बॅ.खर्डेकर महाविद्यालयामध्ये ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020’ यावर 26 फेब्रुवारी रोजी एक दिवशीय राष्ट्रीय परिसंवाद पार पडला. याचे उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळाचे कोल्हापूरचे सचिव प्रा.जयकुमार देसाई व अंजली देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपिठावर कोल्हापूरचे माजी नगरसेवक अजितराव मोरे, प्रशासन अधिकारी पृथ्वीराज मोरे, ऋतुजा मोरे, अजितसिंह मोहिते, सारिका मोहिते, पृथ्वी अजितसिंह मोहिते आणि प्राचार्य डॉ.धनराज गोस्वामी उपस्थित होते. दरम्यान, डब्ल्यू.आर.सी. आय.सी.एस.एस.आर.चे
डायरेक्टर प्रा.कविता लघाटे आणि बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापक मिलिंद मगदूम यांनी परिसंवादाला शुभेच्छा दिल्या. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. धनश्री पाटील यांनी तर आभार प्रा.बी.एम. भैरट यांनी मानले.
विद्यार्थ्यांनी केवळ सैद्धांतिक ज्ञानावर न थांबता व्यवसायाभिमूख ज्ञान आत्मसात करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळाचे कोल्हापूरच्या चेअरमन डॉ.मंजिरी मोरे यांनी केले.
परिसंवादाच्या प्रथम सत्रात गोवा येथील सारस्वत कॉलेजचे प्राचार्य डॉ.संतोष पाटकर यांनी ग्रामीण भारतातील उच्च शिक्षणाच्या अंमलबजावणीतील बदल आणि राष्ट्रीय शिक्षण धोरणाची भूमिका यावर सखोल विवेचन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व स्पर्धात्मक शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी संस्थांनी नवोन्मेषी दृष्टिकोन स्वीकारणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या सत्राचे चेअरमन प्रा.एस.एस.चमणकर हे होते. आभार डॉ.व्ही. एस. पाटोळे यांनी मानले.
द्वितीय सत्रात नाशिक येथील के.एन.नाईक कॉलेजच्या प्राध्यापिका रेखा जाधव यांनी ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील क्रेडिट सिस्टीम : विद्यार्थी केंद्रित शिक्षणाकडे एक पाऊल’ यावर मार्गदर्शन केले. त्यांनी क्रेडिट आधारित प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना विषय निवडीतील स्वातंत्र्य, शैक्षणिक लवचिकता आणि बहुआयामी शिक्षणाच्या संधी कशा उपलब्ध होतात, याचे विश्लेषण केले. या सत्रात डॉ.मनिषा मुजुमदार यांनी चेअरपर्सन म्हणून काम पाहिले. संशोधन सादरीकरणाच्या सत्रामध्ये बॅ.खर्डेकर महाविद्यालयाची वेदश्री चव्हाण व पार्थ कोळंबकर यांनी युवा गटातून आपले संशोधन पेपर सादर केले. तसेच प्राध्यापक वर्गातून डॉ.कबीर, डॉ. हॅन्ड्री डिसोजा व प्रणव सावंत यांनी आपले शोधनिबंध मांडले. या सत्राचे आभार प्रा.पी.एस. प्रभू यांनी मानले.
परिसंवादाच्या समारोपप्रसंगी प्राचार्य गोस्वामी म्हणाले की,शिक्षण केवळ नोकरीपुरते मर्यादित न राहता ते जीवनमूल्ये, सामाजिक बांधिलकी, पर्यावरणाविषयी संवेदनशीलता आणि राष्ट्रीय भावना जोपासणारे असावे. तर शिक्षकांनीही नवीन धोरणानुसार अध्यापन पद्धतीत नवकल्पना, डिजिटल साधनांचा प्रभावी वापर, अनुभवाधारित शिक्षण आणि सातत्यपूर्ण मूल्यमापन यांचा अवलंब करणे काळाची गरज असल्याचे सांगितले.
या परिसंवादात गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक आदी राज्यांसह देशभरातून 130 पेक्षा जास्त संशोधक व विद्यार्थी सहभागी झाले होते. या परिसंवादास वेस्टर्न रिजनल सेंटर, आय.सी.एस.एस.आर., मुंबई व बँक ऑफ महाराष्ट्र यांचे सहकार्य लाभले. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक एस. एच. माने हे देखील उपस्थित होते. या परिसंवादाच्या यशस्वी आयोजनासाठी बॅ.खर्डेकर महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. परिसंवादाचे प्रास्ताविक संयोजक प्रा.डी.बी.राणे यांनी, सूत्रसंचालन डॉ.बी.जी. गायकवाड व प्रा.पी.एस.प्रभू यांनी तर आभार डॉ. मनीषा मुजुमदार यांनी मानले. परिसंवादाच्या निमित्ताने संस्थेतील पदाधिकाऱ्यांनी महाविद्यालयाच्या ग्रंथालयास सदिच्छा भेट दिली. ग्रंथपाल प्रा. शुभदा माने यांनी स्वागत केले. यावेळी ग्रंथालयातील दुर्मिळ हस्तलिखितांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.
