प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात राज्य नाट्य प्राथमिक फेरीला प्रारंभ

 महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनलयातर्फे आयोजित 62 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या वेंगुर्ला केंद्रातील प्राथमिक फेरीचे उद्घाटन 12 डिसेंबर रोजी वेंगुर्ला येथील नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहात सीताराम टांककर यांच्या हस्ते नटराजाच्या मूर्तीचे पूजन करून झाले. दीपप्रज्वलनानंतर प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांनी नाटकाची घंटा वाजवून प्रतिकात्मक उद्घाटन केले. यावेळी व्यासपिठावर उपविभागीय अधिकारी प्रसन्नजीत चव्हाण, तहसिलदार ओंकार ओतारी, मुख्याधिकारी परितोष कंकाळ, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, ‘माझा वेंगुर्ला‘चे कार्याध्यक्ष संजय पुनाळेकर, सामाजिक कार्यकर्ते सचिन वालावलकर, शरद चव्हाण, पत्रकार शेखर सामंत, परीक्षक नरेंद्र आमले, सुधीर सेवेकर, प्रतिभा नागपुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

      नाटक समाजजीवनाचा आरसा असतो. नाटकांमधून भावनांचे प्रगटीकरण करताना जीवनातील वास्तव प्रभावीपणे मांडता येते. यातूनच कलाकार घडतात. राज्य नाट्य स्पर्धांमधून व्यावसायीक रंगभूमी आणि वाहिन्यांना कलाकार मिळतात. या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त स्थानिक संघ सहभागी होत आहेत ही अभिमानाची बाब आहे. शालेय जीवनापासूनच नाट्य कलेची आवड जोपासली गेली पाहिजे, तर यासाठी अशी नाट्य चळवळ सातत्याने राबविणे आवश्‍यक आहे. यातूनच प्रेरणा मिळून नवे कलाकार घडतील असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी तथा उद्घाटक सीताराम टांककर यांनी केले.

      मुख्याधिकारी कंकाळ म्हणाले की, आपल्या कार्यकाळात राज्यनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी वेंगुर्ल्यात होत आहे याचा मला विशेष आनंद आहे. यापुढेही वेंगुर्ल्याची सांस्कृतिक परंपरा अखंडित चालू राहण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. ‘माझा वेंगुर्ला‘चे प्रतिनिधी सचिन वालावलकर यांनी चांगल्या कामासाठी वेंगुर्लावासीय नेहमीच एकजुट असतात. यापुढेही वेंगुर्ल्याचे नाव रोशन करणारे कार्यक्रम घेऊ. त्यासाठी सर्वांचे सहकार्य राहील असे आश्‍वासन दिले. मी वेंगुर्ल्यात जरी राहत नसलो तरी, प्रगतिपथावर वाटचाल करणाऱ्या वेंगुर्ला शहरात राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांचा मला अभिमान आहे. याकरिता माझे योगदान देण्यासाठी मी सदैव तत्पर असल्याचे दै.तरूण भारतचे सिधुदुर्ग-रत्नागिरी आवृत्तीप्रमुख शेखर सामंत यांनी सांगितले. परीक्षकांच्या वतीने सुधीर सेवेकर यांनी आपल्याला येथील कचरा डेपो दाखविण्याचा आग्रह स्थानिकांनी केला. तेव्हा स्वच्छ सुंदर वेंगुर्लेवासीयांची स्वच्छतेच्या बाबतीतील भरारी पाहून विशेष कौतुक वाटले. विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ‘माझा वेंगुर्ला‘ने शासनाची ही नाट्यचळवळ याठिकाणी राबविण्यासाठी घेतलेला पुढाकार हा निश्‍चितच स्थानिक कलाकारांना प्रेरणा देणारा असल्याचे सांगितले. प्रांताधिकारी पानवेकर यांनी या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे भाग्य मिळाल्याबद्दल मला विशेष आनंद होत आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने ज्या काही त्रुटी होत्या त्या पूर्ण केल्या आहेत. तरीही काही उणिवा राहिल्या असतील तर प्रशासक म्हणून त्या त्रुटी निश्‍चितच दूर करण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू.

      स्पर्धा समन्वयक म्हणून जरी माझी जबाबदारी असली तरीही ‘माझा वेंगुर्ला‘ टीम, शासनाचे अधिकारी आणि नाट्यरसिकांमुळेच हा दिमाखदार सोहळा संपन्न होत आहे, याबद्दल प्रशांत आपटे यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे निवेदन ॲड. शशांक मराठे यांनी केले. उपस्थित मान्यवरांना संजय घोगळे यांचे ‘आठवणीतील वेंगुर्ला‘ तसेच किरात प्रकाशनाचे ‘वेंगुर्ला काल आज उद्या‘ ही पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. नाटककार मधुसूदन कालेलकर यांच्या जीवनाचा थोडक्यात आढावा सीमा मराठे यांनी सादर केला. स्पर्धेच्या प्रत्येक दिवशी मंगेश पाडगांवकर, जयवंत दळवी, चि.त्र्यं.खानोलकर उर्फ आरती प्रभू व वि.स.खांडेकर या वेंगुर्ल्यातील दिग्गज साहित्यिकांची ओळख करून देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Close Menu