नारी तू नारायणी…. (अर्थात सप्तशक्ती)

“तिकडे खूप लांब सातासमुद्रापार एक मोठ्ठा राक्षस राहत असतो, त्याचे मोठे मोठे डोळे, लांब कान …..” आपण लहान असताना आपल्याला गोष्टी सांगितल्या जात तेव्हा बऱ्याचदा गोष्टीची सुरुवात थोड्या फार फरकाने अशीच असे. म्हणजे कधी सातासमुद्रापार राक्षस असेल तर कधी परी, तर कधी सुंदर राजकुमारी वैगरे वैगरे! त्यामुळे मला नेहमी प्रश्न पडायचा की नेहमी सातासमुद्रापार का असते हे? आपल्या जवळच्या समुद्राच्या पलीकडे का नसते? मग हळूहळू मोठे व्हायला लागल्यावर त्यातले वास्तव समजू लागले. लांब म्हणजे किती हे मोजण्याचे ते एक काल्पनिक अंतर होते हे लक्षात आले. पण तरीही सातच का? आठ किंवा नऊ किंवा दहा का नाही? असा विचार करताना लक्षात आले की आपल्या संस्कृतीत सात या आकड्याला थोडे जास्त महत्त्व आहे. उदा. आठवड्याचे वार सात, सप्तशती पाठातील श्लोक ७०० म्हणजे सातच्या पटीत, सप्तपदी हा विवाहातील महत्त्वाचा संस्कार, सात पर्वतांच्या कुशीत असणारी सप्तशृंगी देवी, शिवाय संगीतातील सात सूर अशी सातची महती शोधता शोधता अचानक भगवद्गीतेतील एक श्लोक मिळाला.
”कीर्ति: श्रीवाक् च नारीणाम्
स्मृतिर्मेधा धृति: क्षमा|”
भगवान श्रीकृष्ण म्हणतात की स्त्रियांमध्ये या सात शक्तींच्या रूपात मी राहतो. म्हणजेच स्त्री ही जीवनात अनेक भूमिका पार पाडत असते. म्हणूनच तिच्यातील या सात शक्तींचा उत्कर्ष होऊन ती ‘नारायणी’ म्हणजेच सर्व शक्तिमान व्हावी असे अपेक्षित आहे. या शक्तीच्या आधारेच आपली प्रकृती, संस्कृती, परंपरा, पर्यावरण, कुटुंब या सगळ्यांच्या बाबतीत जाणीव असणारी, जागरूक असणारी आणि हा वारसा अखंड पुढे नेणारी महिला ही एका अर्थी देशाचा कणा आहे असे म्हणावे लागेल.
आई मुलांना सुसंस्कारित करते. त्याच्या बळावरच मुले वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवतात. शिवाजीमहाराजांना घडवणारी जिजाबाईसारखी आई होती, म्हणून राजांच्या मनात स्वराज्याची संकल्पना रुजली. श्यामच्या आईने अगदी हलाखीच्या परिस्थितीत पण मुलांवर योग्य संस्कार केले म्हणून आज साने गुरुजींना आपण आदर्शवत मानतो. सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या आयानी त्यांना देशभक्तीचे बाळकडू पाजले आणि त्यांच्यातील त्यागामुळे आपण आज निर्धोकपणे आयुष्य जगत आहोत. म्हणूनच तिच्या प्रभावाने कुटुंबाला कीर्ती प्राप्त होते असे म्हणावे लागेल.
वास्तविक श्री म्हणजे धन किंवा संपत्ती! पण संपत्ती म्हणजे केवळ आर्थिक संपत्ती का? तर धन, धान्य, पशु-पक्षी, पर्यावरण हेही या संपत्तीमध्ये अपेक्षित आहे. धान्य, पशु-पक्षी यांना तर त्या जिवापाड जपतातच. आपल्या घरातील शैक्षणिक संपत्तीचा विकास व्हावा म्हणूनही ती जागरूक असते. अगदी एखादी अशिक्षित महिलासुद्धा आपल्या मुलांना योग्य शिक्षण मिळावे म्हणून झटत असते. आज आयएएस अधिकारी झालेल्या मनिषा धार्वे, श्रीधन्या सुरेश अशी काही उदाहरणे आपल्याला आपल्याच देशात पाहायला मिळत आहेत. पण त्याचबरोबर आर्थिक संपत्तीसुद्धा आपल्याकडे योग्य मार्गाने येते आहे का यासाठी बहुतांशी स्त्रिया जागरूक असतात. स्टॅम्प घोटाळ्यातील तेलगीच्या पत्नीला जेव्हा आपला पती कोणत्या मार्गाने पैसा मिळवत आहे हे समजले तेव्हा तिने त्या पैशांना नाकारले. शिवाय तेलगीच्या मृत्यूनंतर तिने तो पैसा सरकारी खात्यात जमा केला. म्हणूनच तिचा हा ठामपणा हीच तिची खरी ताकद ठरली.
