स्वतःच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी ९० च्या दशकात वेंगुर्ल्यातील १८ ते ३५ वयोगटातील खऱ्या-खुऱ्या युवकांनी एकत्र येऊन “युवा सहयोग” नावाची एक संस्थात्मक चळवळ सुरू केली होती.
या चळवळीचे म्होरके होते ॲड. देवदत्त परुळेकर, चित्रकार अरुण दाभोलकर, कैवल्य पवार गुरुजी, संजीव कर्पे आणि जयश्री उर्फ जयशा सामंत. हे प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रातील मातब्बर व्यक्तिमत्त्व होते; म्हणजेच व्यक्तिमत्त्व विकासाची स्वतंत्र व्यासपीठेच होती. खरं तर या मंडळींना स्वतःच्या व्यक्तिमत्त्व विकासाची फारशी गरज नव्हती; पण आमच्यासारख्या कॉलेजमधील तरुणांना प्रेरित करण्याच्या अफलातून क्लुप्त्या त्यांच्या भात्यात होत्या.
समाजसेवा नावाच्या गोंडस आवरणात न गुंडाळता, स्व-विकासासाठी एकत्र या असे आवाहन करणारा फलक वेंगुर्ल्यात झळकला. “व्यक्तिमत्त्व विकास नेमका कशाशी खातात?” हे पाहण्यासाठी आम्ही या प्रवाहात सामील झालो आणि या प्रवाहात सामील झालेल्या प्रत्येकाच्या आयुष्यात व्यक्तिमत्त्व विकासाचा पैलू पडला, हे निर्विवाद सत्य आहे.
आज मात्र त्या पैलू पाडणाऱ्या हत्याराला तडा गेला. ‘जयशा’ नावाचा आमच्या जमान्यातील एक झंझावात काल कायमचा शांत झाला.
कृश शरीरयष्टीची, साधी दिसणारी एक स्त्री— पण पुरुषार्थालाही लाजवेल असे बहुआयामी कर्तृत्व अंगी बाळगणारा झंझावात आज लुप्त झाला.
वेंगुर्ल्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात गेली ३० वर्षे एक नाव हमखास ऐकू यायचे— जयशा. “जयशा होया हा! खयय उपयोगी पडता” हे समीकरण सर्वश्रुत होते.
मला आठवते, साधारण ३० वर्षांपूर्वी वेंगुर्ल्यात राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा पार पडली होती. यजमान म्हणून तालुक्यातील विविध संस्थांना आयोजनाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. खेळाडू संघांचे बसने हॉस्पिटल नाक्यावर आगमन होताच त्यांचे स्वागत करून निवासस्थानी पोहोचवण्याची जबाबदारी युवा सहयोगकडे होती. यासाठी ४०७ टेम्पो भाड्याने घेतला होता.
रात्री ९ वाजेपर्यंत येणाऱ्या संघांना सन्माननीय टेम्पो चालकाने प्रामाणिकपणे सेवा दिली. मात्र साताऱ्याचा एक संघ शेवटच्या कोल्हापूर गाडीने येणार होता. नेमकी ती गाडी ब्रेक फेल झाल्याने वाटेत अडकली, अशी माहिती डेपोतून मिळाली. आता हा संघ कधी येईल याचा नेम नव्हता. गवश्या कार्यकर्त्यांची गर्दी आपोआप कमी झाली. टेम्पो चालक कुरकुर करू लागला— “माका झोप आवरना नाय.”
त्या काळात मोठा टेम्पो चालवण्याचे धाडस कुणाकडेच नव्हते. या गोंधळात जयशा तिथेच होती. तिने सगळं संभाषण ऐकलं आणि ड्रायव्हरला म्हणाली, “तू चावी माका दी, नी जावन झोप. काम झाला की गाडी आणून लायतय.”
आणि खरंच— रात्री साधारण २ वाजता गाडी आली. आम्ही निवडक कार्यकर्ते आणि एकटी बाई—जयशा. स्वागत झालं, सगळ्यांना बॅगांसह टेम्पोत बसवलं. संघ व्यवस्थापक पुढच्या केबिनमध्ये बसले. पण ड्रायव्हरच्या सीटवर एक बाई बसलेली पाहून ते भयचकित झाले.
“तुम्ही गाडी चालवणार?” त्यांनी विचारले.
जयशाचं उत्तर ठाम होतं— “काळजी करू नकात. मी तुमका मुंबयक सुद्धा सोडून येयन. माझ्याकडे हेवी लायसन्स आसा.”
शेवटी आम्ही त्यांची समजूत काढली आणि संघ सुखरूप निवासस्थानी पोहोचला. काम फत्ते झालं. सकाळी अभिमानाने आम्ही आयोजकांना छाती फुगवून सांगत होतो— “रात्री २ वाजता संघ जागेवर सोडला… ते केवळ जयशा नावाच्या एका स्त्रीच्या जीवावर!”
हे रसायन खरंच अफलातून होतं. विज्ञान शाखेची पदवीधर, महाविद्यालयीन जीवनात उत्कृष्ट स्काऊट, राज्यस्तरीय बॅडमिंटनपटू, कबड्डीपटू, खो-खो खेळाडू—सर्वच खेळांत चमक दाखवणारी. लोणच्यांचे उत्पादन करून स्वतःच्या हिमतीवर सिंधुदुर्ग–गोव्यात बाजारपेठ मिळवणारी यशस्वी उद्योजिका होती.
सेंट ल्यूक्स हॉस्पिटलमध्ये अडल्या-नडलेल्या रुग्णांसाठी “कोणी नसेल तर जयशा हजर” हे समीकरण होतं.
गोव्यात पेशंट न्यायचा आहे, अँब्युलन्सचा ड्रायव्हर नाही—तर जयशा आपलं काम बाजूला ठेवून सेवेला धावायची. घरचा व्याप कर्त्या पुरुषासारखा सांभाळून सामाजिक कामाचं वेड जपणारी स्कूटरवरून फिरणारी जयशा आमच्या पिढीच्या पोरांटोरांना ‘आयडॉल’ वाटायची.
“एवढं सगळं करूनही माका खुर्ची देवक नाय!” असा मानापमानाचा विचार तिला कधीच शिवला नाही. मत्सर, द्वेष, टीका— “ता जय थंय नाचता”—
या सगळ्याला तिने कधी महत्त्व दिलं नाही. आयुष्यात आलेल्या अनेक वादळांसमोर ती कधीच डगमगली नाही.
वेंगुर्ल्याच्या क्रीडा, शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांमधील तिचं योगदान सर्वव्यापी असून ते कधीही विसरता येणार नाही. बहुआयामी वेंगुर्लेकर स्त्री म्हणून तिचा सार्थ अभिमान कायम स्मरणात राहील.
युवा सहयोग परिवार तिच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे.
परमेश्वर तिच्या आत्म्यास सद्गती देवो, हीच प्रार्थना.
— मोहन होडावडेकर, ९४२३८८४५१६
