जिद्द आणि कलेचा प्रवास – समीरा प्रभू

आई-वडील (महाबळ दांपत्य) आरोग्य खात्यात नोकरी करत असल्यामुळे बदली ही पाचवीला पुजलेली असायची. त्यामुळे पूर्वाश्रमीच्या सीमा यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
वेगवेगळ्या तालुक्यांतील शाळांमध्ये शिक्षण घेण्याची संधी आणि यातून वेगवेगळा परिसर अनुभवायला मिळाला.
त्यांनी रत्नागिरी येथे बी.ए. ची पदवी प्राप्त केली. लहानपणापासून घरी राहून खेळणे, अभ्यास करणे आणि टीव्ही पाहणे या त्यांच्या आवडीच्या गोष्टी होत्या. याच आवडीमुळेच पुढे टीव्ही पाहणारी नजर एका उत्तम दिग्दर्शकाची बनेल, असे कुणालाही वाटले नसेल. त्यांच्या या आवडीतूनच पटकथा लेखन आणि विविध लघपटांसाठी मिळालेली राज्यस्तरीय बक्षिसे त्यांच्या त्यातील कौशल्याची साक्ष देतात.
लग्नानंतर त्या ‘समीरा संदेश प्रभू’ झाल्या. मुलगा वरद पंधरा वर्षांचा होईपर्यंत त्यांनी घर आणि मुलाच्या संगोपनाची जबाबदारी अत्यंत निष्ठेने सांभाळली. या काळात कौटुंबिक कर्तव्यांसोबतच केळूस येथील चतुर्थीचा गणेशोत्सव आणि विठ्ठल मंदिरातील एकादशी सोहळ्याची परंपरा त्यांनी तितक्याच मनोभावे जपली.
बी.ए. नंतर  त्यांच्या शिक्षणामध्ये बराच काळ  खंड पडलेला होता. सावंतवाडी येथील छोटी नोकरी, लग्न आणि मुलाची जबाबदारी यामुळे शिक्षणापासून दूर गेलेल्या समीरा यांनी जिद्दीने कुडाळ येथे मास्टर इन सोशल वर्क (MSW) ही पदवी मिळवली. शिक्षण क्षेत्र असो किंवा कला क्षेत्र दोन्हीही ठिकाणी आई बाबांचा त्यांना नेहमीच खंबीर पाठिंबा मिळाला. याच शिक्षणामुळे समाजात मिसळण्याची संधी त्यांना मिळाली.
यानंतर त्यांनी कुडाळ येथील लॉ कॉलेजमध्ये नियमित शिक्षण घेऊन एल.एल.बी. ही पदवी प्राप्त केली आणि वकिलीची सनदही मिळवली.
समीरा प्रभू यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आत्मव्रतम्’ या संस्कृत शॉर्ट फिल्मला राज्यस्तरावर तृतीय क्रमांक मिळाला असून त्यांच्या कामावर एका उत्तम दिग्दर्शकाची मोहोर उमटली. याशिवाय ‘द गिफ्ट’, ‘NFDC चे बीज आत्मनिर्भरतेचे’, ‘अनुबंध’, ‘नाळ’ अशा शॉर्ट फिल्म्ससाठीही त्यांना विविध स्तरांवर पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या काही लघुपटांना कवी, लेखक संदीप खरे आणि अभिनेते, गायक सलील कुलकर्णी यांचेही संगीत लाभले आहे.
समीरा यांचे  मित्र-मैत्रिणींचे ग्रुप केवळ वाढदिवसाच्या शुभेच्छा किंवा ‘गुड मॉर्निंग’ संदेशांसाठी नसून, ते संकटकाळी एकमेकांच्या  मदतीला धावून जाणाऱ्या जिवाभावाच्या नात्यांचे आहेत. पती संदेश प्रभू तसेच कुटुंबीयांची प्रेरणा त्यांच्यासाठी अतिशय मोलाची ठरली आहे. त्यांच्या यशाच्या या प्रवासात ही संपूर्ण टीम नेहमीच त्यांच्या पाठीशी उभी आहे. जिद्द आणि कष्टाच्या जोरावर कला, शिक्षण, वकिली अशा सर्व क्षेत्रातील उत्तुंग भरारीला आणि भावी वाटचालीला सस्नेह शुभेच्छा
 -अ‍ॅड. अंजली विवेक मुतालिक, 
कुडाळ, मो. 9420306408

Leave a Reply