त्या बोलीफुलाच्या गंधकोषी…

         ‘वस्त्रहरण‘ नेमकं कोणाचं ह्या प्रश्नाचे उत्तर बाबूजींचे, किंवा मालवणी रंगमंचाचे असेल आणि काहींच्या मते तर ‘‘आम्हा मालवणी माणसाचे‘‘ असेल.. पण या सगळ्यातही ती कलाकृती, माडबनच्या कुशीत जन्मलेल्या एका प्रतिभावान लेखकांची आहे हा अग्रपूजेचा मान सदैव राहील. गंगाराम गवाणकर यांच्या निमित्ताने ‘वस्त्रहरण‘ नाटकाचा प्रवास समजून घेतला तरी पुन्हा मच्छिंद्रपुन्हा ‘वस्त्रहरण‘ अशा चकव्यात हा प्रवास सुरु राहतो.

      अगदी हल्ली हल्लीपर्यंत मालवणी नाटक म्हणजे रोबांट अशा मिजासीत असणारे नाट्यवर्तुळही आता आता कुठे मालवणी स्विकारायला सुरूवात झालंय.. मग विचार करा ते १९७०, १९८०, १९८२ च्या काळातला वाटा किती हो खडतर असतील.. गंगाराम गवाणकर यांच्याबद्दल लिहिताना सारखे ‘‘मच्छिंद्र का आठवतात?‘‘ तर त्या कलाकृतीत प्राण फुंकण्याची त्यांनी केलेली किमया. विचार करा एसटीने फिरणा­या साध्या माणसांच्या कलावंत संचातील १९८२ ला ‘भद्रकाली प्रॉडक्शनने‘ जे नाटक रंगमंचावर आणले ते नाटक १९८३ साली थेट ब्रिटीश एअरवजने लंडन गाठून नवा इतिहास निर्माण करते. हा संहितेचा आणि संहितेत देवत्व आणणा-­या नटेश्वराच्या लेकरांचा चमत्कार आहे.

     ते कौतुक आहे आणि कायम राहीलच म्हणा. पण त्यापल्याड जाऊन गंगाराम गवाणकर शोधले पाहिजे. आणि त्यासाठी जो मध्य आहे तो म्हणजे १९८२ साल!

      १९८२ नंतरचे भद्रकालीचे ‘वस्त्रहरण‘ आणि १९८२ च्या अगोदरच्या ‘वस्त्रहरणा‘चा सुसाट प्रवास याची गोष्ट समजून घेतली तर गवाणकरांच्या संहितेची ताकद समजून येईल. आश्चर्य वाटेल पण सुरूवातीला एका गुजराती निर्मात्याने या मालवणीची गोडी ओळखली ६ नोव्हेंबर १९७५ साली राजा मयेकर यांचा तात्या सरपंचाचा अभिनय आणि दिग्दर्शनात या नाटकाने मुहूर्तमेढ रोवली. १९७७ साली रमेश रणदिवे नावाचा प्रतिभावंत दिग्दर्शक व्हिक्टोरिया मिलच्या निमित्ताने परिसस्पर्श म्हणून लाभला. पण खरा इतिहास घडला तो १९७८ साली! ज्यावळी आपल्या घरात टिव्हीही नव्हता त्यावेळी मुंबई दूरदर्शनवर तात्या सरपंचाच्या भूमिकेत राजा मयेकर आणि गोप्याच्या भूमिकेत स्वतः रमेश रणदिवे यांनी ‘वस्त्रहरण‘ सादर केले. आणि ‘वस्त्रहरण‘ नावाचा चमत्कार प्रसारित झाला.

      लक्षात घ्यासाल १९७८ त्यावेळी ‘वस्त्रहरण‘ टिव्हीवर सादर झालं होते. तो जो निखळपणा होता ना, तो म्हणजे गंगाराम गवाणकर नावाच्या प्रतिभेचा होता. मी म्हणून म्हटलं, गंगाराम गवाणकर यांची ‘वस्त्रहरण‘ ही ओळख एकाच नाटकाच्या १९८२च्या पूर्वीची आणि नंतरची समजून घेणे जास्त महत्वाचं आहे..

      नाटक नेमकं कुणाचे असते या प्रश्नांचे उत्तर बदलत राहते, प्रेक्षक म्हणून तुमच्या प्रभावाने ती गोष्टमोठी होत जाते. पण तरीही ती कुणी तरी लिहिलेली कलाकृती असते हे जेव्हा समजते.. तेव्हा त्या संहिता पुजनाची आणि तिथून सुरू झालेल्या प्रवासाची गोष्ट प्रत्यक्ष प्रयोगावेळच्या 
घंटा पूजनापर्यंत पोहोचते. 

      खरंतर आज माडबनला काय वाटत असेल, किवा ज्यांनी ज्यांनी गवाणकरांना पाहिलंय त्यांना काय वाटत असेल हे तुम्ही शब्दात नाही मांडू शकत.. पण ज्यांनी मच्छिंद्र कांबळी, दिलीप कांबळी, रमेश रणदिवे, अगदी बापू कोयंडे, लवराज कांबळीसंतोष मयेकर यांना समोर असताना पाहून त्यांच्या जाण्याचे दुःख पचवलयं त्या प्रत्येकासाठी आज गंगाराम गवाणकरही सोबत नाहीत हे दुःख व्यथित करणारे असेल..