योग्य बोलण्याचे, वागण्याचे कसब स्त्रियांमध्ये उपजतच असते. म्हणूनच लग्नानंतर दुसऱ्या घरात येऊनही ती अनेक इतर कुटुंबांना जोडत असते. तिचा हाच वारसा स्वाभाविकपणे पुढच्या पिढीकडे जातो. कारण मुले नेहमी अनुकरणशील असतात. आपल्या गोड बोलण्याने ती मुलांनाही शिस्त लावत असते. तिची भाषा जर शिवराळ असेल तर साहजिकच मुले त्याच भाषेत बोलतात. त्यामुळे वाणी हे आपले एक आयुध आहे हे लक्षात घेऊन स्त्रीने त्याचा योग्य वापर करण्याची गरज आहे. अगदी पुराणातील उदाहरण द्यायचे झाले तर सावित्रीने आपल्या वाक्चातुर्याच्या बळावरच यमाकडून आपल्या पतीचे प्राण परत मिळवले होते. तर आधुनिक सावित्रीने आपल्या याच कौशल्यावर स्त्रियांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली होती.
स्मृती म्हणजे ढोबळ मानाने आपण मागच्या गोष्टी लक्षात असणे असे म्हणतो. आताच्या भाषेत सांगायचे झाले तर मोबाईल, संगणक यांमध्ये जशी स्टोअरेज सिस्टीम असते तशी आपल्या मेंदूची ही स्टोअरेज सिस्टीम आहे. आणि स्त्रियांमध्ये ती अधिक सक्षम असते. त्याच्या बळावरच ती घरातील रोजची कामे अष्टभुजा देवीसारखी पार पाडत असते. एकाच वेळी अनेक आघाड्या ती लिलया सांभाळत असते. शिवाय आपल्या घरातील परंपरा, कुळाचार असोत किंवा काही पारंपारिक पदार्थ असोत ते सर्व मागच्या पिढीकडून समजून घेऊन ती पुढच्या पिढीकडे पोचवण्याचे काम उत्तम प्रकारे करत असते.
मेधा म्हणजे बुद्धी असे म्हटले जाते. पण बुद्धी म्हणजेच धारणाशक्ती, समज, तर्कनिष्ठ बुद्धी, संश्लेषण, विश्लेषण हे सर्व घटक यामध्ये अभिप्रेत आहेत. या सर्व घटकांचा वेगवेगळा विचार केला तर लक्षात येते की धारणाशक्ती म्हणजे एखादी गोष्ट समजून घेऊन आपल्या मेंदूत त्याची नोंद ठेवणे. नोंद केलेली गोष्ट समजून घेणे, त्यावर तर्कनिष्ठ विचार करणे. त्याची योग्यायोग्यता पडताळणे म्हणजे मेधा! उदा. गुलाबजाम जेव्हा आपण पहिल्यांदा पाहतो तेव्हा मेंदू त्याचा आकार, रंग, पोत याची नोंद करतो. मग ही वस्तू कशासाठी उपयुक्त आहे याचा विचार केला जातो. मग तो खाण्याचा पदार्थ आहे हे निश्चित झाल्यावर तो खाणे योग्य आहे की अयोग्य याचा विचार केला जातो. कारण दोन महिन्याचे मूल गुलाबजाम खाण्यास योग्य नसते. हा विचार म्हणजेच तर्कनिष्ठ बुद्धी, संश्लेषण, विश्लेषण! हे सर्व गुण स्त्रियांमध्ये ओतप्रोत भरलेले असतात. त्याच्या जोरावरच ती कुटुंबाचे आणि मुलांचे पालनपोषण करत असते. आपल्या कुटुंबासाठी योग्य काय, अयोग्य काय हे ठरवून योग्य गोष्टींना प्राधान्य देणे ही तिच्यातील मेधा!
