जेष्ठ साहित्यिक वृंदा कांबळी यांची ‘तटस्थतेच्या अवकाशातून’ ही नवीन कादंबरी वाचकांच्या भेटीला आली असून याचे प्रकाशन साई मंगल कार्यालयात खर्डेकर महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य आनंद बांदेकर, किरातच्या सीमा मराठे, वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे सचिन परुळकर, प्रदीप कुबल, श्री. गावडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष दिपेश परब, जिल्हा कार्यकारणी सदस्य महेंद्र मातोंडकर आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ‘तटस्थतेच्या अवकाशातून’ या कादंबरीबाबत बोलताना वृंदा कांबळी म्हणाल्या, कादंबरी वर्तमानकाळ आणि भूतकाळ अशा दोन पातळ्यांवर घडत आहे. नायकाच्या जीवनातील घटना फ्लॅश बॅकने दाखवल्या आहेत. या कादंबरीत नायकाच्या कुटुंबातील व सभोवतालची अनेक व्यक्तिरेखा आल्या आहेत. त्या एकमेकांत गुंतलेल्या आहेत. या व्यक्तिरेखांच्या सुख दुःखाच्या उभ्या आडव्या धाग्याची कादंबरी बनली आहे. कथानकातील घटना कोकणातील एक खेडे, मुंबई, रत्नागिरी व वर्तमानात पुणे शहरात घडत आहेत.
या कादंबरीचा नायक असाध्य अशा आजाराने आजारी आहे. आपण आता थोड्याच दिवसांचे सोबती आहोत हे त्याला माहिती आहे. त्याने ते स्विकारलेली आहे. अशा मानसिक अवस्थेत भय, हुरहुर, आसक्ती व विरक्ती यांची रस्सीखेच अशा मानसिकतेतून जात असताना, मनाच्या व शरीराच्या वेदना सहन करत असताना त्याची मानसिकता काय असेल? स्वतःच्या भूतकाळाचा व एकूण जीवनाचा विचार करत असताना तो आपल्याच जीवनाकडे तिऱ्हाईत दृष्टीने कसा पाहात असेल? आणि तो जणू स्वतःचेच अंतरंग खरवडून काढतो आहे. अशा वेळेस तो कोणता विचार करत असेल? स्वतःच्या चुकांचा कसा स्विकार करील? आपल्या कृतीचे कसे समर्थन करील? साऱ्या भावनिक गुंत्यातून तो स्वतःची सुटका कशी करून घेईल? एखाद्या नदीच्या काठावर उभे राहून नदीच्या प्रवाहाकडे पहावे त्याप्रमाणे स्वतःच्याच जीवन प्रवाहाच्या तटावर उभे राहून तो आपल्या जीवन प्रवाहाकडे तटस्थपणे कसा पाहील? तटस्थतेचे अवकाश वैचारिक दृष्ट्या कसे व्यापक बनत जाईल, ते बदलत असताना त्याची वैचारिक भूमिका कशी बदलत जाईल या आणि अशाच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रवास म्हणजेच ही कादंबरी आहे.
या कादंबरीतून काही सामाजिक प्रश्न निर्माण होतात. रूढीप्रियतेमुळे कर्जबाजारी होऊन वर्षानुवर्षे कर्जाचे डोंगराखाली चिरडून जाणाऱ्या माणसांची मानसिकता कशी बदलणार? संपत्ती आणि सत्ता यांच्याच पुढे फक्त वाकणाऱ्या मुर्दाड व्यवस्थेत गरिबांचा वाली कोण असेल? गरिबांच्या मुलांच्या गुणांची, कलांची होणारी मुस्कटदाबी कशी थांबेल? कोकणातील तरूण पोटासाठी व शिक्षणासाठी मुंबईची वाट धरतात. घरे नंतर पडून जातात हे भीषण वास्तव कसे बदलेल? विषम समाज रचनेत भरडल्या जाणाऱ्या गरीबाच्या मुलाच्या मनाच्या विदारक दुःखाचे वर्णन यात आले आहे. या आणि अशा अनेक प्रश्नांना कादंबरी स्पर्श करते आहे. नायकाच्या जीवन प्रवासाच्या प्रवाहात हे असे अनेक सामाजिक प्रश्न त्या अनुषंगाने येत आहेत. साठ वर्षापूर्वीच्या ग्रामीण जीवनाचे प्रतिबिंब आले आहे. त्याचबरोबर वर्तमानातील नागरी जीवनाचे चित्रण आले आहे. दारिद्र्य, गरीब-श्रीमंत दरी, अंधश्रद्धा, रूढीप्रियता इत्यादीमुळे जीवनाला आलेल्या विरूपतेचे दर्शन असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, सांगली येथील दिभो सन्स या कंपनीचे सीईओ दिलीप भोसले हे निर्माते व दिग्दर्शक आहेत. यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. ते माझ्या ‘मागे वळून पाहाता’ या पुस्तकावर फिल्म काढू इच्छितात. कदाचित आवडली तर यावरही काढू शकतील. माझे हे चौदावे पुस्तक व सहावी कादंबरी आहे. अशी माहिती ज्येष्ठ साहित्यिक वृंदा कांबळी यांनी दिली.
