वेंगुर्ल्याच्या नेहा आरोलकरची स्पेन येथे निवड

जागतिक स्तरावरील कृषी क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान अवगत व्हावे व विद्यार्थी डिजिटल शेती तंत्रज्ञानामध्येही कुशल व्हावेत या उद्देशाने जागतिक बँक आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेतर्फे देशातील विद्यार्थ्यांना कृषी विषयक उच्च शिक्षणासाठी विदेशात पाठविण्यात येते. यावर्षी कृषी तंत्रज्ञानात अग्रेसर असलेल्या स्पेन या देशामध्ये डिजिटल कृषी तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी वेंगुर्ल्याची सुकन्या कु.नेहा महेंद्र आरोलकर हिची निवड झाली असून पुढील अभ्यासक्रमासाठी ती स्पेन येथे दाखलही झाली आहे. तिने मुळदे येथील कृषी महाविद्यालयातून आपले बीएससी व्हॉर्टिकल्चरचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयातून (अकोला) एमएससी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. सध्या ती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात उद्यानविद्या विषयात पीएचडी करीत आहे. भटवाडी येथील दुकान व्यावसायिक महेंद्र आरोलकर व सामाजिक कार्यकर्त्या मंजुषा आरोलकर यांची नेहा ही कन्या होय. या निवडीबद्दल सर्वस्तरातील व्यक्तींनी तिला शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Close Menu