जैतिर उत्सवाची कवळासाने सांगता

तुळस गावात गेले दहा दिवस सुरू असलेल्या प्रसिद्ध जैतिर उत्सवाची सांगता उत्सवाच्या अकराव्या दिवशी बुधवारी कवळासाने झाली. पावसाने विश्रांती घेतल्याने पंचक्रोशीसह विविध ठिकाणच्या भाविकांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावत या उत्सवाचा आनंद लुटला. नराचा नारायण म्हणून प्रसिद्ध असलेला वेंगुर्ला तालुक्यातील तुळस गावचा जैतिर उत्सव प्रसिद्ध आहे. या उत्सवाला प्रारंभ झाल्यानंतर प्रथेप्रमाणे जैतिर देवाने गावातील प्रत्येक घरी जाऊन जैतिर देवाने भाविकांना दर्शन दिले. यावेळी भाविकांनी जैतिर देवाचे स्वागत करीत त्याची मनोभावे पूजा करून आशीर्वाद घेतले. बुधवारी या उत्सवाची कवळासाने सांगता झाली. पावसाने विश्रांती घेतल्याने उत्सवाला येणा-या भाविकांचा ओघ वाढलेलाच दिसून आला. मंदिर परिसरात असलेल्या विविध दुकानांना भेट देत भाविकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. उत्सवाच्या निमित्ताने गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

Leave a Reply