अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, वाई-सातारा व आनंदयात्री वाङ्मय मंडळातर्फे वेंगुर्ला नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात घेण्यात आलेल्या चित्रकला-शिल्पकला नोंद लेखन कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यशाळेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाच्या संपादक वर्षा देवरूखकर यांच्या हस्ते झाले. यावेळी विश्वकोश मंडळाच्या सदस्या प्रा.शरयू आसोलकर, महादेव नाईक, विश्वकोश निर्मिती मंडळाच्या सदस्या तथा आनंदयात्री मंडळाच्या अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिका वृंदा कांबळी, महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य भरत गावडे, नगरपरिषदेच्या निवृत्त प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल आदी उपस्थित होते.
गतवष मराठी भाषेला अभिजात मराठीचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर या भाषेची महती सर्वदूर पसरविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. मराठी विश्वकोश ही मराठी साहित्य विश्वाला लाभलेली फार मोठी देणगी आहे. आत्ताचा जमाना इंटरनेट माध्यमांचा असल्याने मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने वेबसाईडच्या माध्यमातूनही ज्ञानाचा खजिना वाचकांसाठी उपलब्ध केला आहे, असे प्रतिपादन संपादक वर्षा देवरुखकर यांनी केले.
1960 मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली मराठी विश्वकोश निर्मितीला सुरूवात झाली. पुढे या कामाची व्याप्ती वाढल्याने 1980 साली मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची स्वतंत्र शाखा कार्यान्वित करण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत 1 ते 20 खंड मराठी विश्वकोश मंडळाने मराठी साहित्य विश्वात उपलब्ध केले आहेत. अनेक जिज्ञासू वाचक, अभ्यासक आपले ज्ञान अद्ययावत करण्यासाठी या विश्वकोशांचा संदर्भ घेतात, असे प्रा.शरयू आसोलकर म्हणाल्या. आपल्या भागातील विद्वान मंडळींचीही मराठी विश्वकोशात नोंद व्हावी व या नोंदी लिहिण्याचे कसब आपल्या जिल्ह्यातील कला व साहित्य क्षेत्रातील जिज्ञासूंना आत्मसाद करता यावे यासाठी ही कार्यशाळा आयोजित केली आहे. याद्वारे नवीन संधी उपलब्ध झाली असून या प्रशिक्षण कार्यशाळेतून विश्वकोशातील नोंदी लिहिणारे लेखक तयार होतील अशी अपेक्षा वृंदा कांबळी यांनी व्यक्त केली.
विश्वकोश मंडळाचे सदस्य महादेव नाईक यांनीही आपले मनोगत व्यक्त करून कार्यशाळेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून उपस्थित राहिलेल्या 48 मान्यवरांचे मनापासून आभार व्यक्त केले. त्यानंतरच्या मुख्य सत्रात स्लाईड शोच्या माध्यमातून वर्षा देवरूखकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. विश्वकोश मंडळाची स्थापना, कार्य, विस्तार, विविध ज्ञानमंडळे व त्यांचे कार्य याबाबत सविस्तर माहिती देताना चित्रकला, शिल्पकला यावरील नोंदीचे महत्त्वही त्यांनी विषद केले. नेमका हा विषय काय आहे. या विषयावरील कोणत्या नोंदी अपेक्षित आहेत, कोणकोणत्या प्रकारे आपण विश्वकोशासाठी लेखन करू शकतो व त्याद्वारे विश्वकोश निर्मिती मंडळाकडून लेखकांना काय काय फायदे मिळू शकतात याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन प्रा.सचिन परूळकर यांनी केले, तर आभार महेंद्र मातोंडकर यांनी मानले. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी महेश राऊळ, संजय पाटील, किरण राऊळ, सानिया वराडकर यांनी परीश्रम घेतले.
