माणूस निवृत्त झाला की चार भिंतींत अडकतो, हा समज मोडीत काढत भारतीय नौदलातील काही निवृत्त सहकाऱ्यांनी मैत्रीचा एक नवा आणि आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. लोणावळ्याच्या डोंगरदऱ्यातून १९८२ साली सुरू झालेला या समूहाचा पर्यटनाचा प्रवास आज १०० व्या सहलीच्या ऐतिहासिक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. निव्वळ फिरणे हा उद्देश न ठेवता, एकमेकांच्या सुख-दुःखात खंबीरपणे उभे राहणाऱ्या या ‘कौटुंबिक’ समूहाने आपल्या अभिनव पर्यटन प्रयोगाची शंभरी अत्यंत दिमाखात साजरी केली आहे. या समूहाची पहिली सहल १९८२ मध्ये लोणावळा येथे गेली होती आणि योगायोगाने शंभरावी सहल देखील त्याच लोणावळ्यात आयोजित करून सदस्यांनी आपल्या ४० वर्षांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. सुरुवातीला केवळ पुरुष सहकाऱ्यांपुरता मर्यादित असलेला हा गट १९८५ पासून खऱ्या अर्थाने ‘कौटुंबिक’ झाला आणि आज या गटात ३५ ते ४० वर्षे जुने ऋणानुबंध जपलेले सदस्य मोठ्या संख्येने सहभागी आहेत. कोणताही आर्थिक स्तर किंवा सामाजिक पार्श्वभूमी आड येऊ न देता केवळ निखळ मैत्रीच्या धाग्याने हा संपूर्ण समूह एकत्र बांधला गेला आहे. या पर्यटकांनी गेल्या चार दशकांत संपूर्ण भारत पालथा घातला आहे. दक्षिण भारतातील कर्नाटक, केरळ, तामिळनाडूपासून ते उत्तरेकडील लेह-लडाख, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशपर्यंत या पर्यटकांच्या पाऊलखुणा उमटल्या आहेत. पूर्वेकडील आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश यांसारख्या दुर्गम भागातही त्यांनी यशस्वी मुशाफिरी केली आहे. भारताच्या सीमा ओलांडून नेपाल, भूतान, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, दुबई आणि युरोपमधील इंग्लंड, फ्रान्स, स्वित्झर्लंडसह तब्बल ११ देशांमध्ये या समूहाने पर्यटनाचा आनंद लुटला आहे. या सर्व सहलींच्या यशस्वी आयोजनाचे मुख्य श्रेय ग्रुपचे कॅप्टन श्री. रघुनाथ मिशाळ यांना जाते. त्यांना तुकाराम कदम, उदय प्रधान, प्रकाश साटम, रघुनाथ भालेराव, श्रीकृष्ण वायरकर, नंदकुमार बेर्डे, अशोक कन्नुरे, मारुती कातरकर, विठ्ठल रेडीज, नंदकुमार माळी, विलास मुळ्ये आणि बाबूराव साळगावकर यांसारख्या सदस्यांची भक्कम साथ लाभली. सहलीचे बुकिंग असो वा जेवणाची सोय, प्रत्येक गोष्ट अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडली जाते. महिला सदस्यांमध्ये संपदा कदम, अलका प्रधान, आरती मुळ्ये व त्यांच्या सहकारी महिलांनी नियोजनात मोलाचा वाटा उचलला असून सहलीदरम्यान सदस्यांचे वाढदिवस आणि सांस्कृतिक कार्यक्रमही उत्साहात साजरे केले जातात.
या समूहाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ पर्यटन हाच हेतू नसून, सदस्यांच्या कौटुंबिक जीवनातही हा समूह एका परिवारासारखा सहभागी होतो. कुणाकडेही दुःखद प्रसंग ओढवल्यास संपूर्ण ग्रुप त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. याच सामाजिक जाणीवेची आणि एकीची दखल घेऊन ‘सावली प्रतिष्ठान, मुंबई’ या संस्थेने २०१५ मध्ये त्यांना ‘सुमित्रा मनोहर जैतपाल स्मृती’ पुरस्कार देऊन गौरविले आहे. सध्या ही मंडळी जपान सहलीचे नियोजन करत असून, ‘प्रवास माणसाला अनुभवांनी श्रीमंत करतो आणि मैत्री जीवनाला खऱ्या अर्थाने आधार देते,’ असा मोलाचा संदेश या ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या कृतीतून समाजाला दिला आहे.