धैर्य, सहनशीलता म्हणजे धृती! पण अन्याय, अत्याचार सहन करणे म्हणजे सहनशीलता नव्हे. स्त्रिया सोशिक, सहनशील जरूर असतात. पण शेपटीवर पाय दिल्यावर चवताळून उठणाऱ्या नागिणीप्रमाणे त्या वेळ पडली तर आक्रमक बनतात. म्हणूनच सहनशीलता हा दुबळेपणा ठरत नाही. स्त्रीमध्ये असेच धैर्य आहे आणि म्हणूनच शौर्य आहे. सिंधुताई सपकाळ सारखी एखादी धैर्यवान स्त्री इतक्या संकटाना तोंड देत दुसऱ्या निराधारांसाठी आधार होते. धैर्यातून तिच्यात आलेले शौर्य हीच तिची शक्ती आहे.
क्षमा ही शेवटची शक्ती वर्णन केली आहे. स्त्रिया या जात्याच क्षमाशील असतात. आपल्या मुलानी केलेले अपराध पोटात घेऊन ती त्याला योग्य दिशा दाखवण्याचे काम करते. अर्थात त्यासाठी ती जागरूक असणे आवश्यक आहे. कारण आंधळेपणाने ती मुलांच्या चुकांवर पांघरूण घालत राहिली तर मुलांना योग्य वळण लागण्याऐवजी ती चुकीच्या मार्गाने वाटचाल करतील. जे कुटुंब, समाज व राष्ट्रासाठी अहितकर ठरेल. म्हणून डोळसपणे केलेली क्षमा येथे अपेक्षित आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यावर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने संघविचाराने शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या विद्याभारती या अखिल भारतीय शिक्षण संस्थेने एक कोटी माता पालकांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प केला आहे. म्हणूनच महिलांनी महिलांसाठी महिलांचे केलेले संमेलन म्हणजे सप्तशक्ती संगम! आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठ ठिकाणी ‘सप्तशक्ती संगम’ माध्यमातून अशी संमेलने घेतली गेली. स्त्रियांमध्ये असलेले किर्ती, धन, वाणी, स्मृती, धृती, मेधा आणि क्षमा हे सात गुण अधिक विकसित करून सप्तशक्ती रूपातील मातृत्वाची ओळख करून घ्यावी असे येथे अभिप्रेत आहे. या मातृशक्तीने आपल्यातील शक्ती ओळखावी, स्वतःचा अभिमान जपावा आणि त्याबरोबरच स्वतःची ओळख निर्माण करावी. देशासाठी आणि कुटुंबासाठी आपण करत असलेली कर्तव्य अधिक जागरूकपणे पार पाडावी. परंपरेचा वसा आणि वारसा पुढे चालू ठेवावा.
प्राचीन भारतात गार्गी, मैत्रेयी, अनुसूया यासारख्या अनेक महिला ज्ञान, तप, नीतिमत्ता आणि शिक्षण यांचे ज्वलंत उदाहरण होती.आधुनिक काळात पण महिलांनी शिक्षण, प्रशासन, कृषी, विज्ञान, संरक्षण, खेळ या सर्व क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. एकत्र कुटुंब,आहार विहार, परंपरा, पर्यावरण असे अनेक विषय विश्वशांतीसाठी आवश्यक आहेत. खर तर याचा मूळ आधार भारतीय स्त्री होती आणि आहेही. किंबहुना ती याला आपली जबाबदारी न मानता धर्म मानत असे. काळाच्या ओघात आपण आपलीच संस्कृती विसरत चाललो आहोत आणि पाश्चात्य देशांचे अनुकरण करत आहोत. देशाच्या विकासात महिलांनी अधिकाधिक सक्रिय होणे, मुलांच्या समग्र विकासात आईची नक्की भूमिका काय हे समजावून घेणे, नागरिक कर्तव्याची जाणीव करून घेणे, स्वतःच्या क्षमता जाणून घेणे आणि यासाठी मातृशक्ती म्हणून आपण काय करू शकतो याचा शोध आणि बोध या सप्तशक्तीच्या माध्यमातून करून घेतला तर मला वाटते नारीची नारायणी व्हायला वेळ लागणार नाही.
-डॉ. मेधा फणसळकर
मो. ९४२३०१९९६१

Leave a Reply