इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपल्या कामाची दखल घेतली जावी, असे प्रत्येक भारतीयाचे सुप्त स्वप्न असते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील मठ हे मूळ गाव असलेल्या ऐश्वर्या मराठे नगरकर या आपल्या कोकणच्या लेकीने असेच मोठे स्वप्न पाहिले आणि ते आपल्या जिद्दीच्या जोरावर पूर्ण करून दाखवले. आयटी क्षेत्रात उच्च पदावर काम करत असतानाही त्यांनी वेगळा ध्यास घेतला. रॉयल एनफिल्ड बाईकवरून गोल्डन क्वाड्रीलॅटरल महामार्ग पार करत केवळ पंधरा दिवसांत पुणे – चेन्नई – कोलकाता – दिल्ली – पुणे असा सुमारे ६००० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून त्यांनी एक नवा इतिहास घडवला.
छान कुटुंब, सासू, आई वडील, प्रोत्साहन देणारे पती हार्दिक आणि गोड मुलगी आर्या यांना पंधरा दिवस पुण्यात ठेवून एकटीने सोलो ट्रीप करणे हे खरंच धाडसाचे काम आहे.
रॉयल एनफिल्ड ही मजबूत आणि स्थिर गाडी असल्यामुळे ऐश्वर्याला ती विशेष आवडते. सामान्यतः या गाडीची क्रेझ कॉलेज तरुणांमध्ये दिसते. या गाडीचा साईड स्टँड किंवा मिडल स्टँड लावणे हेही अनेकांना कठीण वाटते. पण ऐश्वर्याने हीच गाडी निवडून तिची संपूर्ण माहिती करून घेतली. पंक्चर, हवा कमी होणे अशा अडचणी स्वतः सोडवता याव्यात म्हणून त्यांनी टूलकिट वापरण्याचे प्रशिक्षण घेतले, बाईक सर्व्हिसिंगचे देखील प्रशिक्षण घेतले.
या प्रवासासाठी त्यांनी वर्षभर जिम करून स्वतःला तंदुरुस्त केले. पुण्यातील महिला कोचकडून फीट राहण्याचे धडे घेतले. दिवसाला सुमारे पाचशे किलोमीटर प्रवास करता यावा यासाठी योग्य आहार आणि फिटनेस याचाही त्यांनी अभ्यास केला.
आज ‘द यंगेस्ट मदर बाईक रायडर – गोल्डन क्वाड्रिलेटरल सोलो पूर्ण केला – इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ असा मान मिळवताना त्यांच्या अथक परिश्रम, सातत्य आणि जिद्द यामागे उभी असल्याचे स्पष्ट दिसते.
यशाला शॉर्टकट नसतो, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले.
प्रवासादरम्यान अनेक अडचणीही आल्या. चेन्नई परिसरात हवामानातील बदल आणि ‘दिटवा’ नावाच्या वादळाचा सामना करावा लागला. वाराणसी भागात रात्री सातनंतर प्रचंड धुके होते. जंगलातून जाताना नेटवर्क नव्हते आणि दोन फूट पुढेही रस्ता दिसत नव्हता. अशा वेळी एका बसच्या मागे मागे गाडी चालवत त्या टुंडला गावात पोहोचल्या. तिथे एका हॉटेलमध्ये राहावे लागले, परंतु खोलीचे दार आतून नीट लागत नव्हते. थकलेले शरीर असूनही बॅगा दाराला अडवून त्यांनी ती रात्र काढली. पुढे आग्रा येथे त्या रात्री अनेक अपघात झाल्याचे कळल्यावर त्या निर्णयाचे महत्त्व अधिक जाणवले.
या सर्व प्रवासात “मारुतीराया माझा रक्षणकर्ता आहे, तो मला माझ्या मोठ्या भावासारखा वाटतो,” असे त्या श्रद्धेने सांगतात. भारतातील प्रत्येक महिला या कोणत्याही राज्यात सुरक्षितपणे राहू शकते तसेच जीपीएस माध्यमातून डिजिटल इंडिया किती प्रगती करत आहे हेही अधोरेखित होते.
आई-वडील, सासू आणि पती हार्दिक यांचे प्रोत्साहन तसेच आईने करून दिलेले ठेपले, ड्रायफ्रूट लाडू आणि ऑफिसमधील सहकाऱ्यांनी दिलेला खाऊ यामुळे प्रवासात ऊर्जा मिळाली, असे त्या सांगतात.
या सोलो प्रवासाला निघताना छोट्या आर्याने आईला विचारले होते, “आई, तू इतक्या ठिकाणी जाणार आहेस, मला काय आणशील?”
मुलीच्या या हट्टासाठी ऐश्वर्याने तेरा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधून मूठभर माती आणली. आपल्या मातीशी प्रामाणिक राहण्याचा हा सुंदर संदेशच यातून त्यांनी दिला. आज या मातीचे नमुने त्यांच्या अहिल्याबाई हायस्कूलमध्ये पाहायला मिळतात. शाळेनेही आपल्या विद्यार्थिनीचा सत्कार करून तिच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त केला.
ऐश्वर्याच्या प्रवासाबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर त्यांच्या “सखी रायडरणी” या यूट्यूब चॅनेल व इंस्टाग्राम वर विविध ठिकाणचे अनुभव, संस्कृती आणि लोकजीवन पाहायला मिळते.
त्यांचे हे धाडस, परिश्रम आणि जिद्द निश्चितच प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.
-अॅड. अंजली विवेक मुतालिक,
कुडाळ, मो. 9420306408
