वेंगुर्ला पंचायत समितीत भरली शाळा

वेंगुर्ले तालुक्यातील होडावडा नं १ या शाळेत ६० पटसंख्या असताना गेले वर्षभर केवळ २ शिक्षक असल्याने याचा विद्यार्थ्यांवर व शाळेच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे.  वारंवार पाठपुरावा करूनही एक अतिरिक्त शिक्षक मिळण्याची मागणी पूर्ण न झाल्याने अखेर संतप्त पालकांनी उन्हाळी सुट्टीनंतर शाळेच्या पहिल्याच दिवशी चक्क पंचायत समिती वेंगुर्लेच्या इमारतीत शाळा भरवली. दरम्यान वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे व जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी यावर यशस्वीरीत्या तोडगा काढल्यानंतर मुलांना होडावडा शाळा नं १ येथे पुन्हा पाठवण्यात आले.
उन्हाळी सुट्टीनंतर १५ जून रोजी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा पुन्हा गजबजल्या. मात्र होडावडा शाळा नं १ च्या विद्यार्थ्यांना पालकांनी पहिल्या दिवशी वेंगुर्ला पंचायत समितीच्या इमारतीत सर्व विद्यार्थ्यांना आणत याच ठिकाणी शाळा भरवली. दरम्यान याबाबत सभापती यांच्या दालनात सभापती शंकर घारे तसेच जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
   यावेळी गेली ४ वर्षे होडावडा नं १ या शाळेत शिक्षकांची कमतरता आहे. शाळेचे २ शिक्षक व इतर कामगिरी शिक्षक देऊन हा गाडा चालवला जात आहे. वारंवार कायमस्वरूपी शिक्षक मिळण्यासाठी आम्ही पाठपुरावा करत होतो. शाळेची पटसंख्या ६० असताना केवळ २ शिक्षक आजपर्यंत या शाळेत आहे. यामुळे पालकांनी संतप्त भावना व्यक्त करत जोपर्यंत कायमस्वरुपी शिक्षक शाळेला मिळत नाही तोपर्यंत मुलांची शाळा रोज पंचायत समितीत भरवण्याचा पवित्रा घेतला.
दरम्यान, सभापती शंकर घारे, जि.प. आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, प्रभारी गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, गटशिक्षण अधिकारी संतोष गोसावी यांनी यावर चर्चा करून यशस्वी तोडगा काढला. यानंतर गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी यांनी होडावडा नं १ शाळेला पुढील दोन दिवसात तात्पुरत्या स्वरूपात संपूर्ण शैक्षणिक वर्षासाठी एक शिक्षक देण्यात येईल व तात्काळ त्यांना नेमणुकीचे पत्र देण्याचे सांगितल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. यानंतर पालक मुलांना घेऊन पुन्हा होडावडा शाळेत रवाना झाले. तसेच यावर यशस्वी तोडगा काढल्याबद्दल पालकांनी सभापती शंकर घारे व प्रितेश राऊळ यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी चर्चा करताना होडावडा शाळा नं १ च्या मुख्याध्यापक वारंवार मोबाईलवर असतात असा आरोप करत सर्वच शिक्षकांना शाळेच्या अध्यापनाच्या वेळेत मोबाईल न वापरण्याबाबत नियम लागू करण्याची मागणी केली. मोबाईल वापरत असल्याने मुलांवर योग्यप्रकारे लक्ष नसल्याचा आरोपही पालकांनी यावेळी केला.

Leave a Reply