाळ शिक्षक समितीचे अध्यक्ष प्रसाद वारंग, सुगंध तांबे आदी उपस्थित होते.

      उपस्थित पालकांमधून सुनील गावडे यांनी शिक्षक समिती वेंगुर्ला मार्फत राबविलेल्या दत्तक पालक कार्याचा गौरव केला. ही मदत विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी प्रोत्साहन देणारी असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. रिद्धी राजापूरकर व सानिका दळवी या विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातून शिक्षक समितीने केलेल्या कार्याचा गौरव केला.

      ऋतिका राऊळ व विनोद मेथर यांनी सूत्रसंचालन, सिताराम लांबर यांनी प्रास्ताविक तर त्रिबक आजगांवकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Close Menu