       ‘वस्त्रहरण‘ ही एका पिढीने नाटक म्हणून पाहिलेलीआणि घरात नवीन टेपरेकॉर्डर घेतल्यावर लता मंगेशकर यांची ‘अष्टविनायक गीते‘ सोबत ऐकत पुजलेली ‘वस्त्रहरण‘ नाटकाच्या कॅसेटची गोष्ट आहे. आणि म्हणून संहिता आणि शब्द याच गोष्टी खूप खूप मोठ्या असतात ह्या एका वाक्यावर एका लेखकाचा मुलगा म्हणून मी कायम आणि ठाम राहीन..

     गंगाराम गवाणकरांसाठी ‘वस्त्रहरण‘ ही कलाकृतीच एवढा मोठा मानदंड बनली की आज अनेकांना ते ९६ व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते याचाही विसर पडला. २०१६ साली त्यांच्या
नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षीय  भाषणातील एक एक मुद्दा म्हणजे ख­या अर्थाने पुस्तकी भाषा न रहाता रंगमंचावरील प्रयोगांचे गांभीर्यपूर्वक चिंतन होते.

      इतर नाट्यलेखकांच्या तुलनेत अर्थातच गंगाराम गवाणकर हे रसिकांच्या थेट प्रेमाला सामोरे गेलेले लेखक होते.  इतर लखकांच्या तुलनेत गंगाराम गवाणकरांचा मिश्किल आणि गोष्टी वेल्हाळ स्वभाव हा त्यांच्या प्रेक्षकांना जोडणारा आणि लोकांच्या मनात गवाणकरांचे स्थान अढळ करणारा होता.

      मी जसे म्हणतो की गवाणकर आठवताना बाबूजी हे आठवत राहतात तसच गवाणकार नावाच्या ‘वस्त्रहरण‘ नावाच्या गारूडाची ताकदच एवढी होती की, ‘वस्त्रहरण‘नंतर आलेल्या अनेक मालवणी नाटकांचे लेखकही गवाणकरच आहेत असाच अनेकांचा समज झाला होता. ‘वस्रहरण‘च्या निमित्ताने मालवणीची गंगा प्रवाही करणा­या गंगाराम गवाणकरांनी हा प्रवाह विस्तृत केला हे ही तितकचं खरं म्हणा.. पण तरीही आज गवाणकरांच्या निमित्ताने  ‘सुंदर तळाशिलकरांचे चाकरमानी‘, मधुभाईंचे ‘केला तुका झाला माका‘माझं स्वतःचे सगळ्यात आवडतं प्र.ल.मयेकरांचे ‘पांडगो ईलो रे बा इलो..‘ रमेश पवारांचे ‘घास रे रामा‘ असेलप्रवीण शांतारामाचे ‘येवा कोकण आपलाच आसा‘ असेल अशा अनेकांनी जी मालवणी नाटकाची पताका पुढे नेलीय ना त्या सगळ्यांच्या दिंडीत मध्यभागी पालखीत गवाणकरांचे ‘वस्त्रहरण‘ नक्कीच आहे.

   ‘वस्त्रहरण‘ आजही अनस्टॉपेबल आहेच पण आजही वन रूम किचन आणि  वात्रट मेलेची गंमत मनातल्या मनात आठवून हसणारेही लाखो असतील…

      गंगाराम गवाणकरांच्या निमित्ताने त्यांचा हा प्रवास लेखक आणि अर्थात गजालीकार म्हणून समजून घेणे जास्त गरजेचं आहे.  कुडाळच्या रिल्स मालवणीने त्यांचा केलेला जीवनगौरव पुरस्कार असो किवा काही वर्षांपूर्वी त्यांच्या रंगकर्मी आणि मित्रांनी केलेला मालवण येथील सत्काराचा अनोखा सोहळा असो, गवाणकरांचे असे उत्स्फूर्त भाग्यपण कलावंत आणि लेखकांच्या नात्याला घट्ट जोडत गेले.

   एका नाट्यलेखकांच्या आयुष्यात असे फुटलाईटच्या प्रकाशात येत हृद्यसंवाद साधणारे गंगाराम गवाणकर वाचक आणि प्रेक्षकांच्या कायमच जवळ  राहीले. कधी स्टेजवर नाहीतर कधी हक्काने माडबनच्या घरी अंगणात मैफल रंगवणारे गवाणकर आजही त्या लाल रिबीनचा पडदा न पाडता एक्झिट घेऊन गेलेत.

      एका अढळ हाताच्या लेखकांने आमच्यासाठी ‘वस्त्रहरण‘ नावाचा ध्रुवतारा दिलाय आणि त्यातही तात्या सरपंच म्हणजे प्रत्येक मालवणी माणसाला एक नायकपद दिलय.. या दोन गोष्टी कळल्या ना की मग राजापूरच्या गंगेच्या जवळ हा गंगाराम आपल्यासाठी आला होता आणि जाताना त्याने आठवणींची शरयू आपल्या आभाळात विखरुन ठेवलीय याचे सदैव स्मरण होत राहील.. ऋषी श्रीकांत देसाई, मुंबई  (९८७०९०४१२९)

 

Leave a Reply

Close Menu