वेंगुर्ला न.प.सन 2026-27च्या 15 कोटी 64 लाख 81 हजार 984 रूपयांच्या शिलकी अंदाजपत्रकाला झालेल्या खास बैठकीत मान्यता देण्यात आली. न.प.च्या शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत मुख्याधिकारी हेमंत किरूळकर यांनी 112 कोटी 13 लाख 24 हजार 364 रूपयांचे अंदाजपत्रक सादर केले. 96 कोटी 48 लाख 42 हजार 400 रूपयांचा महसूली, भांडवली खर्च वगळता 15 कोटी 54 लाख 81 हजार 984 रूपयांच्या शिलकी अंदाजपत्रकाला सर्वानुमते मंजूरी देण्यात आली. प्रशासनाने आगामी वर्षात निधीचे नियोजन करताना जनतेच्या मुलभूत समस्यांच्या कामांवर लक्ष केंद्रित करावे, असा ठराव घेण्यात आला.
येत्या वर्षात शिक्षण, महिला बालविकास, स्वच्छता, आरोग्य, पर्यटन, पाणीप्रश्न यावर लक्ष केंद्रीत करावे. शहरातील मराठी शाळा वाचाव्यात यासाठी प्रयत्न व्हावेत, मराठी शाळांमध्ये मुलांची संख्या वाढावी, मराठी शाळांमधील शैक्षणिक दर्जा वाढवा, तसेच मुलांच्या उपस्थितीसाठी प्रोत्साहन योजना तयार करावी आदींसाठी सर्व नगरसेवकांमध्ये सहमती झाली. शहरात पर्यटन प्रकल्प, उद्याने आदी विकासकामे झालेली आहेत. नवीन कामे मंजूर करण्यापेक्षा अगोदर झालेल्या कामांचा दर्जा उत्तम करण्यासाठी प्रयत्न व्हावा, शहर 100 टक्के टँकरमुक्त व्हावे यासाठी नारायण तलावाचे विस्तारीकरण व्हावे, अशी मागणी नगरसेवकांनी केली.
मराठी शाळांमधील मुलांची संख्या कमी झाल्याने अनेक शाळा बंद पडण्याच्या अवस्थेत आहेत. वेंगुर्ला शहरातील शाळांची अवस्था तेवढीशी बिकट नसली तरी भविष्यातील धोके ओळखून मराठी शाळांमध्ये आपल मूल दाखल करणाऱ्या पालकाच्या घरपट्टी करात विशेष सवलत देण्याचा प्रस्ताव नगराध्यक्षांनी सभागृहासमोर मांडला. या प्रस्तावाला सर्वानुमते संमती देत अशा प्रकारची योजना तयार करून ती मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात यावी, असा ठराव सभागृहात घेण्यात आला. शासनाचे मार्गदर्शन घेऊन किती सवलत देता येईल व त्याचे निकष काय असावेत याबाबत पुढील सभेत निर्णय घेण्यात येईल, असे नगराध्यक्ष गिरप यांनी सांगितले.
