कोकणची लाल माती आणि इथला माणूस तसा कमालीचा सोशिक आहे. निसर्गाच्या कुशीत वाढलेला हा माणूस समुद्राच्या लाटांप्रमाणे आयुष्यातील चढ-उतार पचवण्यात सरावलेला आहे. पण आज त्याच शांत कोकणच्या काळजातून अलीकडे वारंवार हुंदका बाहेर पडत आहे, ज्याने सह्याद्रीच्या कडांनाही पाझर फुटला आहे. गेल्या काही दिवसांत इथल्या रस्त्यांवर जे दृश्य दिसले, ते केवळ एका राजकीय आंदोलनाचे प्रदर्शन नव्हते, तर तो गेल्या दशकभरापासून निसर्गाच्या लहरीपणाने आणि सरकारच्या कोरड्या आश्वासनांनी पिचलेल्या बागायतदाराचा फुटलेला बांध होता. हा ‘आक्रोश’ केवळ करपलेल्या मोहोराचा नव्हता, तर तो उद्ध्वस्त होऊ पाहणाऱ्या एका समृद्ध संस्कृतीचा आणि अर्थकारणाचा होता.
हा जनक्षोभ वेंगुर्ल्यात देखील पाहायला मिळाला. बागायतदारांनी जेव्हा पाहिले की, डोळ्यांसमोर हापूस आणि काजूचा मोहोर धुक्याच्या आणि लहरी हवामानाच्या फटक्यात भस्मसात झाला आहे, तेव्हा त्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला. ही लाट हळूहळू पसरत गेली आणि देवगड जवळील नांदगाव येथे एका विराट जनसागरात रूपांतरित झाली. ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’चे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली बागायतदारांनी महामार्ग रोखून धरला, तेव्हा प्रशासनाचे धाबे दणाणले. एरव्ही शांत असणारा शेतकरी जेव्हा स्वतःहून नेत्याला साकडं घालतो आणि रस्त्यावर उतरतो, तेव्हा समजून जावे की आता पाणी गळ्यापर्यंत आले आहे. या आंदोलनाच्या ओघात एक राजकीय नाट्यही पाहायला मिळाले. आमदार नितेश राणे यांनी या आंदोलनात प्रवेश करून आंदोलन ‘हायजॅक’ करण्याचा प्रयत्न केला. सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी तिथे येऊन बागायतदारांना आश्वासन दिले की, सरकार तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे आणि लवकरच मदतीचा मोठा निर्णय घेतला जाईल. आश्वासनांची ही खैरात कोकणी माणसाने आजवर अनेकदा अनुभवली आहे. नितेश राणे यांनी सरकारकडून मदत मिळवून देण्याचे शब्द तर दिले आहेत, पण आता प्रश्न हा आहे की, ही मदत कागदावरच्या निकषात अडकणार की प्रत्यक्षात बागायतदाराच्या खिशात पोहोचणार?
यंदाच्या हंगामात निसर्गाचा खेळ अत्यंत क्रूर होता. थंडी पडली म्हणून शेतकरी सुखावला, पण त्याच थंडीने परागीकरण रोखले. त्यानंतर आलेल्या अवकाळी धुक्याने जणू बागांवर मृत्यूचे पांघरूण घातले. ज्या बागायतदाराने कर्ज काढून, दागिने गहाण ठेवून औषध फवारणीसाठी लाखो रुपये ओतले, त्याच्या हाती आज केवळ काळा पडलेला पालापाचोळा आहे. ही केवळ आर्थिक हानी नाही; ही एका कुटुंबाच्या स्वप्नांची राखरांगोळी आहे. मुलांचे शिक्षण, मुलींची लग्ने आणि वर्षभराचा प्रपंच या ‘पिवळ्या सोन्या’वर अवलंबून होता. आज तोच सोन्याचा तुकडा मातीमोल झाला आहे. आपण केवळ आंब्यापुरते मर्यादित राहिलो तर तो अन्याय ठरेल. सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या काजू बागायतदारांची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही. संकरित काजू आता निसर्गाच्या लहरीपणाला लवकर बळी पडू लागला आहे. नारळ आणि सुपारीच्या बागांवरही मर रोगाचे सावट आहे. या पिकांच्या उत्पादनात गेल्या दशकभरात निम्मी घट झाली आहे. कोकणच्या अर्थव्यवस्थेचा दुसरा कणा असलेली मासेमारीही संकटात आहे. समुद्राच्या वाढत्या उष्म्यामुळे मासळीने आपली जागा बदलली असून, पारंपरिक मच्छीमार आज डिझेलच्या खर्चासाठीही संघर्ष करत आहे. त्यात परप्रांतीय ट्रॉलरची घुसखोरी ही जखमेवर मीठ चोळण्यासारखीच आहे.
सध्या सरकारी यंत्रणेकडून पंचनाम्यांचे सोपस्कार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, एनडीआरएफ (NDRF) च्या जुन्या निकषांनुसार हेक्टरी अवघी १७-१८ हजार रुपयांची मदत देण्याचे सूतोवाच केले जात आहे. मात्र, हे निकष कोकणच्या बागायतीला पूर्णपणे अपुरे आहेत. बागायतदाराची खरी मागणी ही कोल्हापूर-सांगलीच्या महापुराच्या धर्तीवर ‘विशेष पॅकेज’ची आहे. फवारणीचा एका वेळचा खर्चही निघणार नसेल, तर त्या मदतीला मदत तरी कसे म्हणायचे? निव्वळ पंचनाम्यांचा खेळ करून वेळ मारून नेण्यापेक्षा, बागायतदारांनी घेतलेल्या पीक कर्जाचे पुनर्गठन करून व्याज माफी देणे, हाच सद्यस्थितीत खरा दिलासा ठरू शकतो.
कोकण कृषी विद्यापीठासारख्या संस्थांचे संशोधन आता कागदावरून बागेत येण्याची गरज आहे. दरवर्षी हवामान बदलणार हे माहीत असूनही, त्यावर मात करणारे नवे वाण शोधण्याची गरज आहे. दरवर्षी आपण केवळ ‘नुकसान झाले’ म्हणून रडत बसणार की त्यावर काही वैज्ञानिक तोडगा काढणार? आज शेती आणि मासेमारी या दोन्ही क्षेत्रांना ‘युद्ध पातळीवर’ नव्या संशोधनाची गरज आहे. हवामान बदलाचा हा आघात आता सहनशीलतेच्या पलीकडे गेला आहे. कोकणचा माणूस शांत आहे, याचा अर्थ तो हतबल आहे असा नाही. मुंबई – गोवा महामार्गावर उसळलेला जनसागर हे एका मोठ्या सामाजिक अस्वस्थतेचे संकेत आहेत. ते सत्ताधाऱ्यांनी समजून घ्यायला हवेत . केवळ आश्वासनांची गाजरे दाखवून वेळ मारून नेली, तर हा आक्रोश उद्या तीव्र रूप धारण करेल . आपण सर्वांनीच आता हवामान बदलाच्या संकटाला सामोरे कसे जायचे याचा कृतिशील आराखडा शासन आणि लोकांच्या पातळीवर देखील आखणे गरजेचे आहे.
