लोककला टिकण्यासाठी ‘लोकबाप्पा’च्या माध्यमातून साकडे

कोणत्याही शुभकार्याची किंवा कार्यक्रमाची सुरुवात करताना गणपतीचे स्मरण केले जाते. कलेचा अधिपती असल्याने प्रत्येक कलेमध्ये गणपतीला मानाचे स्थान दिले आहे. आर्थिक बाजू सांभाळताना दिवसेंदिवस सर्वच कला टिकवून ठेवणे डोईजड झाले आहे. कलेला लोकाश्रय मिळाला असला तरी तुटपूंज्या मानधनातून भविष्यासाठी तजविज करणे अशक्य झाले आहे. लोकपरंपरा ही महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीची एक शान आहे. अशा विविध लोककला प्रकारांसाठी महाराष्ट्राची ओळख कायम टिकावी आणि निसर्गाचं जतन व्हावं यासाठी लोककला सादर करणाऱ्या सर्वच कलाकारांनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने ‘लोकबाप्पा’च्या माध्यमातून विघ्नहर्त्याला गजाननाला साकडे घातले आहे.

      कोकणातील दशावतार, जव्हार-मोखाडा मधील वारली, दोडामार्ग मधील चपई, पिंगुळी येथील ठाकर समाजातील चित्रकथी-कळसूत्री, घाटमाथ्यावरील तमाशा किंवा विदर्भातील झाडीपट्टी अशा विविध लोककलावंतांना एका छताखाली आणण्यात आले आहे. सुमारे 500 वर्षांची गणेशोत्सवाची परंपरा असलेल्या कुडाळ येथील नेरुर गावातील चौपाटी येथे या ‘लोकबाप्पा’चे चित्रिकरण करण्यात आले आहे. 29 ऑगस्ट रोजी हे चित्रिकरण ‘श्रीरंग’ युट्युबद्वारा सर्वांच्या भेटीलाही आले आहे. भारुड, शाहिरी, कीर्तन या प्रकारच्या लोककलेतून गणपती बाप्पाचे दर्शन आपल्याला होणार आहे. यात प्रत्येक कलाकाराने स्वत: पारंपारिक वेशभूषा साकारली असून आपल्या कलेचे दर्शन घडविताना आपली कला जीवंत रहावी, कलेचे संवर्धन व्हावे यासाठी गणपतीला विनंती करणार आहेत. यातून होणारे प्रबोधन हे खरंतर आपल्या समाजासाठी आणि आपल्या निसर्ग संवर्धनासाठी अतिशय महत्वाचे आहे.

      ही मूळ संकल्पना आणि निर्मिती डॉ. सुमित पाटील यांची आहे. मुंबई विद्यापीठाचे लोककला विभागाचे प्रमुख गणेश चंदनशिवे यांनी हे गाणं स्वत: संगीतबद्ध करून आपल्या सुमधुर आवाजात गायलं आहे. या संकल्पनेचे लेखन डॉ. प्रणव प्रभू यांनी केले आहे. या गाण्याचे चित्रीकरण आघडीचे छायाचित्रकार पराग सावंत आणि मिलिंद आडेलकर करीत आहेत. या गाण्यात पद्मश्री पुरस्कार प्राप्त लोककलावंत परशुराम गंगावणे, सिद्धेश नेरुरकर, किशोर नाईक, शनी सोनावणे, प्रवीण बर्वेकर, संकेत जाधव, विजय वालावलकर, सुवर्णा वायंगणकर, संदेश कदम, शिवहरी रानडे, शाम तेंडुलकर, विठ्ठल तळवलकर, तेजस मसके, सचिन कोंडस्कर, मनीष पाटकर, गौरव पाटकर, रोहन चव्हाण, रोशन चव्हाण, पूजा सावंत, शामली म्हाडेश्वर, सेजल पाटील, ऋतुजा भगत, सिद्धी कुडाळकर, सायली केसरकर, सुंदर चव्हाण, जयतीर्थ राऊळ, उपेंद्र पवार आणि निलेश गुरव त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील लोककलावंत या उपक्रमात सहभागी झाले आहेत. तसेच सोनी मराठीवरील ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्न’ फेम नेरुर गावची सुकन्या बालकलाकार कु.रुची नेरुरकर हिचा अभिनय सुद्धा पहायला मिळणार आहे. या उपक्रमातून निसर्ग आणि लोककला संवर्धनाचा संदेश देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Close Menu