कोकणची अस्मिता, येथील समृद्ध निसर्ग आणि पारंपरिक देवरायांवर सध्या तथाकथित ‘विकासा’च्या नावाखाली रिअल इस्टेट माफिया आणि निसर्गाचा घास घेणाऱ्या दलालांचे सावट निर्माण झाले आहे. या महासंकटाविरोधात कोकणच्या मातीला जागृत करण्यासाठी आणि जल-जंगल-जमिनीच्या रक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या ‘राखणदार पदयात्रेचा’ पहिला टप्पा सोनुर्ली (दाभिल-माऊली) येथे यशस्वीरित्या संपन्न झाला. ‘रानमाणूस’ प्रसाद गावडे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या चार दिवसीय पदयात्रेने संपूर्ण सीमावर्ती भागाला पर्यावरणीय क्रांतीची नवी दिशा दिली आहे.
कणकुंबी ते सोनुर्ली या ऐतिहासिक पदयात्रेचा प्रारंभ १३ जून रोजी कणकुंबी येथील पवित्र माऊली मंदिरापासून झाला. गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या तीन राज्यांच्या सीमावर्ती भागातील अत्यंत संवेदनशील आणि निसर्गसंपन्न अशा केरी, सातेरी, कारापूर आणि तेरेखोल नदी खोऱ्यातील गावांमधून या पदयात्रेने मार्गक्रमण केले.
या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ घोषणाबाजी न करता, प्रत्येक गावातून स्थानिक राखणदार देवतांच्या पवित्र स्थानांना भेटी देण्यात आल्या, नद्यांचे तीर्थ जल आणि मातीचे संकलन करण्यात आले,
जंगलातील औषधी वनस्पती, पारंपरिक बीजे आणि पानांचे संकलन करून निसर्ग रक्षणाचा संकल्प सोडण्यात आला.
रिअल इस्टेट आणि अनियंत्रित विकासाला थेट आव्हान!
आज कोकणच्या जमिनी कवडीमोलाने विकत घेऊन येथील नद्या, डोंगर आणि देवराया उद्ध्वस्त करण्याचे मोठे कारस्थान सुरू आहे. या यात्रेच्या माध्यमातून या अनियंत्रित विकासाविरोधात जनजागृती करण्यात आली. केरी आणि कारापूर सारख्या गावांमध्ये झालेल्या जाहीर चर्चासत्रांमध्ये स्थानिक तरुण आणि ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
पर्यावरणवादी आणि चळवळींची वज्रमूठ
या पदयात्रेला गोव्यातील प्रसिद्ध ‘Enough is Enough’ चळवळीचे फ्रान्सिस कोइल्हो यांच्यासह अनेक खंदे पर्यावरणवादी, स्थानिक कार्यकर्ते आणि दुर्गम भागातील ग्रामस्थांचे मोठे बळ लाभले. १६ जून रोजी सोनुर्ली येथे हजारो हातांनी “राखणदार होऊ या आपल्या मातीचे, पाण्याचे आणि जंगलांचे” असा सामूहिक मंत्र उच्चारत या पहिल्या टप्प्याची सांगता केली.
पुढील टप्पा : सिंधुदुर्ग ते रत्नागिरी!
हा तर केवळ पहिला टप्पा होता. राखणदार संघाने दिलेल्या माहितीनुसार, या चळवळीची व्याप्ती आता संपूर्ण कोकणात वाढवली जाणार आहे. लवकरच सिंधुदुर्गसह रत्नागिरी, चिपळूण आणि गुहागर सारख्या किनारपट्टीच्या आणि डोंगराळ भागात यात्रेचे पुढील टप्पे राबवले जाणार आहेत.
