रेडी येथील यशवंतगड किल्ल्यावरून वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी व गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्या उपस्थितीत व्यसनमुक्तीचे फलक उभारून व्यसनमुक्त गड संवर्धन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. सध्याचे गुन्हे घडतात ते व्यसनामधून घडतात. व्यसनमुक्तीसाठी मनाचा निश्चय महत्वाचा आहे. समाजात असे व्यसनमुक्तीचे कार्यक्रम घेऊन जनजागृती करणे काळाची गरज आहे. प्रत्येक माणसाने व्यसनापासून दूर राहून आदर्श नागरिक बनावे, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी केले. याप्रसंगी नशाबंदी मंडळ राज्य संघटक व सचिव अमोल मडामे, नायब तहसीलदार राजन गवस, रेडी सरपंच रामसिंग राणे, उपसरपंच आनंद भिसे, अजित सावंत, आरवली सरपंच समीर कांबळी आदी उपस्थित होते. या उपक्रमात नशाबंदी मंडळ मुंबई, नशामुक्त भारत अभियान टीम, जि.प.समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग, जिल्हा पोलीस यंत्रणा, दुर्ग मावळा ग्रुप सिंधुदुर्ग व दुर्गरक्षक प्रतिष्ठान रेडी, शिरोडा-खर्डेवाडी शाळा, जिल्हा तंबाखू नियंत्रण विभाग इत्यादी संस्थांनी आपला सहभाग दर्शविला.
नशाबंदी मंडळाचे मासिक ‘कल्याणयात्रा- व्यसनमुक्तीच्या गाथा‘चे प्रकाशन गटविकास अधिकारी वासुदेव नाईक व पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यसनमुक्ती विषयावर खर्डेवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. या कार्यक्रमाला दुर्ग मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य कोकण विभागीय अध्यक्ष गणेश नाईक, जिल्हाध्यक्ष उत्कर्षा वेंगुर्लेकर व दुर्ग मावळाचे सदस्य समिल नाईक, साईप्रसाद मसगे, दुर्गरक्षक प्रतिष्ठान रेडी अध्यक्ष नारायण तेंडोलकर, सचिव भूषण मांजरेकर, सदस्य अनसा भगत, आबा चिपकर, शस्त्र प्रदर्शन ज्ञानेश्वर राणे, ग्रामसेवक श्री.बागायतकर, पोलीस पाटील, मुख्याध्यापक व शिक्षक वृंद, अंगणवाडी सेविका, आशासेविका, बचत गट महिला, जिल्हा आरोग्य तंबाखू नियंत्रण मंडळ व इतर शासकीय अधिकारी, नशाबंदी मंडळाचे कोकण विभाग प्रमुख व मुंबई उपनगर संघटक दिशा कळंबे, मुंबई शहर संघटक चेतना सावंत, नशामुक्त भारत अभियान पालघर जिल्हा सदस्य, नशाबंदी मंडळाचे पालघर जिल्हा संघटक मिलिंद पाटील उपस्थित होते. यावेळी गडावर भरविण्यात आलेल्या इतिहासकालीन साहित्याच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रास्ताविक सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी तर सूत्रसंचलन व आभार दर्शना पाताडे यांनी केले.
