घरपट्टी न भरल्यास वेंगुर्ला तहसील कार्यालयाला सील ठोकावे

   वेंगुर्ला न.प.ची विशेष सर्वसाधारण सभा 27 मार्च रोजी पार पडली. यावेळी मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवकांसह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सर्वसामान्य नागरिकांवर घरपट्टी न भरली तर प्रशासन कारवाई करते त्याचप्रमाणे वेंगुर्ला तहसील कार्यालयाची 57 हजार 760 एवढी घरपट्टी येणे बाकी आहे. सदरची घरपट्टी न भरल्यास त्या कार्यालयाला सिल ठोका अशी सूचना सभागृहाने प्रशासनाला केली. तसेच कॅम्प येथील क्रीडांगण ही न.प.ची अस्मिता आहे. गेली अनेक वर्षे या क्रीडांगणाशी शहरवासीयांच्या भावना जुळलेल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आमचे क्रीडांगण न.प.च्याच ताब्यात राहिले पाहिजे. जिल्हा प्रशासन आमचे क्रीडांगण तालुका क्रीडा केंद्राला हस्तांतरीत करीत असेल तर त्याला आमचा विरोध आहे. न.प. ही स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे आमच्या अधिकारांवरील अतिक्रमण आम्हाला मान्य नाही, असा ठराव या सभेत करण्यात आला.
शिवाजी प्रागतिक शाळेच्या जमिनीबाबतही न.प.ची शासनाकडून फसवणूक झाली आहे. न.प.च्या ताब्यातील काही महत्त्वाच्या जागा परस्पर आरक्षण बदलवून हस्तांतरित केलेल्या आहेत. यासाठी न.प.ला कोणत्याही प्रकारे सूचित केलेले नसल्याची माहिती नगराध्यक्ष गिरप यांनी दिली.
याच सभेत न.प.च्या समाजकल्याण समिती सभापतीपदी युवराज जाधव यांची तर सदस्य म्हणून सुधीर पालयेकर, शितल आंगचेकर, रवी शिरसाट आणि समिधा रेडकर यांची निवड करण्यात आली. दरम्यान, कॅम्प येथील कातकरी वस्तीतील नागरिकांसाठी 25 गुंठे जागा आरक्षित आहे. त्या जागी ‘शबरी आवास’ योजनेंतर्गत घरकुल योजना होत नसेल तर ‘प्रधानमंत्री आवास’ योजनेतून घरकुल योजना करण्याबाबत चर्चा झाली. याचा पाठपुरावा करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली.

Leave a Reply