वेंगुर्ला नगरपरिषदेवर प्रशासकाचे नियंत्रण नसल्यामुळे शहरातील विकासकामांची वाताहत झाली आहे. नगरपालिका ही स्वायत्त संस्था आहे. तरीही शहरवासीयांचे असंख्य प्रश्न कधीच सुटत नाहीत. ग्रामीण भागातील जनतेला आपले प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामसभा हे हक्काचे व्यासपीठ असते. त्याच धर्तीवर नगरपरिषद, नगर पंचायत क्षेत्रातील नागरिकांसाठी शासनाने नगरसभा घ्यावी अशा मागणीचा ठराव जागरूक नागरिकांच्या बैठकीत करण्यात आल्या.
वेंगुर्ला शहरातील विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी भटवाडी येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात मंगळवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला शहरवासीयांची उपस्थिती कमी असली तरी या बैठकीत शहरातील अनेक समस्या मांडण्यात आल्या. यावेळी माजी नगराध्यक्षा नम्रता कुबल, माजी नगराध्यक्ष सुनील डुबळे, अॅड. आधार फाऊंडेशनचे सचिव नंदन वेंगुर्लेकर, खजिनदार डॉ. नंदन वेंगुर्लेकर, साहस प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष रुपाली पाटील, माजी नगरसेवक महेश वगुर्लेकर, जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत, वीज ग्राहक संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय गावडे, सचिन कदम, सुहास मांजरेकर, सुनील वालावलकर, प्रभाकर पडते, महेंद्र मातोंडकर, नरेंद्र गावडे, काजू व्यावसायिक दिलीप सामंत, देवेंद्र गावडे, अनंत घटकर, जयराम वायंगणकर आदी उपस्थित होते.
मच्छिमार्केटमध्ये पुरेशी जागा नसल्याने मच्छि विक्रेत्या शहरात जागा मिळेल तिथे मासे विक्री करतात, शुभारंभापासून कोल्ड स्टोरेज बंदच आहे, सुकी मासळी विक्री करणा-यांना तर पालिकेने वाळीतच टाकले आहे. जुनी इमारत तर सध्या मृत्यूचा सापळा बनली आहे. ही इमारत कधी कोसळेल याचा नेम नाही, अशाही तक्रारी सुहास मांजरेकर यांनी मांडल्या. प्रभाकर पडते यांनी वडखोल येथील असंख्य समस्यांचा पाढा वाचला. शहरातील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांबाबत वेंगुर्ला नगरपालिकेला जराही कळवळा नाही. मार्केटमध्ये दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना जाण्या-येण्यासाठी रॅम्प नाही. त्यामुळे त्यांचे हाल होत आहेत. मार्केटमध्ये इम्तियाज शेख नावाचा दिव्यांग अनेक वर्षापासून रस्त्याच्या कडेला आपला फिरता व्यवसाय करतो त्याच्यासाठी पालिकेने कायमस्वरूपी जागा द्यावी या मागणीकडेडी पालिका दुर्लक्ष करत असल्याचे रूपाली पाटील म्हणाल्या.
नव्याने आलेल्या मुख्याधिका-यांनी अद्यापही शहरातील समस्यांकडे लक्ष दिलेले नाही. प्रशासकीय अधिकारी म्हणून ते हुशार असले तरी ठेकेरदारी लॉबीपुढे तेही हतबल होतील अशी चिन्हे आहेत. त्यामुळे हा सर्व प्रकार हाणून पाडून पालिकेला पुन्हा एकदा सर्वच क्षेत्रात अग्रेसर करण्यासाठी नागरिकांनी सजग होण्याची गरज आहे, असे मत यावेळी माजी नगराध्यक्ष नम्रता कुबल, अॅड. नंदन वेंगुर्लेकर, डॉ. संजीव लिंगवत यांनी व्यक्त केले.
