वेंगुर्ले व सावंतवाडी तालुक्यातील सुमारे दहा गावातील सुमारे चार हजार हेक्टर क्षेत्रात मायनिंग सुरू करण्याच्या प्रयत्नाविरोधाची धार तीव्र झाली आहे. असे असताना आजगाव-घाकोरे भागात १५ जून रोजी रात्री सुरु झालेल्या ड्रोनद्वारे भूचुंबकीय सर्वेक्षणामुळे गावातील वातावरण चांगलेच तापले आहे. संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी सर्वेक्षण सुरू जसलेल्या हॉटेल राजगड येथे जाऊन संबंधित एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. रात्रीच्यावेळी गुपचूप चालू असलेल्या सर्वेक्षणामुळे संतापलेल्या ग्रामस्थांकडून एजन्सीच्या सातही कर्मचाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला गेला. मायनिंगमागे राजकीय शक्ती असल्याचे स्पष्ट झाल्याने या प्रकरणाला आता राजकीय वळण लागले आहे. त्यामुळे बाधीत गावातील ग्रामस्थ आता एकवटले असून मायनिंग हद्दपार करण्यासाठी बैठका, सभांचे सत्र चालू झाले आहे.सावंतवाडी व वेंगुर्ले तालुक्यातील दहा गावांमध्ये मायनिंग सुरू करण्यासाठी जेएसडब्लू कंपनीद्वारे प्रयत्न सुरू आहेत. मायनिंगच्या कक्षेत आलेली गावे कृषीप्रधान असल्याने येथे मायनिंग नको अशी सर्व गावांची भूमिका आहे. मायनिंगला तीव्र विरोध करूनही आजगाव मळेवाड रस्त्यावरील हॉटेल राजगडच्या टेरेसवरून ड्रोनद्वारे भूचुंबकीय सर्व्हे सुरू असल्याची बातमी आजगाव भागापर्यंत पोहोचली. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रात्रीच्या काळोखात सुरू झालेला हा सर्व्हे मोडून काढण्यासाठी राजगड हॉटेल गाठले. तेथे सर्वेक्षण करत असलेल्या सात जणांना ताब्यात घेत त्यांचा चांगलाच समाचार घेतल्यानंतर आजगावच्या वेतोबा मंदिरात आणले. अचानक निर्माण झालेल्या या तणावामुळे गावाला रात्रीच पोलीस छावणीचे स्वरूप आले. ग्रामस्थांनी दबाव टाकताच त्यांनी आपल्याला हे सर्वेक्षण करण्यासाठी शासनाकडून लीज मिळाले आहे. सहकार क्षेत्रातील बड्या राजकीय व्यक्तीकडून या कामासाठी सहकार्य झाले असे या कर्मचाऱ्यांकडून समजताच ग्रामस्थांच्या संतापाचा पारा अजूनच वाढला. त्यामुळे जोपर्यंत मायनिंगचा सूत्रधार येऊन स्पष्टीकरण देत नाही तोपर्यंत या कर्मचाऱ्यांना सोडणार नाही, असा पवित्रा घेत मध्यरात्रीपर्यंत आरवलीतील वेतोबा मंदिरात आंदोलकांनी आक्रोश केला. सावंतवाडी, वेंगुर्ले तालुक्यातील अनेक राजकीय पुढारीही तेथे दाखल झाले. पोलीस निरीक्षक ओंकार ओतारी यांनी कायदा हातात घेऊ नका, अशी विनंती केल्यानंतर कारवाई करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर मध्यरात्रीनंतर हे प्रकरण तात्पुरते निवळले.
दुसऱ्या दिवशी सकाळी ग्रामस्थांनी पुन्हा वेतोबा मंदिरात एकत्र येऊन मायनिंग विरोधात आता आरपारचा लढा देण्याचा संकल्प केला. दरम्यानच्या काळात संतप्त जमावाकडून आपल्याला बेदम मारहाण झाली असल्याची तक्रार संबंधित कर्मचाऱ्यांनी सावंतवाडी पोलीस स्टेशनला दाखल केल्याने मायनिंग विरोधी गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत वेतोबाच्या साक्षीने लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार केला आहे.
