आता कोठे धावे मन । तुझे चरण देखलीया

बहुसंख्य वारकरी विठोबा रखुमाईच्या चरणी झाले नतमस्तक

आता कोठे धावे मन । तुझे चरण देखलीया । भाग गेला शीण गेला । अवघा झाला आनंद । अशाप्रकारे सुमारे १८ किलोमिटरचा पायी प्रवास करुन बहुसंख्य वारकरी कालवीबंदर येथील विठ्ठलरखुमाईच्या चरणी नतमस्तक झाले. वेंगुर्ला येथून निघालेल्या या आषाढी वारीत शेकाडो भाविक सहभागी झाले होते.

      सन २०२० मध्ये म्हणजे कोरोनाकाळात पंढरपूर वारीस बंदी आली होती. विठूरायाच्या दर्शनाची आणि वारीची आस भक्तांना स्वस्थ बसू देईनात. म्हणूनच श्रीकृष्ण उर्फ बाबू झांटये यांनी पुढाकार घेत आपल्या मित्रमंडळी व वारक-यांच्या सहकार्याने वेंगुर्ला ते कालवीबंदर अशी आषाढी पायी वारी सुरु केली. विठ्ठलाच्या कृपेने पहिली वारी यशस्वी झाल्यानंतर दुस-यावर्षीच्या वारीपूर्वी श्रीकृष्ण झांटये यांचे निधन झाले. परंतुत्यांनी सुरु केलेली त्यांच्या मित्रपरिवाराने बंद न करता ती त्यांच्या पश्चातही सुरु ठेवली. यावर्षी या वारीचे हे तिसरे वर्ष होते. आज सकाळी ७ वाजता वेंगुर्ला दाभोलीनाका येथून विठ्ठल भक्तांच्या उपस्थितीत वारीला प्रारंभ झाला. विठ्ठलाचे भजन करीत अधूनमधून बरसणा-या पावसात कालवीबंदरच्या दिशेने निघालेल्या या वारीत बहुसंख्य वारक-यांनी सहभाग घेतला. दुपारी २ वाजता ही वारी कालवीबंदरच्या विठ्ठल मंदिरात पोहचली. मंदिरात पोहचताच वारक-यांनी केलेल्या विठ्ठल नामाच्या जयघोषात परिसर भक्तिमय बनला.

Leave a Reply

Close Menu